Title

Astrology Blog by Anagha Bhade


Tuesday, 31 March 2015

एप्रिल २०१५ राशिभविष्य

श्री . सुनिल देव ह्यांनी लिहिलेले एप्रिल २०१५ चे राशिभविष्य :

राशिभविष्य
एप्रिल २०१५
(के.पी.पद्धतीप्रमाणे)
(टीप : सर्व भविष्य चंद्र राशीप्रमाणे दिली आहेत, पण ज्यांना लग्न रास माहीत आहे त्यांनी जन्म रास व लग्न रास अशी दोन्ही भविष्य वाचावीत.
समजा...चंद्र राशी मिथुन आहे आणि लग्न राशी मीन आहे, तर अशांनी मिथुन आणि मीन अशी दोन्ही राशींची भविष्ये पहावीत आणि समन्वय साधावा. )
मेष : मेष राशीचा स्वामी मंगळ महिन्याच्या सुरुवातीला तुमच्याच राशीत आहे. ज्यांच्या पत्रिकेत मेष लग्न असेल अश्यांना हा महिना उत्साहवर्धक असेल आणि त्यामुळे त्यांचा कामाचा आवाका देखील वाढेल. लग्नी मेष रास असल्यास अष्टम भावात वृश्चिक रास येते, त्यामुळे मानसिक ताण देखील जास्त जाणवू शकेल. द्वितीय भावातील शुक्र तुमच्याच राशीत व केतू बाराव्या स्थानी असल्याने खर्चाचे प्रमाण बरेच वाढेल असे दिसते. तृतीयेश बुध बाराव्या स्थानी व शनि अष्टम स्थानी असल्याने प्रवासाचे बरेच योग येतील पण त्याबरोबर बरेच अडथळे सुद्धा येण्याची शक्यता आहे. चतुर्थात गुरु व केतू-बुध बाराव्या स्थानी असल्याने तुमच्या घरासंबंधी काहीतरी करणे आवश्यक ठरेल, मग ते कागदपत्र, पैसे ह्यासंबंधी अथवा नव्या घराचे पझेशन इ. स्वरूपाचे असू शकेल. पंचमेश रवि बाराव्या भावात असल्याने शेअर अगर तत्सम गुंतवणुकीपासून लांब राहणेच इष्ट! षष्ठातील चंद्र-राहू प्रकृतीसंबंधी थोडी काळजी घेण्याचे सुचवतात. कौटुंबिक स्वास्थ्य/वातावरण उत्तम राहील. दशमेश शनि अष्टमात व रवि बाराव्या स्थानी असल्याने नोकरी करणाऱ्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. एकंदरीत हा महिना संमिश्र स्वरूपाचा दिसतो.
वृषभ : वृषभ राशीचा स्वामी शुक्र बाराव्या स्थानी व रवि लाभात असल्याने हा महिना अतिशय उत्साहवर्धक व कामाच्या बाबतीत उत्तम राहील असे वाटते. द्वितीय स्थानाचा स्वामी बुध पण लाभातच आहे व राहू पंचमात असल्याने तरुण मुलांना प्रेमात पडण्याचे योग आहेत, काही मंडळी त्यात यशस्वी होतील. लाभातील बुध आर्थिक बाबतीत देखील चांगलीच फळे देईल. तृतीय स्थानातील गुरु ज्या लोकांचा व्यवसाय प्रवासाशी संबंधित असेल अश्यांसाठी लाभदायक आहे. गुरु वक्री असल्याने काही लोकांना हा अनुभव कदाचित उशिरा येईल. चतुर्थेश रवि लाभात आणि बुध देखील लाभात विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा महिना उत्कर्षकारक आहे. जितका अभ्यास जास्त तेवढे मार्क जास्त हे गणित नक्कीच लागू पडेल!! मुलाबाळांच्या अभ्यास आणि सर्वसाधारण प्रगतीच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे. षष्ठेश शुक्र बाराव्या स्थानात असल्याने वृषभ राशीच्या लोकांनी खाण्या-पिण्याचे पथ्य सांभाळल्यास प्रकृती चांगली राहील. सप्तमात शनि व सप्तमेश मंगळ बाराव्या स्थानात असल्याने काहींच्या बाबतीत कुटुंबासमवेत छोट्या-मोठ्या प्रवासाचे योग पण आहेत. काहींच्या बाबतीत कौटुंबिक पातळीवर नाराजी जाणवू शकते. लाभात रवि, बुध, केतू हे तीन ग्रह असल्याने व्यवसाय अगर नोकरी ह्या दोन्ही दृष्टीने उत्तम काळ आहे. तसेच आर्थिक लाभ देखील चांगले होतील. एकंदरीत हा महिना वृषभ राशीसाठी सर्व दृष्टीने उत्तम आहे.
