Title

Astrology Blog by Anagha Bhade


Friday, 1 April 2016

राशिभविष्य एप्रिल २०१६

सुनिल देव ह्यांनी लिहिलेले :
खालील भविष्य लग्न राशीनुसार दिलेले आहे . ज्यांना लग्न रास माहित नाही त्यांनी चंद्रराशीप्रमाणे वाचावे . ज्यांना लग्न रास व चंद्र रास दोन्ही माहित आहे त्यांनी दोन्ही भविष्य वाचून समन्वय साधावा .

एप्रिल २०१६
(के.पी.पद्धतीप्रमाणे)

मेष : मेष राशीचा स्वामी मंगळ अष्टमात स्वराशीत आहे. एका दृष्टीने अष्टमेश अष्टमात आहे हे चांगलेच! पण त्याच्या जोडीला शनि पण अष्टमात आहे व तो दशमेश आहे. त्यामुळे काही लोकांना त्यांच्या कामामुळे मानसिक ताण येण्याची बरीच शक्यता आहे. द्वितीयेश शुक्र बाराव्या भावात आणि गुरु पंचमात त्यामुळे करमणूक अगर मुलांवर बराच खर्च होण्याची शक्यता आहे. द्वितीय स्थान हे धनस्थान असल्याने आर्थिक बाजूकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे. तृतीयातील बुध बाराव्या स्थानात असल्याने अनेकांना प्रवास होण्याची बरीच शक्यता आहे. चतुर्थेश चंद्र दशमात आणि गुरु पंचमात त्यामुळे मनोरंजन क्षेत्रातील मंडळींना व कलाकारांना व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ चांगला आहे. काही लोकांना मात्र गुरु वक्री असल्याने गुरु मार्गी होईपर्यंत वाट बघावी लागेल. पंचमेश रवि बाराव्या स्थानात व बुध पण तिथेच असल्याने लॉटरी किंवा शेअर्स असे व्यवहार शक्यतो टाळावेत, नुकसान होण्याची बरीच शक्यता आहे. गुरु पंचमात हा मुलांच्या अभ्यासाच्या व इतर प्रगतीच्या दृष्टीने चांगला आहे. षष्ठेश बुध बाराव्या स्थानी आहे व तो तृतीयेश पण आहे त्यामुळे आर्थिकदृष्ट्या खर्च बराच होईल, तेव्हा जपून खर्च करावा. सप्तमेश शुक्र देखील बाराव्या स्थानी आहे व गुरु पंचम स्थानी हा योग ध्यानधारणा आणि इतर धार्मिक कार्यास उत्तम आहे. काही लोकांना परदेश प्रवासाची पण शक्यता आहे. नवमेश गुरु पंचमात व शुक्र द्वादश स्थानी त्यामुळे हे ग्रहयोग ध्यानधारणेसाठी उत्तम आहेत. तसेच अनेक लोकांना परदेशप्रवासाचे प्रबळ योग आहेत. दशमेश शनि अष्टमात आणि चंद्र दशमात त्यामुळे महिन्याचा पहिला-दुसरा आठवडा चांगला जाईल, नंतर काहींना नोकरी बदलाच्या संधी येतील तर काहींना आर्थिक अपव्ययाला सामोरे जावे लागेल. एकंदरीत हा महिना संमिश्र असेल.
वृषभ : वृषभ राशीचा स्वामी शुक्र लाभात व गुरु चतुर्थात त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांची प्रकृती चांगली राहील, तसेच घरासंबंधी चांगली घटना घडेल. एकंदरीत सर्व गोष्टी मनासारख्या घडण्याचा काळ आहे! द्वितीयेश बुध लाभ स्थानी व शनि सप्तमात त्यामुळे ज्यांचे स्वत:चे व्यवसाय आहेत त्यांना देखील हा काल आर्थिकदृष्ट्या उत्तम आहे. तृतीयेश चंद्र नवम स्थानी त्यामुळे अनेकांना पहिल्याच आठवड्यात लांबच्या प्रवासाची संधी प्राप्त होईल. तसेच नवम हे भाग्य स्थान असल्याने गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडतील. चतुर्थेश रवि लाभ स्थानात घरासंबंधी सुवार्ता आणेल. तसेच ज्या व्यक्ती स्वत: शिक्षण घेत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ चांगला आहे. पंचमेश बुध लाभ स्थानात त्यामुळे मुलांच्या परीक्षेची अगर निकालाची काळजी करण्याचे कारण नाही, निश्चितपणे सुयश मिळेल. षष्ठेश शुक्र लाभात व गुरु पंचमात त्यामुळे अनेक बाबतीत आर्थिक लाभ होतील, विशेषत: व्यावसायिकांना! सप्तमात मंगळ आणि शनि असल्याने जोडीदाराबरोबर समझोता करणेच उत्तम! वादविवादाचे प्रसंग टाळल्यास घरात शांतता राहील. दशमेश शनि सप्तमात व बुध लाभात त्यामुळे व्यावसायिकांना हा काळ अतिशय उत्तम आहे. एकंदरीत वृषभ राशीला हा महिना अतिशय चांगला आहे.
