Title

Astrology Blog by Anagha Bhade


Friday, 10 January 2014

Birth Details कळवताना :

बर्याच वेळा मेल मधून birth details कळवताना लोकं गोंधळ करतात . विशेषत: जन्मवेळ !
am ऐवजी pm किंवा pm ऐवजी am  लिहितात  यासाठी 24 hour format मध्ये जन्मवेळ लिहिली तर गोंधळ होणार नाही . उदा : रात्री १२ नंतर ४५ मिनिटे जन्म असेल तर ००:४५ लिहावे , दुपारी १२:४५ असेल तर १२:४५ तसेच रात्री ८ वाजता जन्म असेल तर २०:०० असे लिहावे . जेणेकरून तुमच्याकडून चूक होणार नाही व माझाही वेळ वाचेल . 

Monday, 6 January 2014

पत्रिकेतील ग्रहयोग -भाग १

पत्रिका बघताना सगळ्यात महत्वाचे मला  वाटते ते 'पत्रिकेतील ग्रहयोग ' . कोणत्याही पत्रिकेतील ग्रहयोगांमुळे पत्रिकेचा दर्जा  ठरत असतो .घटना कोणत्या काळात घडवण्याचा अधिकार महादशा स्वामीला  आहे  .परंतु  घटना  घडणार कि नाही  हे पत्रिकेतील ग्रहयोग  ठरवत असतात . उदा .   महादशा स्वामी  जरी संतती स्थान देत असेल तरी जर पत्रिकेतील ग्रहयोग जर संतती विरोधात असतील  संतती योग येतच नाही . त्यामुळे मला वाटते कि 'ग्रहयोग ' हे अत्यंत महत्वाचे ठरतात . तर आता हे योग कोणकोणते आहेत ते पाहू .
संपूर्ण राशीचक्र हे ३६० अंशाचे आहे . प्रत्येक रास ३० अंश असते .  एखादा ग्रह दुसर्या ग्रहापासून किती अंशावर आहे त्याप्रमाणे त्याचे योग  ठरतात  .
आता  ह्यामध्ये  शुभ योग कोणते आणि अशुभ योग कोणते तर , नवपंचम योग , लाभ योग हे शुभ योग आहेत . केंद्र योग , प्रतियोग , षडाअष्टक योग हे अशुभ योग आहेत . युती योगात कोणते ग्रह आहेत त्यावर त्याचे फळ अवलंबून आहे .
आता ह्या योगांची थोडक्यात माहिती पाहू .
पत्रिकेचा विचार करताना कोणत्याही फक्त एका ग्रहयोगाचा  विचार करू नये तर सगळ्या ग्रहयोगांचा साकल्याने विचार करायला हवा .

युति  योग :

जेव्हा दोन किंवा त्याहून अधिक ग्रह एकाच राशीत सारख्या अंशावर असतात त्यावेळेस ते युतीत आहेत असे म्हणतात .
उदा . शनी व मंगळ कर्केत आहेत व दोन्ही ग्रह १५ अंशावर आहेत तर शनि - मंगळ अंशात्मक ( एकाच अंशावर ) युती आहे असे म्हटले जाते
जलद गती ग्रह असेल तर साधारण ६ अंशात पण युती धरण्यास हरकत नाही .
उदा . समजा शुक्र व चंद्र वृषभेत आहेत . शुक्र १० अंशावर आहे व चंद्र ४  अंशावर आहे . म्हणजे दोन्ही ग्रहात ६ अंश फरक आहे . चंद्र जलद गती ग्रह असल्याने शुक्र - चंद्र  युतीत आहेत असे म्हणायला हरकत नाही . अशावेळेस शुक्र- चंद्र  युती योगाची फळे मिळतील .
नैसर्गिक शुभ  ग्रहांची युती  शुभ ( उदा. गुरु- शुक्र )व अशुभ ग्रहांची  युती  ( शनि - मंगळ ) अशुभ फळे देते . जन्मलग्नाप्रमाणे फळाची तीव्रता कमी जास्त असते .  एक अशुभ व एक शुभ ग्रहाची युती मिश्र स्वरूपाची फळे देते . बर्याच वेळा शुभ ग्रहाच्या कारकत्वात अशुभ ग्रहामुळे न्यूनता येत . उदा. गुरु - शनि युती संतती सुखाच्या  दृष्टीने चांगली नाही तसेच शुक्र- शनि युती विवाह / वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने . शुक्र- शनि युतीत बर्याच वेळा उशिरा विवाहाचा योग असतो .