मिथुन : मिथुन राशीचा स्वामी बुध दशमात आणि शनि षष्ठात, राहू चतुर्थात हा योग कोणत्याही कार्याला अतिशय उत्तम आहे तरी पण षष्ठ व चतुर्थ ही दोन्ही स्थाने काही बाबतीत त्रासदायक पण असतात. द्वितीय स्थानातील गुरु आर्थिक दृष्ट्या उत्तम आहे. तृतीयेश रवि दशमात व बुध दशमात हे दोन्ही ग्रह तुमच्या पराक्रमाला साथ देतील व तुमच्या हातून लक्षणीय कार्य घडण्याची संभावना आहे. जी मंडळी आधीच सामाजिक कार्यात आहेत, त्यांच्या दृष्टीने त्यांच्या कामाची दखल नक्कीच घेतली जाईल. पंचमेश शुक्र लाभात असल्याने मुलाबाळांच्या दृष्टीने हा काळ अतिशय उत्तम आहे. षष्ठातील शनिमुळे मात्र काहींच्या बाबतीत जुनी दुखणी तोंड वर काढण्याची शक्यता आहे. सप्तमेश गुरु द्वितीयात व बुध दशमात असल्याने कामाचा व्याप बराच राहील व त्याचा परिणाम कौटुंबिक बाबतीत दुर्लक्ष होण्यात दिसून येईल. दशमातील रवि, बुध, केतू व लाभात शुक्र, मंगळ हे दोन्ही योग व्यवसाय अगर नोकरी ह्यांच्या दृष्टीने उत्तम असून अनेक लाभ मिळवून देतील. एकंदरीत मिथुन राशीला हा महिना उत्तम आहे.
कर्क : कर्क राशीचा स्वामी चंद्र महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तृतीय स्थानी, गुरु तुमच्याच राशीत लग्नी, आणि बुध नवम स्थानी त्यामुळे प्रवासाचे योग निश्चित संभवतात. तसेच प्रकृतीच्या दृष्टीने योग चांगले आहेत. द्वितीयेश रवि नवम स्थानी, बुध नवम स्थानी व शुक्र दशमात त्यामुळे आर्थिक दृष्ट्या ज्यांचा शिक्षणाशी संबंध आहे अश्यांसाठी हा काळ उत्तम आहे. तसेच धार्मिक कार्य ज्यांचा व्यवसाय आहे, त्यांच्या व्यवसायाच्या दृष्टीनेही हा काळ चांगला आहे. चतुर्थेश शुक्र दशमात व रवि नवमात हा योग विद्यार्थ्यांना उत्तम आहे. मुलाबाळांच्या प्रगतीच्या दृष्टीने समाधानकारक काळ आहे. सप्तमेश शनि पंचमात वक्री आहे, त्यामुळे कौटुंबिक वातावरण सर्वसाधारण राहील. दशमातील रवि-शुक्र व्यवसाय व नोकरी ह्या दोन्ही दृष्ट्या उत्तम आहे. एकंदरीत हा महिना कर्क राशीसाठी चांगला आहे.