मिथुन : मिथुन राशीचा स्वामी बुध दशम स्थानी व शनि षष्ठात शरीर प्रकृतीच्या दृष्टीने फारशी काळजी करण्याचे कारण नाही. दशमातील ग्रह तुम्हाला सामाजिक स्थान वाढवण्यास मदतच करतील. द्वितीयेश चंद्र अष्टमात व गुरु तृतीयात त्यामुळे हा योग तेवढा चांगला नाही, पहिल्या आठवड्यात वाहन चालवताना काळजी घ्यावी, तसेच आर्थिक व्यवहार देखील सावधपणे करावेत. तृतीयात गुरु, राहू व तृतीयेश रवि दशमात हा ग्रहयोग तुम्हाला भरपूर उर्जा देईल. तसेच नोकरी करणाऱ्या अनेक लोकांना प्रमोशन मिळण्याचे बरेच चान्सेस आहेत. चतुर्थेश बुध दशमात व शनि षष्ठात त्यामुळे शिक्षक किंवा पुस्तक विक्रेते अश्या शिक्षणाशी संबंधित लोकांना अतिशय लाभदायक काळ आहे मात्र शनि वक्री असल्याने थोडा खंड पडू शकेल. पंचमेश शुक्र दशमात त्यामुळे मुलांच्या निकालाची काळजी राहणार नाही. कलाकारांना हा काळ चांगला आहे, चित्रकारांना प्रदर्शनाच्या संधी प्राप्त होतील. अनेक लेखकांची पुस्तके प्रकाशित होण्याची देखील बरीच शक्यता आहे. षष्ठात मंगळ व शनि असल्याने काहींना उष्णतेचे विकार किंवा सांधेदुखी, दातदुखी ह्यासारख्या तक्रारी संभवू शकतात. सप्तमेश गुरु तृतीयात आणि शुक्र दशमात त्यामुळे जोडीदाराशी काही बाबतीत मतभेद होण्याची शक्यता आहे, पण व्यावसायिकांना हा योग चांगला आहे. ज्या लोकांच्या कोर्ट केसेस चालू असतील निकाल त्यांच्या बाजूने लागेल. ज्या व्यक्ती धार्मिक संस्थांच्या विश्वस्तपदी आहेत, त्यांची प्रमुखपदी निवड होण्याची शक्यता आहे. एकंदरीत हा महिना मिथुन राशीला सर्व बाजूंनी उत्तम आहे.
कर्क : कर्क राशीचा स्वामी चंद्र सप्तमात व गुरु द्वितीयात तुमच्या जोडीदाराला आर्थिक लाभ होण्याची बरीच शक्यता आहे. तसेच गुरु षष्ठेश आणि द्वितीयात असल्याने ज्यांना डायबेटीस आहे अश्या व्यक्तींनी प्रकृतीची काळजी घ्यावी. द्वितीय स्थानात गुरु व राहू हे दोन ग्रह व द्वितीयेश रवि नवमात असल्याने धार्मिक कार्यासाठी खर्च होण्याची शक्यता आहे, कदाचित त्यासाठी प्रवास देखील घडेल. तृतीयेश बुध नवमात त्यामुळे वरील गोष्टीला पुष्टी मिळते. चतुर्थाचा स्वामी शुक्र नवमात व शुक्र लाभेश आहे त्यामुळे ज्या व्यक्तींना पी.एच.डी. आणि तत्सम उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळवण्यात रस आहे, त्यांना उत्तम संधी आहे. तसेच घरातील वातावरण देखील पोषक व आनंदी राहील. पंचमेश मंगळ पंचमात तसेच शनि पण तिथेच हा योग ध्यानधारणेसाठी अतिशय उत्तम आहे. ज्यांना ह्यात विशेष रस व गती आहे अश्यांनी ह्याचा जरूर फायदा करून घ्यावा निश्चित यश मिळणार! तसेच मुलांच्या प्रगतीच्या दृष्टीने देखील उत्तम योग आहे. षष्ठेश गुरु द्वितीय स्थानी व शुक्र नवम स्थानी आर्थिक बाबतीत थोडी निराशा होण्याची शक्यता आहे. सप्तमात चंद्र व सप्तमेश शनि पंचमात व बुध नवमात घरातील वातावरण निश्चितपणे आनंदी राहील व जोडीदाराशी उत्तम संवाद राहतील. अष्टमात केतू व अष्टमेश शनि पंचमात व बुध नवमात हा ग्रहयोग अष्टम स्थानाच्या फळाच्या दृष्टीने उत्तम आहे, कोणताही मानसिक ताण जाणवणार नाही. दशमेश मंगळ पंचमात त्यामुळे नोकरी अगर व्यवसाय करणाऱ्यांची परिस्थिती जैसे थे राहील. एकंदरीत हा महिना आर्थिकदृष्ट्या नसला तरी धार्मिक कार्य आणि मानसिक समाधान ह्या दृष्टीने उत्तम आहे!