नवपंचम योग : 

हा एक पहिल्या प्रतीचा शुभयोग आहे . जेव्हा एक ग्रह ( एकापेक्षा  जास्त ) दुसऱ्या   ग्रहापासून १२० असतो तेव्हा त्याला  ग्रह नवपंचम  योगात आहेत असे म्हणतात .
नवपंचम योगात एक ग्रह दुसर्या ग्रहापासून ५-९ स्थानात असतात .
उदा . मेष लग्न आहे . मेषेत मंगळ १० अंशावर आहे . सिंह राशीत  पंचमात गुरु १२ अंशावर आहे व नवमात धनु राशीत चंद्र ११ अंशावर आहे तर मंगळ - चंद्र - गुरु हे नवपंचम योगात आहेत असे म्हणतात .
जेव्हा नवपंचम योगात गुरु असतो तेव्हा त्याची शुभ दृष्टी दुसऱ्या ग्रहावर  येते . त्यामुळे  नवपंचम योगात गुरु असणे हे फारच  छान असते .
नवपंचम योग हे एकाच तत्वातल्या राशीत होत असतात . जसे इथे मेष,सिंह ,धनु ह्या तीनही राशी अग्निराशी आहेत .
पत्रिकेत जितके नवपंचम योग जास्त तितका पत्रिकेचा दर्जा वरचा होतो .
आपण जेव्हा म्हणतो कि अमुक एखादि व्यक्ती 'LUCKY ' आहे किंवा ज्यांना कमी कष्टात जास्त यश मिळते त्यावेळेस बर्याच वेळा अशा माणसाच्या पत्रिकेत नवपंचम योग झालेले आढळतात .

लाभयोग :

जेव्हा एक ग्रह ( एकापेक्षा जास्त )दुसर्या  ग्रहापासून ६० अंश अंतरावर असतो तेव्हा लाभ योग झाला असे म्हणतात .
लाभायोगात हे ग्रह एकमेकांपासून ३-११ अंतरावर असतात .
उदा . समजा मिथुन लग्न आहे . व्ययात वृषभेत ५ अंशावर गुरु आहे व कर्केत द्वितीय स्थानी शुक्र ४ अंशावर आहे तर गुरु-शुक्र लाभयोग झाला असे म्हणतात .
लाभयोग हा नवपंचम योगापेक्षा खालच्या प्रतीचा शुभ योग आहे .  हे योग बुद्धिमत्तेच्या दृष्टीने चांगले असतात .

पुढील लेखात केंद्रयोग , षडाष्टक योग व  प्रतियोग ह्या योगांची माहिती देण्याचा प्रयत्न करते .




Wednesday, 1 January 2014

पत्रिकेतील शुक्र

 शुक्र  हा  एक शुभ ग्रह आहे . खरे तर लग्न राशीप्रमाणे शुभ अशुभ ग्रह वेगळे असतात . नैसर्गिक शुभ अशुभ ग्रहांच्या वर्गीकरणानुसार शुक्र , गुरु , चंद्र , बुध हे शुभ ग्रह मानले   आहेत  तसेच मंगळ  ,शनि ,हर्षल  ह्यासारखे ग्रह हे पापग्रह मानले जातात . शुभ ग्रहांची दृष्टी शुभ व पापग्रहांची दृष्टी अशुभ धरतात . ( नैसर्गिक शुभ अशुभ ग्रहांचे वर्गीकरण  हे प्रामुख्याने दृष्टीयोग तसेच बाकी अशुभ योग उदा . केंद्र  योग वगेरे च्या विश्लेषणासाठी जास्त उपयोगी पडते. )

 ह्या लेखात आपण शुक्राचा विचार करू . शुक्र हा विवाहाचा तसेच कलेचा  कारक ग्रह आहे . शुक्रावरून कामसुख , प्रेमविवाह , वेगवेगळ्या कला , वैवाहिक सौख्य इ . गोष्टींचा विचार करतात . तसेच शुक्र हा सौदर्याचा कारक ग्रह आहे . विशेषत: डोळे ,केस हे शुक्राच्या अमलाखाली येतात . पत्रिकेतील शुक्र जर बलवान असेल तसेच जर तो इतर ग्रहाच्या शुभयोगात असेल तर रसिकता ,कलात्मक पिंड ,सौदर्य  इ. गोष्टी त्या व्यक्तीत पाहायला मिळतात .जेव्हा आपण म्हणतो कि अमुक एक व्यक्ती खूप romantic आहे तेव्हा ती व्यक्ती शुक्राच्या अमलाखाली असते .