सिंह : सिंह राशीचा स्वामी रवि अष्टमात आणि बुध देखील अष्टमात त्यामुळे शरीर प्रकृतीच्या दृष्टीने थोडा काळजी घेण्याचा काळ आहे. द्वितीयातील राहू आर्थिक दृष्ट्या तितकासा लाभदायक नाही त्यामुळे आर्थिक बाबतीत थोडा कंजूसपणा करण्यास ह्या महिन्यात हरकत नाही. तृतीयेश शुक्र नवमात व रवि अष्टमात ह्या योगामुळे प्रवासात अडथळे येण्याची शक्यता आहे, शक्यतो प्रवास टाळणे श्रेयस्कर! घरासंबंधी ह्या महिन्यात काहीतरी खर्च निघण्याची शक्यता आहे. मुलाबाळांच्या अभ्यासाबाबत जातीने लक्ष घातल्यास अपेक्षित यश मिळेल. घरगुती वातावरण सर्वसाधारण राहील. अष्टमातील तीन ग्रह- रवि, बुध,केतू- नोकरी अगर व्यवसाय करणाऱ्यांना कामात बराच ताण निर्माण करतील. टेक्निकल व्यावसायिकांना मात्र हा महिना आर्थिकदृष्ट्या चांगला आहे. दशमेश शुक्र नवमात व रवि अष्टमात ह्या योगामुळे सरकारी नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठांशी जमवून घेणे इष्ट. एकंदरीत हा महिना सिंह राशीसाठी संमिश्र फळे देईल असे दिसते.
कन्या : कन्या राशीत महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चंद्र व राहू हे दोन्ही ग्रह व अष्टमात मंगळ असल्याने प्रकृतीचा त्रास संभवू शकतो, तरी विशेष काळजी घ्यावी. द्वितीयेश शुक्र अष्टमात व रवि सप्तमात असल्याने ज्यांचा भागीदारीत व्यवसाय असेल त्यांनी आर्थिक बाबतीत काळजीपूर्वक व्यवहार करावेत. तृतीय स्थानात शनि, अष्टमात मंगळ व सप्तमात रवि ही ग्रहस्थिती छोटेमोठे प्रवास दाखवत आहे, मात्र प्रवासात खबरदारी घ्यावी. पंचमेश शनि तृतीयात, रवि सप्तमात मुलाबाळांच्या अभ्यासाच्या दृष्टीने उत्तम आहेत. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील व घरात सुसंवाद राहील. अष्टमातील शुक्र-मंगळ इंजिनिअर्सना थोडाफार कामाचा ताण दाखवतात. लाभातील गुरु सर्वसाधारणपणे नोकरी अगर व्यवसायदृष्ट्या बरा आहे. एकंदरीत हा महिना संमिश्र असला तरीही काही बाबतीत खबरदारी घेणे तेवढेच आवश्यक आहे.
तूळ : तूळ राशीचा स्वामी शुक्र सप्तमात व रवि षष्ठात त्यामुळे अनेक लोकांना प्रकृतीच्या तक्रारी उद्भवतील. रवि आणि शुक्र ह्यांचा संबंध असल्याने हृदयविकार असणाऱ्यांनी खाण्याच्या बाबतीत खबरदारी घ्यावी. द्वितीयातील शनि आर्थिक बाबतीत खूप चांगला नसला तरी काहीतरी लाभ घडवून आणेल. तृतीयेश गुरु दशमात असल्याने तुमच्या कामाचा झपाटा बराच चांगला राहील. ह्या महिन्यात तुमच्या घरात मातुल घराण्यातल्या बऱ्याच मंडळींच्या गाठीभेटी होतील. मुलाबाळांच्या अभ्यासाच्या दृष्टीने महिना उत्तम आहे. षष्ठात रवि-बुध-केतू हे तीन ग्रह प्रकृतीस किरकोळ अपायकारक आहेत, हे वर सांगितले आहेच. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. सप्तमातील शुक्र कौटुंबिक वातावरण उत्तम ठेवेल. मंगळ मात्र अधून-मधून वादविवादाचे प्रसंग आणेल. दशम भावातील गुरु व द्वादश स्थानातील राहू व्यवसाय अगर नोकरीच्या दृष्टीने उत्तम आहेत. मात्र अधूनमधून काही अडथळे आले तरी डगमगून जाऊ नये. एकंदरीत हा महिना प्रकृतीबाबत काळजी सोडता इतर दृष्टीने चांगला आहे.
