Title

Astrology Blog by Anagha Bhade


Tuesday, 3 May 2016

राशिभविष्य मे-२०१६

श्री सुनील देव ह्यांनी लिहिलेले  राशी भविष्य मे-२०१६
(के.पी.पद्धतीप्रमाणे)
(टीप : सर्व भविष्य चंद्र राशीप्रमाणे दिली आहेत, पण ज्यांना लग्न रास माहीत आहे त्यांनी जन्म रास व लग्न रास अशी दोन्ही भविष्य वाचावीत.
समजा...चंद्र राशी मिथुन आहे आणि लग्न राशी मीन आहे, तर अशांनी मिथुन आणि मीन अशी दोन्ही राशींची भविष्ये पहावीत आणि समन्वय साधावा.)
मेष : मेष राशीला रवि, बुध, शुक्र हे तीन ग्रह तुमच्याच राशीत आणि चंद्र लाभात त्यामुळे मेष राशीला हा महिना आर्थिकदृष्ट्या आणि प्रकृतीच्या दृष्टीने पण उत्तम आहे. द्वितीयेश शुक्र लग्नी, केतू लाभात त्यामुळे आर्थिक आवक उत्तम असेल पण ती जपून ठेवा कारण शनि अष्टमात असल्याने त्या पैशाला वाटा फुटण्याची शक्यता जास्त आहे. तृतीयेश बुध पण लग्नी असल्याने लेखक, शिक्षणाशी संबंधित व्यावसायिकांना उत्तम काळ आहे, मात्र प्रवास जपून करावा. चतुर्थातील चंद्र लाभात व गुरु पंचमात त्यामुळे विद्यार्थ्यांना हा काळ उत्तम असून घरातील वातावरण देखील चांगले राहील. गुरु पंचमात व शुक्र लग्नी त्यामुळे मुलाबाळांना उत्तम काळ आहे, मेष राशीची वडीलधारी मंडळी तुमचे लाड करतील. षष्ठेश कन्या राशीचा स्वामी बुध, त्यामुळे प्रकृतीच्या किरकोळ तक्रारी उद्भवतील. सप्तमेश शुक्र लग्नी, केतू लाभात त्यामुळे जोडीदाराशी सुखसंवाद राहतील. नवमेश गुरु पंचमात आणि शुक्र लग्नी त्यामुळे आध्यात्मिकदृष्ट्या हा काळ उत्तम आहे, ध्यानधारणेसाठी उपयुक्त काळ असल्याने त्याचा जरूर फायदा करून घ्यावा. दशमेश शनि अष्टमात व बुध लग्नात त्यामुळे नोकरी करणाऱ्यांना ह्या काळात कामाचा ताण जाणवू शकतो. पण केतू लाभात असल्याने आर्थिकदृष्ट्या नुकसान संभवत नाही. एकंदरीत हा महिना मेष राशीला चांगला आहे.
वृषभ : वृषभ राशीचा स्वामी शुक्र बाराव्या भावात, केतू दशमात आणि गुरु चतुर्थात त्यामुळे घरासंबंधी काहीतरी खर्च उद्भवण्याची शक्यता आहे. प्रकृतीबाबत पण थोडी काळजी घ्यावी. द्वितीयेश बुध बाराव्या भावात, रवि पण बाराव्या भावात वर लिहिल्याप्रमाणे खर्चाचे प्रमाण वाढते राहील, तरी आर्थिक व्यवहार सावधानतेने करावेत. रवि, बुध बाराव्या स्थानी, चंद्र दशम स्थानी आणि गुरु,राहू चतुर्थात असल्याने नवीन घर बुक करताना सावधानतेने करावे, कारण तृतीयेश दशमात असल्याने अश्या व्यक्ती जास्त उत्साहित होतात आणि त्या भरात काही चुका होण्याची शक्यता असते. पंचमेश बुध बाराव्या स्थानी असल्याने शेअर ब्रोकिंगचा व्यवसाय करणाऱ्यांनी अतिशय सावध राहावे, नुकसान होण्याचा धोका आहे. मुले खूप लहान असल्यास त्यांच्याकडे लक्ष ठेवावे. तूळ राशीचा स्वामी शुक्र बाराव्या स्थानी, केतू दशमात व गुरु चतुर्थात त्यामुळे आर्थिक आवक दृष्ट्या योग चांगला आहे, मात्र गुरु वक्री असल्याने विलंब संभवतो. सप्तमात शनि, मंगळ ह्यामुळे जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग उद्भवतील, तरी मौनं सर्वार्थ साधनं...! दशमेश शनि सप्तमात आणि बुध बाराव्या स्थानी त्यामुळे ज्यांचा स्वत:चा व्यवसाय आहे त्यांची कामे रेंगाळण्याची शक्यता आहे. लाभेश गुरु चतुर्थात व शुक्र बाराव्यात त्यामुळे ४,११,१२ चा संबंध आल्याने काही लोक नवीन घर बुक करायचा विचार करतील, मात्र सावधगिरी बाळगावी. द्वादाशेश मंगळ सप्तमात तसेच रवि, बुध, शुक्र बाराव्या स्थानी त्यातील बुध व मंगळ वक्री असल्याने कोणत्याही व्यवहारात सावधानता बाळगावी. एकंदरीत हा महिना सर्व व्यवहारात सावधगिरी बाळगावी असा आहे.