पत्रिकेतील well  placed शुक्र  हा वरील गुण देतो . परंतु बिघडलेला म्हणजे पापग्रहांच्या कुयोगातील शुक्र त्या व्यक्तीस व्यसनी किंवा व्यभिचारी पण बनवतो . शुक्र विवाहाचा कारक ग्रह असल्यामुळे वैवाहिक सौख्य बघताना सप्तम स्थान सप्तमेश ह्याबरोबरच शुक्राला पण महत्व द्यावे लागते . घटस्फोटांच्या पत्रिकेत शुक्राचा हर्षलशी अशुभ योग झालेला आढळतो . प्रेमविवाह होणार्यांच्या पत्रिकेत शुक्र- हर्षल , शुक्र - मंगळ  शुभ योग आढळतो .

वृषभ व तूळ  ह्या शुक्राच्या राशी आहेत . मीन राशीतला शुक्र उच्च मानतात . कन्या हि शुक्राची नीच रास आहे . शुक्र मेष व वृश्चिक राशीत निर्बली मानतात .
शुक्राचे रत्न हिरा ( diamond ) आहे .

MEDICAL ASTROLOGY मध्ये शुक्रावरून वीर्यदोष,  नपुंसकत्व , गर्भाशयाचे विकार , घशाचे आजार इ.
आजकाल बर्याच लोंकाची life style healthy नसते  त्यामुळे  हॉटेलिंग , fast food , व्यायामाचा अभाव इ. गोष्टींमुळे होणारे आजार पण शुक्राच्या अमलाखाली येतात .
कोणत्याही ग्रहाची एक positive व एक negative  बाजू असते . positive   गोष्टी घेऊन negative गोष्टी टाळाव्यात . 

Monday, 30 December 2013

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! 
हे येणारे नवीन वर्ष तुम्हा सगळ्यांना भरभराटीचे , आनंदाचे ,इच्छापुर्तींचे आणि निरोगी जावो . 

ब्लोग च्या सर्व वाचकांना पण धन्यवाद ! नवीनच सुरु केलेल्या ब्लोग ला चांगला प्रतिसाद मिळाला कि खूप बरे वाटते 
व उत्साह वाढतो . ह्या विषयाशी कायम निगडीत राहावे व अभ्यास पण कायम चालू राहावा तसेच काहीतरी लिखाण करत राहायला हवे ह्या उद्देशाने खरेतर ब्लोग लिहायला लागले . कारण लिहायचं म्हणजे अभ्यास आलाच . मला लिखाणाचा खूपच कंटाळा आहे पण त्यावर मात करण्यासाठी मी ब्लोग लिहिण्याचे  ठरवले तर आहे बघुयात आता माझ्या लिखाणाचा उत्साह ह्या पुढील  वर्षी किती टिकतो ते . 
तुम्ही पण काही संकल्प केले असतील तर ते तडीस जावोत ! 


Friday, 27 December 2013

पत्रिकेतील गुरु

गुरु हा एक शुभ ग्रह आहे . गुरु  विद्या ( शिक्षण ) ,संतती,भाग्य  ह्याचा कारक ग्रह आहे . गुरु माणसाला व्यापक बुद्धी देतो . गुरु हा सद्सदविवेक बुद्धी देतो . गुरु मुळे  मिळालेले ज्ञान हे उथळ नसते . गुरु कोणत्याही गोष्टीचा खोलवर आणि व्यापक व सकारात्मक विचार करायला शिकवतो . गणिती बुद्धी बुध देतो पण कोणत्यही गोष्टीचा मोठ्या प्रमाणावर व अगदी मुळापासून विचार करण्यची क्षमता गुरु मुळे मिळते . गुरु हा प्रपंचाचा कारक ग्रह आहे . गुरु चांगल्या पद्धतीने व सचोटीने प्रपंच करायला लावतो . गुरु हा अध्यात्मिक प्रगतीचा पण कारक ग्रह आहे . गुरु हा ग्रह समाजात मान मिळवून देणारा आहे . गुरु हा एक सत्कर्म करण्यासाठी आपल्याला कायम प्रेरित करणारा ग्रह आहे . अध्यात्मिक पिंड असणाऱ्या लोकांच्या पत्रिकेत गुरूचा प्रभाव दिसून येतो . गुरु माणसाला त्याग शिकवतो .