सिंह : सिंह राशीचा स्वामी रवि अष्टमात आहे बुध देखील अष्टमातच आहे, त्यामुळे अनेक बाबतीत मानसिक ताण जाणवेल असे दिसते. त्यातल्या त्यात गुरु लग्नी असल्याने थोडा दिलासा वाटेल. द्वितीयेश बुध अष्टमात आणि शनि चतुर्थात त्यामुळे वाहने सावधगिरीने चालवावीत. तसेच घरासंबंधी पण खर्च उद्भवू शकतो. तृतीयेश शुक्र अष्टमात व गुरु प्रथमात त्यामुळे प्रवासात देखील काळजी घ्यावी लागेल. शक्य झाल्यास प्रवास टाळावा हे उत्तम! मात्र नातेवाईकांची गाठभेट होण्याची शक्यता आहे. चतुर्थात मंगळ आणि शनि आणि चतुर्थेश मंगळ देखील तिथेच त्यामुळे घरगुती बाबतीत देखील परिस्थिती आनंदी राहणे अवघड आहे. पंचमेश गुरु लग्नी आणि शुक्र अष्टमात ज्यांचे शेअर्स आणि तत्सम व्यवसाय आहेत त्यांनी व्यवहारात सावधगिरी बाळगावी. षष्ठात चंद्र व षष्ठेश शनि चतुर्थात आणि बुध अष्टमात त्यामुळे प्रकृतीस थोडे जपावे. सप्तमात केतू आणि सप्तमेश शनि चतुर्थात, गुरु लग्नात ह्यामुळे घरगुती वातावरण ठीक राहील. दशमेश शुक्र अष्टमात आणि गुरु लग्नी, नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठांशी नमते घ्यावे हेच योग्य! ह्या महिन्यातील आर्थिक आवक सर्वसाधारण राहील. एकंदरीत हा महिना सिंह राशीला संमिश्र आहे, तरी अनेक बाबतींमध्ये सावधानता बाळगावी.
कन्या : कन्या राशीचा स्वामी बुध सप्तमात आणि शनि तृतीयात त्यामुळे काही लोकांना छोट्या मोठ्या करमणुकीच्या प्रवासाची शक्यता आहे. द्वितीयेश शुक्र देखील सप्तमात आहे आणि गुरु द्वादश स्थानी आहे, त्यामुळे खर्चाचे प्रमाण बऱ्यापैकी वाढेल. तृतीयात मंगळ आणि शनि, तृतीयेश मंगळ तिथेच त्यामुळे प्रकृतीच्या दृष्टीने उत्तम योग आहेत. लेखकांना देखील हा काळ चांगला आहे फक्त मंगळामुळे कदाचित लिखाणात तीव्रता येण्याची शक्यता आहे, ती टाळल्यास उत्तम अन्यथा वादाचे प्रसंग उद्भवतील. चतुर्थेश गुरु बाराव्या स्थानी आणि शुक्र सप्तमात त्यामुळे काही लोकांना (नोकरीनिमित्त, काही काळ) घरापासून लांब राहण्याचा प्रसंग येईल. पंचमेश शनि तृतीयात आणि शुक्र सप्तमात आणि मंगळ पण पंचमात काही तरुणांचे प्रेमसंबंध जुळण्याची शक्यता आहे. तसेच मुलांच्या दृष्टीने देखील हा योग उत्तम आहे. षष्ठेश शनि तृतीयात, शुक्र सप्तमात त्यामुळे कोर्ट-कचेरीची कामे लांबणीवर टाकावीत, अन्यथा निकाल विरुद्ध गटाच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे. सप्तमात तीन ग्रह रवि, शुक्र, बुध असल्याने जोडीदाराशी उत्तम जमेल व घरातील वातावरण आनंदी राहील. अष्टमेश मंगळ तृतीयात त्यामुळे वाहने जपून चालवावीत. नवमेश शुक्र सप्तमात आणि गुरु बाराव्यात त्यामुळे आधी नमूद केलेले प्रवास धार्मिक कार्यासाठी होण्याची बरीच शक्यता आहे. दशमेश बुध सप्तमात आणि शनि तृतीयात त्यामुळे ज्यांचे किरकोळ व्यवसाय आहेत अश्या लोकांचे व्यवसाय उत्तम चालतील. लाभेश चंद्र पंचमात त्यामुळे ज्यांचा करमणुकीसंबंधी व्यवसाय आहे...अश्यांचा पण व्यवसाय उत्तम चालेल. तसेच शेअर्स बाबतीत पण काही प्रमाणात लाभ दाखवत आहे. एकंदरीत हा महिना कन्या राशीचा चांगला आहे.