मिथुन : मिथुन राशीचा स्वामी बुध लाभात व रवि पण लाभात शरीर प्रकृतीच्या आणि उत्साहाच्या दृष्टीने एकंदरीत उत्तम काळ आहे. द्वितीयेश चंद्र नवम स्थानी व राहू तृतीयात असल्याने मी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नोकरी अगर व्यवसायाच्या निमित्ताने प्रवासाचे योग येतील आणि त्यातून लाभ देखील होतील. तृतीयात गुरु, राहू व शुक्र लाभात आणि रवि देखील लाभात त्यामुळे लेखक, पुस्तक प्रकाशक, पुस्तक विक्रेते, प्रिंटर्स ह्यांना चांगला काळ आहे. घरासंबंधी काही सुवार्ता कळण्याची शक्यता आहे, तसेच नवीन घर घेत असल्यास ताबा मिळण्याची देखील शक्यता आहे. पंचमातील शुक्र लाभ स्थानी व केतू नवम भावात आणि शनि षष्ठात त्यामुळे मुलाबाळांच्या दृष्टीने हा काळ चांगला आहे, तसेच शेअर ब्रोकिंग किंवा इव्हेंट मॅनेजमेंटच्या व्यवसायास देखील उत्तम काळ आहे. सप्तमेश गुरु तृतीयात व शुक्र लाभात असल्याने जोडीदाराशी सुखसंवाद राहतील. नवमातील चंद्र, केतू काही लोकांना प्रवासाचे योग आणतील. तसेच मे महिन्याच्या दुसऱ्या/तिसऱ्या आठवड्यात चंद्र जेव्हा केतूच्या जवळ जाईल तेव्हा अध्यात्मिक साधना करणाऱ्यांना उत्तम काळ आहे. दशमेश गुरु तृतीयात त्यामुळे नोकरी करणाऱ्यांना उत्तम काळ आहे, त्यांच्या कामाची दखल घेतली जाईल. एकंदरीत मिथुन राशीला हा महिना उत्तम आहे. (गुरु, शनि, मंगळ व बुध हे ग्रह वक्री असल्याने वर नमूद केलेले लाभ मिळण्यासाठी कदाचित विलंब लागेल, ह्याची नोंद घ्यावी.)