वृश्चिक : वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ षष्ठात असून केतू पंचमात आहे. शनि तुमच्याच राशीत आहे त्यामुळे वृश्चिक राशीला साडेसाती चालू आहे. प्रकृती संबंधी किरकोळ तक्रारी येऊ शकतील. द्वितीयेश गुरु आर्थिक बाबतीत तितकासा फलदायक होऊ शकणार नाही त्यामुळे आर्थिक व्यवहार जपून करावे. तृतीयेश शनि तुमच्याच राशीत असून वक्रीस्थित असल्याने तरुणांनी कोणत्याही प्रकारचे साहस करण्याचा विचारदेखील करू नये. पंचमातील ग्रह मुलाबाळांच्या प्रगतीच्या दृष्टीने उत्तम आहेत. षष्ठातील शुक्र-मंगळ दोन्ही ग्रह प्रकृतीच्या बाबतीत काळजी करायला लावणारे आहेत. तरीही पंचमातील ग्रह प्रकृतीबाबतच्या तक्रारी लवकर दूर करण्यास कारणीभूत ठरतील. सप्तमेश शुक्र घरगुती वातावरणात किरकोळ वादविवादाचे प्रसंग आणू शकेल, पण तरीही वातावरण ठीक राहील. नवम भावातील गुरु व नवमेश चंद्र एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात धार्मिक स्थळांना भेट देण्याचा योग आणेल. नोकरी-व्यवसायाच्या बाबतीत थोडे जुळवून घेण्याची आवश्यकता आहे. एकंदरीत हा महिना वृश्चिक राशीसाठी संमिश्र आहे असे दिसते.
धनु : धनु राशीचा स्वामी गुरु अष्टमात वक्री आहे व बुध चतुर्थात आहे. ह्याचा परिणाम म्हणजे शरीर प्रकृतीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच वाहन चालवताना देखील काळजी घेणे योग्य राहील. धनेश शनि वक्री असून तो बाराव्या स्थानी आहे, त्यामुळे खर्चाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. चतुर्थात तीन ग्रह व चतुर्थेश गुरु अष्टमात त्यामुळे सर्वसाधारणपणे घराकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. मुलाबाळांच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे. कौटुंबिक वातावरण उत्तम आणि सलोख्याचे राहील असे दिसते. अष्टमेश चंद्र महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात काहीतरी आर्थिक लाभ मिळवून देण्याची शक्यता आहे. दशमेश बुध चतुर्थात, शनि बाराव्या स्थानी व राहू दशमात ही ग्रहस्थिती कामाचा भरपूर ताण दाखवते पण त्यातून तुमच्या कार्याचा गौरव देखील होईल असे दिसते. एकंदरीत हा महिना संमिश्र असून आर्थिक लाभापेक्षा खर्च जास्त अशी परिस्थिती येईल असे दिसते. मात्र कामाच्या बाबतीत बऱ्याच श्रेयाचे मानकरी व्हाल.
मकर : मकर राशीचा स्वामी शनि लाभ स्थानी असून तो वक्री आहे. शरीर प्रकृतीला तेवढा त्रासदायक नसला तरी लाभदायक देखील नाही. द्वितीयेश देखील शनि असल्याने आर्थिक लाभात बऱ्याच प्रमाणात दिरंगाई होण्याची शक्यता आहे. तृतीयातील तीन ग्रह तुम्हाला बऱ्याच प्रमाणात उत्साही ठेवतील असे दिसते. काहींच्या बाबतीत लहान-सहान प्रवासाची शक्यता आहे किंवा काही लोकांची बदली देखील संभवते. घरातील वातावरण आनंदी राहील. काही लोक नवीन घर बुक करतील. मुलाबाळांच्या प्रगतीच्या दृष्टीने महिना चांगला आहे, त्यांच्या अभ्यासात लक्ष घातल्यास उत्तम यश प्राप्त होईल. सप्तमातील गुरु घरात किरकोळ वादाचे प्रसंग आणेल. काही लोकांना जमिन विक्रीतून मनासारखे लाभ होण्याचे योग आहेत. एकुणात हा महिना चांगला आहे असे दिसते.