संतती विषयक प्रश्नाचा विचार करताना पण पत्रिकेत पंचम स्थान , पंचमेश ह्या बरोबरच संतती कारक गुरु ला खूप महत्व आहे . तसेच शिक्षणाचा विचार करताना पण गुरु बघावा लागतो . पत्रिकेतील वक्री किंवा स्तंभी ( motionless ) गुरु शी जर पापग्रहांचे कुयोग असतील तर गुरु ज्या स्थानाचा भावेश आहे त्याचे किंवा  संतती किंवा शिक्षण ह्या दृष्टीने चांगली फळे  मिळत नाहीत .

गुरूची दृष्टी शुभ  असते . गुरु स्वत: च्य स्थानापासून ५, ७, ९ ह्या स्थानाला बघत असतो म्हणजे त्या स्थानांवर व त्या स्थानातील ग्रहांवर गुरूची दृष्टी असते . उदा. समजा गुरु तृतीय स्थानात आहे तर गुरुची दृष्टी तृतीयापासून ५,७,९ म्हणजे सप्तम,नवम व लाभ स्थानांवर व त्या स्थानात असणाऱ्या ग्रहांवर असेल .

बऱ्याच वेळा आपल्याला सध्या गुरुबल नाही किंवा गुरु पाचवा आहे किंवा सातवा आहे असे ऐकू येत असते ते सर्व गोचर ( transit ) गुरू बद्दल असते . गोचरीने जेव्हा गुरु आपल्या जन्म राशीतून जातो त्यावेळेस पहिला गुरु असतो ( बरेच जण   TRANSITS  लग्न कुंडलीकडून पण बघतात ) गोचर आत्ता गुरु मिथुन राशीत आहे म्हणजे मिथुन राशीच्या लोंकाना ( किंवा मिथुन लग्न राशीच्या लोंकाना ) पहिला गुरु आहे . तसेच कर्क राशीच्या लोंकाना ( कर्क लग्न राशीच्या लोंकाना )आत्ता व्ययात गुरु म्हणजे बारावा गुरु आहे असे म्हंटले जाते .

कर्क राशीत गुरु उच्चीचा मानतात मकर राशीत गुरु निचीचा व कन्येत गुरु निर्बली मानतात .
गुरु चा रंग पिवळा व रत्न पुष्कराज आहे .

हि झाली गुरु  ग्रहाबाबत प्राथमिक माहिती . गुरु प्रत्येक स्थानात तसेच प्रत्येक राशीत कोणत्या ग्रहाच्या योगात कशी फळे देतो हा पुढे अभ्यासाचा विषय आहे .
पत्रिका बघताना कोणत्याही एका ग्रहाचा विचार करून चालत नाही पण जेव्हा प्रत्येक ग्रहा बद्दल विचार करू त्यानंतरच समग्र पत्रिकेचा विचार करता येईल . पत्रिकेचा अभ्यास करताना मला नेहिमी हत्तीच्या गोष्टीची आठवण होते म्हणजे आधी शेपूट ,सोंड , पाय असे एक एक अवयव दिसत दिसत मगच पूर्ण हत्त्ती केव्हा दिसतोय याची उत्सुकता असते . पूर्ण हत्तीचा माझा शोध सुरू आहेच …

Sunday, 22 December 2013

कठीण विवाहयोग

हल्ली बऱ्याच वेळा मुलाच्या आईची किंवा परिवारातील लोकांची तक्रार असते कि मुलाला लग्नच करायचे नाही  असे वाटते.  तो स्थळ  बघतच नाहीये . तो स्वत: हून काही ठरवत नाहीये . बर मग लग्न करायचेच नाही असे पण स्पष्ट सांगत पण नाही .

अशाच एका मुलाची हि पत्रिका आहे .