कर्क : कर्क राशीचा स्वामी चंद्र अष्टमात आणि राहू द्वितीयात त्यामुळे ह्या राशीच्या लोकांना काही प्रसंगी आर्थिक बाबतीत जास्त खर्च होण्याची शक्यता आहे. तसेच प्रकृतीच्या दृष्टीने देखील थोडी काळजी घ्यावी. द्वितीयात गुरु व शुक्र दशमात त्यामुळे खर्च जरी असला तरी आर्थिक आवक चांगली राहील. द्वितीय स्थानातील राहू देखील आर्थिक बाबतीत मदत करेल. तृतीयेश बुध दशमात असल्याने लेखक, प्रकाशकांसाठी हा काळ चांगला आहे. चतुर्थेश शुक्र दशमात व केतू अष्टमात त्यामुळे घरामध्ये काही बाबतीत दुमत होण्याचे प्रसंग उद्भवतील. पंचम भावात शनि आणि मंगळ दोन ग्रह, दोन्ही वक्री त्यामुळे ज्यांचा व्यवसाय शेअर ब्रोकिंगचा आहे अश्यांनी व्यवहार जपून करावेत. पंचमात दोन ग्रह जरी असले तरी मंगळ हा अध्यात्मिक साधनेला पोषक नाही. षष्ठेश गुरु द्वितीय स्थानी व शुक्र दशमात हे तिन्ही भाव आर्थिक बाबतीत उत्तम आहेत, शिवाय काहींना नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्याची देखील शक्यता आहे. सप्तमेश शनि पंचमात व बुध दशमात त्यामुळे जोडीदाराशी नमते घेतल्यास उत्तम! अष्टमातील चंद्र आणि केतू मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात थोडफार काळजी घ्यावी लागेल असे सुचवतो. नवमेश गुरु द्वितीय स्थानात आणि शुक्र दशमात त्यामुळे ज्यांचे व्यवसाय प्रवासाशी संबंधित आहेत अश्यांना आर्थिक आवकेच्या दृष्टीने उत्तम काळ आहे. दशमातील तीन ग्रह कर्क राशीच्या लोकांना काही न काही आर्थिक किंवा नोकरीमध्ये उन्नती दिल्याशिवाय राहणार नाहीत. एकंदरीत हा महिना संमिश्र असला तरी आर्थिकदृष्ट्या चांगला आहे.
सिंह : सिंह राशीत गुरु, राहू हे दोन ग्रह आणि राशीस्वामी रवि नवमात, शुक्र देखील नवमात त्यामुळे दोन गोष्टी संभवतात- तुम्हाला लांबच्या प्रवासाची संधी प्राप्त होईल किंवा तुमच्या धार्मिक कार्यक्रमांना बरीच चालना मिळेल. कारण १,५,९ ह्या भावांचा एकमेकांशी प्रबळ संबंध येतो. या योगामुळे तुमची शरीर प्रकृती देखील चांगली राहील. द्वितीयेश बुध नवमात व रवि पण नवमात त्यामुळे धार्मिक कार्यातून ज्यांचा व्यवसाय आहे अश्यांना आर्थिक प्राप्तीदृष्ट्या चांगला काळ आहे. नोकरी करणाऱ्यांना देखील प्रवासामुळे धनप्राप्ती होईल. तृतीयेश शुक्र नवम स्थानी व केतू सप्तम स्थानी त्यामुळे लहान-मोठे प्रवास बरेच होतील, विशेषत: ज्यांचा व्यवसाय फिरतीचा आहे उदा. मेडिकल रिप्रेझेंटेटिवज्, कमिशन एजंट, पुस्तक विक्रेते ह्यांना उत्तम काळ आहे. चतुर्थात मंगळ, शनि दोन्ही ग्रह वक्री त्यामुळे घरासंबंधी काही अप्रिय चर्चा होण्याची शक्यता आहे, घरातील वातावरण थोडे गढूळ होण्याची शक्यता आहे. पंचमेश गुरु लग्नी सिंह राशीत व शुक्र नवम स्थानी त्यामुळे मुलांच्या दृष्टीने हा काळ अतिशय चांगला आहे. षष्ठेश शनि चतुर्थात व बुध नवम स्थानी त्यामुळे प्रकृतीच्या किरकोळ कुरबुरी राहतील. सप्तमात चंद्र, केतू आणि नेपच्यून आणि सप्तमेश शनि चतुर्थात वक्री त्यामुळे जोडीदाराशी किरकोळ वादविवादाचे प्रसंग येऊ शकतात. एकंदरित सिंह राशीला हा मे महिना उत्तम आहे.