कुंभ : कुंभ राशीचा स्वामी शनि दशमात आहे व तो वक्री आहे. शास्त्राप्रमाणे ग्रह वक्री असण्याचा परिणाम जर काही झाला नाही तर अतिशय उत्तम योग आहे. अश्या लोकांच्या हातून कोणत्यातरी चांगल्या कामाची मुहूर्तमेढ होण्याची शक्यता आहे. द्वितीयेश गुरु षष्ठात व द्वितीयातील तीन ग्रह द्वितीय स्थानात ह्यामुळे आर्थिकदृष्ट्या उत्तम योग आहे, अनेक लोकांना बरेच आर्थिक लाभ होतील. तृतीय भावातील शुक्र व मंगळ प्रवासाचे योग दाखवत आहेत, काहींना लांबचे प्रवास देखील घडू शकतील. पंचमेश बुध द्वितीय स्थानात शेअरच्या बाबतीत लाभ दाखवत आहे, पण शनि वक्री असल्याने आधी थोडक्या प्रमाणात प्रयोग करून पाहावा. मुलाबाळांच्या दृष्टीने उत्तम काळ आहे. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. अष्टमातील राहू अनपेक्षित धनलाभ मिळवून देईल. ज्या व्यक्तींची पेन्शन मिळायची असेल ह्या महिन्यात हे काम मार्गी लागण्याचे उत्तम योग आहेत. दशमेश मंगळ तृतीयात व दशमात शनि हा योग तुमच्या कामाच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे. बऱ्याच लोकांना प्रमोशन अगर आर्थिक प्राप्ती होईल. एकंदरीत आर्थिक दृष्ट्या आणि इतर सर्व दृष्ट्या हा महिना कुंभ राशीच्या लोकांना उत्तम जाईल.
मीन : मीन राशीचा स्वामी गुरु पंचमात, शनि नवमात व लग्नी रवि-केतू ही ग्रहस्थिती अध्यात्मिक कार्याला अगर ध्यानधारणेसाठी अतिशय उत्तम आहे. ज्यांना धार्मिक कार्याची आवड आहे अश्यांनी या संधीचा जरूर फायदा करून घ्यावा. लग्नी रवि असल्याने प्रकृती उत्तम राहील, तरीही ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे अश्यांनी थोडे जपून राहावे. द्वितीय स्थानातील मंगळ आर्थिक लाभाच्या दृष्टीने तेवढा चांगला नाही, पण शुक्र मात्र काही प्रमाणात आर्थिक लाभ मिळवून देईल. विशेषत: ज्यांचा संबंध शिक्षण, लेखन व्यवसाय, पुस्तके अगर सौंदर्य प्रसाधने ह्या क्षेत्रांशी असेल त्यांना निश्चित लाभदायक आहे. घरातील वातावरण मनमोकळे राहील. तसेच मुलाबाळांच्या अभ्यासातील प्रगती उत्तम राहील. सप्तमातील राहू काही बाबतीत किरकोळ स्वरूपाचे मतभेदाचे प्रसंग उभे करू शकेल. दशमेश गुरु पंचमात असल्याने काही लोकांच्या बाबतीत बदली अगर नवीन नोकरीचे विचार असे योग आहेत. एकंदरीत हा महिना आर्थिक बाबतीत संमिश्र स्वरूपाचा तर इतर दृष्टीने उत्तम आहे.

No comments:

Post a Comment