लग्न कुंडली :





कृष्णमुर्ती पद्धती (भावचलित )कुंडली :



पारंपारिक पद्धत : 
तूळ लग्न आहे . सप्तमेश मंगळ आहे . तसेच चंद्र पण  तूळेत आहे . त्यामुळे चंद्राचा सप्तमेश पण मंगळ होतो. 
मंगळ प्रथमस्थानी आहे . त्याची दृष्टी सप्तमावर आहे . शुक्र-राहू युती आहे . शनीची ह्या युतीवर दहावी दृष्टी आहे . पण गुरूची पण दृष्टी शुक्र - राहू युती वर आहे . एकंदर जेव्हा पत्रिकेतील शुक्र राहू च्या युतीत असतो तसेच त्यावर पापग्रहांची
दृष्टी असते व महादशा देखील वैवाहिक सौख्याच्या विरोधात असतात तेव्हा बहुतेक वेळा लग्न होऊनही काही सुख मिळत नाही किंवा मग लग्नच होत नाही . ह्या पत्रीकेच्या बाबतीत मुलाचे वय (३०-३५ च्या दरम्यान ) अजूनही लग्नाचे आहे परंतु एकंदर पत्रिका बघत लग्न होणे कठीणच दिसते आहे .  ते कसे हे कृष्णमुर्ती पद्धतीने पत्रिका पाहिल्यास अजून स्पष्ट होईल . 

कृष्णमुर्ती पद्धत :
सर्वप्रथम पत्रिका कृष्णमुर्ती पद्धतीने तयार केलेली असावी 
ह्या पद्धती प्रमाणे विवाहाच्या प्रश्नासाठी सप्तम स्थानाचा उपनक्षत्र स्वामी बघतात .
ह्या पद्धती प्रमाणे विवाहासाठीचा नियम असा कि 
 "जर जन्मपत्रिकेनुसार सप्तम स्थानाचा उपनक्षत्र स्वामी द्वितीय , सप्तम व लाभ ह्यापेकी किमान एका स्थानाचा कार्येश असून षष्ठ स्थानाचा एकमेव कार्येश नसेल तर २,७,११ ह्या स्थानाच्या दशेत/ अंतर्दशेत विवाह होतो . "
ह्या पत्रिकेत सप्तमाचा उपनक्षत्र स्वामी गुरु आहे . 
गुरुचे कार्येशत्व बघू : गुरु तूळ राशीत आहे परंतु कृष्णमुर्ती पद्धतीप्रमाणे केलेल्या पत्रिकेत बाराव्या स्थानी आहे . गुरूच्या राशी  तृतीय  व षष्ठ भावारंभी आहेत . गुरु राहूच्या नक्षत्रात आहे . राहू अष्टमात आहे . राहू शुक्राच्या युतीत असल्यामुळे शुक्राची फळे देईल . तसेच मिथुन राशीत असल्यामुळे बुधाची पण फळे देईल . 
गुरु ३,६,८,१२
राहू ८
शुक्र १,८ 
बुध ४,५,९,११,१२ ( राहू शुक्राच्या युतीत असल्याने मुख्यत्वे शुक्रचीच फळे देईल ) 
तसेच षष्ठ स्थानात मीन रास आहे . षष्टात एकही ग्रह नाही . षष्टेश गुरूच्या नक्षत्रात एकही ग्रह नाही . तसेच कोणत्याही ग्रहाचा उपनक्षत्र स्वामी पण गुरु नाही त्यामुळे गुरु षष्ठ स्थानाचा एकमेव कार्येश आहे . ह्याचा अर्थ ह्या मुलाचे लग्न होणे कठीण! . 
आता खरे म्हणजे महादशा बघायची पण गरज नाही परंतु कोणत्याही प्रश्नाचा सर्व बाजूने विचार करावा . 
सध्या गुरूची महादश २०१७ पर्यंत आहे . गुरुचे कार्येशत्व वर आले आहेच . गुरु महादश विवाहास SUPPORT करत नसून उलट विरोधाच करत आहे .
आत शनि ची महादशा २०१७ ते २०३६ पर्यंत आहे . शनि लाभत आहे परंतु चंद्राच्या नक्षत्रात आहे चंद्र व्ययात आहे  त्यामुळे शनि व्यय स्थानाची व दशमाची फळे प्रामुख्याने देईल .
शनीचे कार्येशात्व : ४,५,१०,११,१२
 पुढे येणाऱ्या दशा पण विवाहास अनुकूल वाटत नाहीत .
एकंदर विवाह योग कठीणच आहे !
बघुयात पुढे काय होते ते . 