कन्या : कन्या राशीचा स्वामी बुध अष्टम स्थानी, रवि पण अष्टमात मंगळ तृतीयात त्यामुळे दोन-तीन गोष्टी संभवतात. अष्टमातील ग्रह प्रवासात अडथळे निर्माण करू शकतात, तसेच वाहने चालवताना काळजी घ्यावी. काहींच्या बाबतीत भावा-बहिणींसंबंधी चिंता निर्माण होईल. द्वितीयेश शुक्र अष्टमात व केतू षष्ठात त्यामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, पण त्या जोडीला प्रकृतीच्या किरकोळ कुरबुरी उद्भवू शकतात. तृतीयात शनि, मंगळ दोन्ही वक्री, तृतीयेश मंगळ देखील तिथेच, बुध पण अष्टमात त्यामुळे वरील गोष्टीस पुष्टी मिळते. चतुर्थेश गुरु बाराव्या स्थानी, शुक्र अष्टम स्थानी ४,८,१२ हा त्रिकोण मोक्षदायी आहे, त्यामुळे ज्या व्यक्तींना अध्यात्म अगर ध्यानधारणेची आवड आहे अश्यांना चांगला काळ आहे. पंचमेश शनि तृतीयात व बुध अष्टमात त्यामुळे काही लोकांना लॉटरीची तिकिटे अगर शेअर ब्रोकर्सना शेअर घ्यायची इच्छा होईल ती टाळावी, नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच मुलांच्या अभ्यासाकडे थोडे लक्ष द्यावे लागेल. षष्ठ स्थानात केतू कुंभ राशीत, कुंभेचा स्वामी शनि तृतीय स्थानी, बुध अष्टम स्थानी काही प्रसंगी थोडाफार आर्थिक लाभ संभवतो, पण वक्री शनिमुळे तो लाभ विलंबाने मिळेल. सप्तमेश गुरु बाराव्या स्थानी व गुरु वक्री, शुक्र अष्टम स्थानी जोडीदाराशी जमवून घ्यावे. दशमेश बुध अष्टमात व रवि पण अष्टमातच नोकरी अगर व्यवसाय करणाऱ्यांनी कोणताही व्यवहार सावधपणे करावा आणि कामानिमित्त प्रवास करायचा झाल्यास लांबणीवर टाकावा. एकंदरीत कन्या राशीला हा महिना संमिश्र राहील.
तूळ : तूळ राशीचा स्वामी शुक्र सप्तम स्थानी आणि केतू पंचमात, शनि मंगळ द्वितीयात जरी असले तरी शरीर प्रकृतीच्या दृष्टीने काळजी नसावी. द्वितीय स्थानातील शनि, मंगळ वक्री असल्याने धनस्थानासंबंधी कोणताही फायदा देऊ शकतील असे वाटत नाही. तृतीयेश गुरु लाभात व तो वक्री आहे, शुक्र सप्तमात ३,७,११ ह्या स्थानांचा संबंध आल्याने प्रवासी संस्था, एजंट्स ह्यांना काळ चांगला आहे. चतुर्थातील शनि द्वितीयात व बुध सप्तमात घरासंबंधी कोणताही व्यवहार काळजीपूर्वक करावा. पंचमात केतू व महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चंद्र पण तिथेच, मुलाबाळांच्या दृष्टीने हा योग चांगला आहे. षष्ठेश गुरु लाभात आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा योग चांगला आहे. सप्तमात रवि, शुक्र, बुध व सप्तमेश मंगळ द्वितीयात त्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील व जोडीदाराशी देखील सलोख्याचे संबंध राहतील. दशमेश चंद्र मे च्या पहिल्या आठवड्यात पंचमात आहे, त्यानंतर तो मीन राशीत (षष्ठात) येईल तेव्हा आर्थिक लाभ संभवतो. लाभातील गुरु, राहू सर्वसाधारण लाभ ह्या दृष्टीने उत्तम आहेच. एकंदरीत हा महिना तूळ राशीसाठी संमिश्र आहे.
