पत्रिकेतील मंगळाचे लग्न ठरवताना एक वेगळेच महत्व आहे . ' मंगळ आहे ' किंवा ' मंगळ दोष आहे ' किंवा मग' मांगलिक आहे' हे शब्द बर्याच वेळेला एकू येतात . पण 'मंगळ असणे 'म्हणजे काय ते आधी बघू आणी मग त्या मंगळ असण्याला कितपत महत्व द्यायचे ते तुम्ही स्वत :च ठरवू शकता .
मंगळ आहे म्हणजे पत्रिकेतील १,४,७,८,१२ ह्या स्थानात मंगळ असणे . दक्षिणेत द्वितीय स्थानातील मंगळ पण 'मंगळ दोष 'धरतात. पण ह्या स्थानात नुसता मंगळ असला तरी तो कोणत्या राशीत आहे ? रवि बरोबर आहे का ? कोणत्या ग्रहाच्या दृष्टीत आहे ? इ . बाबींवर 'मंगळ दोष ' असणे अवलंबून आहे . परत त्यात सौम्य मंगळ व कडक मंगळ हे प्रकार पण आहेतच .
मंगळाला चौथी , सातवी , आठवी असते . जेव्हा मंगळ १, ४, ७आणि १२ ह्या स्थानात असतो तेव्हा तो सप्तमस्थानाला ( विवाह स्थान ) दृष्टी ठेवून असतो .
सर्वप्रथम ह्याला ' मंगळ दोष ' का म्हणत असावेत त्याचे लॉजिक बघुयात . मंगळ हा मुळात एक पापग्रह धरला आहे . मंगळ म्हणजे आक्रमकता , धडाडी , प्रसंगी राग , सडेतोड स्वभाव . मंगळाच्या स्वभावात ' जमवून घेणे किंवा नमते घेणे ' हे प्रकार नाहीतच त्यामुळे नवरा- बायको हे नाते टिकण्यासाठी जी adjustment / compromises करावे लागतात त्यात मंगळाचा उपयोग तर नाहीच पण विरोधच जास्त होईल . त्यामुळे सप्तम स्थानावर ( विवाह स्थान ) जर मंगळाची दृष्टी असेल तर अर्थातच कदाचित तो त्याच्या अंगभूत स्वभावामुळे नात्यामध्ये ताण आणू शकेल . पण ह्यासाठी मंगळ पत्रिकेत किती प्रभावी आहे हे बघणे आवश्यक आहे .
सर्वसामान्यपणे 'मंगळ आहे ' म्हणजे पत्रिकेतील १,४,७,८,१२ ह्या स्थानात मंगळ असणे . परंतु खालील पैकी जर मंगळाची स्थिती असेल तर तो निर्दोष मानतात . ( निर्दोष म्हणजे ' मंगळ असण्याचा ' कोणताही अपाय नाही . त्यामुळे ' मंगळ आहे ' म्हणून घाबरू नये . )
पंचांगात जे 'निर्दोष मंगळाचे 'नियम दिले आहेत ते खालीलप्रमाणे :
मंगळ कर्क राशीत ( नीच राशीत ) , मिथुन किंवा कन्या राशीत ( त्याच्या शत्रू राशीत ) असल्यास , मंगळ रवि बरोबर म्हणजे अस्तंगत असल्यास , प्रथमत मेषेचा , चतुर्थात वृश्चिक राशीत , सप्तमात मकर राशीत , अष्टमात सिंह राशीत आणि बाराव्या स्थानी धनु राशीत असल्यास मंगळ निर्दोष समजतात .
आता ह्या सगळ्या नियमानुसा जर मंगळ निर्दोष होत नसेल आणि जर शुभ ग्रहांच्या दृष्टीत असेल तर सौम्य मंगळ आहे असे म्हणतात .
आता समजा एवाढे फिल्टर्स लावून ' सदोष मंगळ निघालाच तर मग वधू - वरांच्या दोघांच्याही पत्रिकेत सदोष मंगळ असेल तर चालते किंवा समजा एकाच्या पत्रिकेत सदोष मंगळ आहे व दुसर्याच्या पत्रिकेत १,४,७,८,१२ ह्या स्थानात शनि असेल तर किंवा शनीची दृष्टी सप्तमावर असेल तर प्रथमात किंवा सप्तमात गुरु / शुक्र असेल तर अथवा सप्तमावर त्यांची दृष्टी असेल तर किंवा प्रथमात किंवा सप्तमात राहू - केतू असतील तर अशी पत्रिका पण ' मंगळ असणाऱ्या पत्रिकेला चालु शकते .
एका दिवसात १२ लग्न राशी (दर दोन तासानी एक लग्न रास बदलत असते ) आणि १२ लग्न राशींच्या पत्रिके पैकी ५ लग्न राशीच्या पत्रिकेत एक तर १,४,७,८,१२ ह्या स्थानात मंगळ येणार म्हणजे ह्या लोकांच्या पत्रिका ' मंगळ आहे ' ह्या category मध्ये जाणार .
सदोष मंगळ असण्याच्या नियमांबरोबर अशावेळेस मंगळाची अवस्था ( बाल , कुमार, युवा , वृध्द, मृत ) पण बघायला हवी कारण त्यातल्या त्यात कुमार आणि त्याही पेक्षा जास्त युवा अवस्थेतील मंगळ जास्त त्रासदायक होईल बाल ,वृद्ध
आणि त्यामानाने मृत ग्रह काय प्रभाव टाकणार ?
माझ्यामते एखादी वाईट घटना हि कोणत्याही एका पापग्रहा मुळे कधीही होत नाही तर त्या पापग्रहांचे इतर ग्रहांशी असलेले कुयोग ह्यांच्यामुळे घडत असते . त्यामुळे एकटा मंगळ पण काय करणार , नाही का ?
खरे बघायला गेले तर शनी , राहू , हर्षल हे पण पापग्रह धरले आहेत पण लग्नाच्या वेळेस मात्र मंगळालाच महत्व !
मला वाटते मंगळ हा लग्न ठरवताना पत्रिकेतील एक overrated ग्रह आहे . बघा , म्हणजे उगाचच मंगळाला घाबरण्याचे
कारण नाही . अगदी नियमाप्रमाणे पहिले तरी नुसते 'मंगळ असण्याला 'सुद्धा बरेच अपवाद आहेत . त्यामुळे ' मंगळ आहे ' ह्या प्रकारचा फारसा बाऊ करू नये .