Tuesday, 17 December 2013

पत्रिकेतील चंद्र

चंद्र ह्या ग्रहाला पत्रिकेत खूप महत्व आहे . आपल्यापेकी बर्याच जणांना पत्रीकेविषयी फारशी माहिती नसली तरी आपली रास माहित असते . ह्याचाच अर्थ स्वत: च्या पत्रिकेत चंद्र कोणत्या राशीत आहे हे माहित असते . बर्याच वेळा आपण पेपर किंवा मासिकातील राशिभविष्य सुद्धा वाचत  असतो . तिथे पण बहुतांशी ठिकाणी राशिभविष्य हे चंद्र राशी नुसार दिलेले असते . आता साहजिकच जगातल्या सगळ्या लोंकाचे भविष्य फक्त १२ राशी म्हणजे बारा भागात विभागलेले असते मग ते खरेच बरोबर असेल का? ह्याचे सोपे उत्तर खरे तर ' नाही ' कारण राशिभविष्य लिहिताना फक्त चंद्राचाच विचार केलेला असतो . पत्रिकेतील इतर ग्रह , महादशा , अंतर्दशा , चांगले किंवा वाईट योग ह्याबद्दल प्रत्येक पत्रिकेत वेगळेपणा असतोच . परंतु राशीभविष्य जर चंद्रराशीवरून  असेल तर सध्याचे गोचार ग्रहमान कसे आहे ह्याचा चंद्राकडून विचार करता येतो तसेच जर लग्न राशीवरून असेल तर लाग्नराशिप्रमाणे गोचर भ्रमणाचा अंदाज येतो .

जेव्हा पण साडेसातीबद्दल बोलती किंवा ऐकतो तेव्हा साडेसाती सुद्धा आपल्या राशी प्रमाणेच असते . जेव्हा गोचर शनि जन्मकुंडलीतील चंद्राच्या व्ययात , चंद्रावरून व चंद्राच्या द्वितीय स्थानातून भ्रमण करतो त्यावेळेस साडेसाती आहे असे म्हणतात . ( शनि एका एकाराशीत अडीच वर्षे असतो त्यामुळे एकूण २. ५ +२. ५+२. ५=७. ५ )
उदा . जर एखादा माणूस तूळ राशीचा आहे तर जेव्हा गोचर ( transit ) शनि कन्येत जाईल तिथपासून ह्या माणसास साडेसाती सुरु झाली असे म्हणतात . गोचर शनि कन्या , तूळ , वृश्चिक ह्या राशीतून जाईल तो पर्यंत तूळ राशीला साडेसाती आहे असे म्हणतात एकदा का शनि धनु राशीत गेला कि तुळेची साडेसाती संपली . मग वृश्चिक राशीच्या माणसास साडेसाती सुरु .

चंद्र हा पृथ्वीच्या सगळ्यात जवळचा ग्रह आहे . 'चंद्रम मनसो जात: ' म्हणजे चंद्र मनाचा कारक ग्रह आहे . चंद्र मातेचा कारक ग्रह आहे . साधारणपणे अडीच दिवसात चंद्र रास बदलतो . चंद्राच्या नक्षत्रानुसार महादशांचा क्रम ठरवतात . मुहूर्त शस्त्रात चंद्राला महत्व आहेच . विवाहा संबंधातील गुणमेलन पण चंद्र नक्षत्र वरून करतात .

सर्व प्रकारचे द्रव पदार्थ चंद्राच्या अमलाखाली येतात . विहिरी , तळी , जलाशय , समुद्र ह्या सर्वच चंद्र कारक
आहे .चंद्राची स्वत: ची रास कर्क . वृषभ राशीतील चंद्र उच्च  तसेच वृश्चिक राशीत चंद्र नीच मानला जातो .
निसर्ग कुंडलीत ( म्हणजे मेष लग्नाच्या कुंडलीत ) कर्क  हि चंद्राची रास चतुर्थ स्थानात येते . चंद्रावरून acidity होणे ,रक्तदोष ,अनियमित मासिक  धर्म ,मानसिक त्रास ,निद्रानाश ,मानसिक विकृती ,पचनसंथेचे विकार इ. गोष्टींचा विचार करतात . चंद्राचे रत्न मोती आहे .