वृश्चिक : वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ वृश्चिक राशीतच आणि शनि पण तिथेच. मंगळ षष्ठेश असल्याने ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांनी काळजी घ्यावी. संधिवाताचा त्रास असणाऱ्यांनी देखील काळजी घ्यावी. द्वितीयेश गुरु दशमात व राहू पण दशमात आर्थिक दृष्ट्या उत्तम योग आहे. तृतीयेश शनि लग्नात आणि बुध षष्ठात त्यामुळे पाहुण्यांच्या गाठीभेटी होण्याचे योग आहेत, घरात सतत वर्दळ राहील. चतुर्थेश शनि लग्नात तसेच केतू पण चतुर्थात ज्यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे अश्या लोकांना हा काळ चांगला आहे. पंचमेश गुरु दशमात मुलाबाळांच्या बाबतीत काळजीचे अजिबात कारण नाही. षष्ठात रवि, बुध, शुक्र हे तीन ग्रह, षष्ठेश मंगळ लग्नी हा योग आर्थिकदृष्ट्या चांगला आहे, पण प्रकृतीची काळजी घ्यावी. सप्तमेश शुक्र षष्ठात व केतू चतुर्थात त्यामुळे ह्या काळात जोडीदाराशी वादाचे प्रसंग टाळावेत. दशमात गुरु, राहू व शुक्र षष्ठात नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम आहे, प्रमोशनचे बरेच चान्सेस आहेत. तसेच व्यवसाय करणाऱ्यांना देखील हा काळ चांगला आहे. लाभेश बुध षष्ठात व रवि पण षष्ठात हे योग आर्थिक लाभाच्या दृष्टीने उत्तम आहे. एकंदरीत हा महिना वृश्चिक राशीच्या लोकांना आर्थिकदृष्ट्या उत्तम आहे मात्र प्रकृतीची काळजी घेण्याचे सुचवतो.
धनु : धनु राशीचा स्वामी गुरु नवमात आणि शुक्र पंचमात १,५,९ हा योग ज्यांना ध्यानधारणा किंवा अध्यात्मिक गोष्टींची आवड आहे त्यांच्यासाठी हा काळ उत्तम आहे. शरीर प्रकृतीच्या दृष्टीने देखील हा महिना उत्तम आहे. द्वितीयेश शनि बाराव्या भावात व बुध पंचमात त्यामुळे खर्चाचे प्रमाण वाढते राहील, आर्थिक आवक कमी व खर्च जास्त अशी परिस्थिती राहील. तृतीयात चंद्र, केतू व शनि बाराव्या भावात अनेक लोकांना लहान-मोठ्या प्रवासाची संधी प्राप्त होईल. चतुर्थेश गुरु नवमात व शुक्र पंचमात त्यामुळे ज्यांचे आईवडील लांब असतात अश्या मुलांना त्यांच्या भेटीचा योग येईल. पंचमात रवि, बुध, शुक्र तीन ग्रह व पंचमेश मंगळ बाराव्या स्थानी कुटुंबासह आनंदोत्सव साजरा कराल. सप्तमेश बुध पंचमात व रवि पण पंचमात त्यामुळे जोडीदाराशी सलोख्याचे संबंध राहतील. अष्टमेश चंद्र महिन्याच्या सुरुवातीला तृतीयात आहे, तो मीन राशीत गेल्यावर वाहने चालवताना काळजी घ्यावी. दशमेश बुध व लाभेश शुक्र दोन्ही पंचमात त्यामुळे नोकरीतील परिस्थिती जैसे थे राहील. एकंदरीत हा महिना आर्थिकदृष्ट्या खर्चाचा तरी पण आनंद देणारा राहील.
मकर : मकर राशीचा स्वामी शनि लाभात व बुध चतुर्थात घरातील काही गोष्टी मनाप्रमाणे घडण्याचा काळ आहे असे दिसते. शनि वक्री असल्याने कदाचित थोडी वाट बघावी लागेल. धन स्थानात चंद्र व केतू आणि द्वितीयेश शनि लाभात त्यामुळे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. अष्टमातील राहू काही बाबतीत धनप्राप्ती बरोबरच काहींना मानसिक ताण देण्याची शक्यता आहे. तृतीयेश गुरु अष्टमात आणि शुक्र चतुर्थात त्यामुळे प्रवासाला जाताना काळजी घ्यावी. पंचमातील शुक्र चतुर्थात, केतू द्वितीयात आणि शनि लाभात मुलांच्या प्रगतीच्या दृष्टीने काळजीचे कारण नाही. सप्तमेश चंद्र द्वितीयात आणि राहू अष्टमात जोडीदारास धनलाभ संभवतो. दशमेश शुक्र चतुर्थात व केतू द्वितीय स्थानी त्यामुळे नोकरी करणाऱ्यांना धनलाभाची शक्यता आहे आणि नोकरीमध्ये सर्व सुरळीत राहील. एकंदरीत हा महिना मकर राशीला व्यवस्थित आहे.
कुंभ : महिन्याच्या सुरुवातीला चंद्र प्रथम स्थानात कुंभ राशीतच, राहू सप्तम स्थानी, बुध तृतीय स्थानी. त्यामुळे कुंभ राशीला प्रकृतीच्या दृष्टीने उत्तम काळ आहे. कुंभ राशीचा स्वामी शनि दशमात हा सुद्धा एक उत्तम प्रसिद्धी योग आहे, मात्र शनि वक्री असल्याने ह्या योगाचे फायदे विलंबाने मिळतील. द्वितीयेश गुरु सप्तमात आणि शुक्र तृतीयात त्यामुळे धनप्राप्तीच्या दृष्टीने हा योग चांगला आहे. तृतीयात रवि, बुध, शुक्र हे तीन ग्रह आहेत व तृतीयेश मंगळ दशमात हे सर्व योग पराक्रमासाठी उत्तम आहेत, प्रत्येक कामामध्ये उत्साह जाणवेल. तसेच लेखक आणि शिक्षण क्षेत्रातील लोकांना उत्तम काळ आहे, नवीन लेखनाची सुरुवात होईल. चतुर्थेश शुक्र तृतीयात, केतू लग्नी त्यामुळे विद्यार्थी दशेत असणाऱ्यांना अभ्यासाच्या दृष्टीने काही अडचणी येऊ शकतील. पंचमेश बुध मुलांच्या प्रगतीच्या दृष्टीने उत्तम काळ दर्शवतो. सप्तमात गुरु, शुक्र तृतीयात त्यामुळे जोडीदाराशी वादविवादाचे प्रसंग टाळावेत. नवमेश शुक्र तृतीयात त्यामुळे अनेक लोकांना प्रवासाचे योग येण्याची बरीच शक्यता आहे. प्रवासाची तयारी ठेवावी. दशमात शनि, मंगळ उत्तम योग आहे, मात्र दोन्ही ग्रह वक्री असल्याने परिस्थिती जैसे थे राहील किंवा चांगले परिणाम बघण्यासाठी थोडी वाट बघावी लागेल. एकंदरीत हा महिना कुंभ राशीला उत्तम आहे.
मीन : मीन राशीचा स्वामी गुरु षष्ठात, राहू पण तिथेच आणि रवि द्वितीय ह्या मारक स्थानी त्यामुळे प्रकृतीची थोडी काळजी घ्यावी लागेल. द्वितीयात रवि, बुध, शुक्र व द्वितीयेश मंगळ नवमात हा योग आर्थिकदृष्ट्या उत्तम आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्यांचा (पी.एच.डी.) प्रबंध पुरा होण्याची शक्यता आहे. तृतीयेश शुक्र द्वितीय स्थानी व केतू प्रथम स्थानी आणि शनि नवम स्थानी हा योग ज्यांचा फिरतीचा व्यवसाय आहे (मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हज्, पुस्तक विक्रेते, स्टेशनरी ई.) त्यांना कामानिमित्त प्रवासामुळे जास्त ऑर्डर मिळतील. चतुर्थेश बुध द्वितीयात व रवि, शुक्र पण तिथेच त्यामुळे घरासंबंधी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. काही लोकांची घरे मनाप्रमाणे चांगल्या किमतीला विकली जाण्याची शक्यता आहे. पंचमेश चंद्र बाराव्या स्थानी, राहू षष्ठ स्थानी आणि बुध द्वितीय स्थानी त्यामुळे नक्की सांगता येत नाही पण शेअरच्या बाबतीत चांगला फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. षष्ठात राहू, गुरु प्रकृतीच्या दृष्टीने जरी एवढे चांगले नसले तरी आर्थिक प्राप्तीसाठी उत्तम आहेत. षष्ठात गुरु असल्याने ज्यांना डायबेटिस आहे किंवा पोटाचे विकार आहेत अश्यांनी खाण्यापिण्याबाबत काळजी घ्यावी. तसेच राहू रविच्या राशीत असल्याने ब्लडप्रेशर आहे अश्यांनी देखील काळजी घ्यावी. सप्तमेश बुध द्वितीय स्थानी त्यामुळे जोडीदाराशी सुखसंवाद होतील, वातावरण आनंदी राहील. दशमेश गुरु षष्ठात व शुक्र द्वितीयात आर्थिक प्राप्ती किंवा प्रमोशन साठी उत्तम योग आहे. एकंदरीत हा महिना मीन राशीला प्रकृती जपल्यास उत्तम आहे.