तूळ : तूळ राशीचा स्वामी शुक्र षष्ठात आणि गुरु लाभात त्यामुळे आर्थिक दृष्ट्या हा योग अतिशय चांगला आहे. द्वितीयात शनि, मंगळ, द्वितीयेश मंगळ देखील तिथेच, राहू लाभात, रवि षष्ठात त्यामुळे धनप्राप्तीच्या दृष्टीने अतिशय दुर्मिळ योग आहे (लॉटरी देखील लागण्याची शक्यता आहे!) तृतीयेश गुरु लाभात असल्याने वैचारिक लेखकांकडून उत्तम लेख लिहिले जातील. तसेच तूळ राशीच्या भाऊ-बहिणींना देखील हा काळ उत्तम आहे. चतुर्थेश शनि द्वितीयात, चंद्र चतुर्थात आणि बुध षष्ठात त्यामुळे घरासंबंधी चांगली घटना घडण्याची शक्यता आहे. तसेच काहींच्या मातोश्रींना प्रवासाचे योग पण आहेत. पंचमात केतू कुंभ राशीत आणि पंचमेश शनि द्वितीय स्थानी, बुध षष्ठात, गुरु लाभात त्यामुळे मुलांच्या बाबतीत काही चांगली घटना घडेल. शेअर्सचा व्यवहार करणाऱ्यांना लाभाची शक्यता आहे तर काहींना तोटा पण संभवतो. षष्ठात रवि, बुध, शुक्र तीन ग्रह, षष्ठेश गुरु लाभात आर्थिकदृष्ट्या उत्तम काळ आहे. तीन ग्रह षष्ठात असल्याने प्रकृतीसंबंधी काही तक्रारी उद्भवतील, तरी काळजी घ्यावी. सप्तमेश मंगळ द्वितीयात, त्यामुळे अनेक विवाहेच्छू लोकांचे विवाह ठरण्याची देखील शक्यता आहे. पण विवाहाचा कारक शुक्र षष्ठात असल्याने शुक्र मेष राशीत जाईपर्यंत वाट पाहिल्यास उत्तम. अष्टमेश शुक्र षष्ठात व गुरु लाभात हा योग पार्टनरशीपचा व्यवसाय असणाऱ्यांना उत्तम आहे. दशमेश चंद्र चतुर्थात असल्याने व्यवसाय अगर नोकरीसाठी उत्तम काळ आहे. एकंदरीत तूळ राशीला हा महिना अतिशय उत्तम आहे!
वृश्चिक : वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ वृश्चिक राशीतच आणि शनि पण तिथेच प्रकृतीच्या दृष्टीने थोडी सावधगिरी बाळगावी. द्वितीयेश गुरु दशमात आणि शनि प्रथमात योग चांगला असूनही तो फलदायी होण्याची शक्यता कमी कारण दोन्ही ग्रह वक्री आहेत. काही वेळा हा चुकलेला योग शनि मार्गी झाल्यावर फलदायी होतो, तोपर्यंत वाट बघावी लागेल. तृतीयात चंद्र, तृतीयेश शनि लग्नी त्यामुळे काही लोकांना प्रवासाचे योग आहेत. चतुर्थात केतू शनीच्या राशीत आणि बुध पंचमात त्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील. पंचमात तीन ग्रह रवि, बुध आणि शुक्र व पंचमेश गुरु दशमात त्यामुळे मुलांसंबंधी एखादी चांगली घटना घडेल. षष्ठेश मंगळ लग्नी असल्याने उष्णतेचे विकार संभवतात, तसेच ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे अश्यांनी देखील काळजी घ्यावी. सप्तमेश शुक्र पंचमात आणि गुरु दशमात त्यामुळे जोडीदाराशी सुखसंवाद होतील. तसेच पंचमातील तीन ग्रह घरातील वातावरण आनंदी ठेवणार आहेतच. नवमेश चंद्र तृतीयात आणि गुरु दशमात त्यामुळे अनेक लोकांना कामासंबंधी प्रवास करावा लागेल असे दिसते. दशमातील गुरु, राहू व पंचमात रवि, शुक्र नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल, पण ज्यांचा इव्हेन्ट मॅनेजमेंट च्या व्यवसायाशी संबंध आहे अश्यांना काळ उत्तम आहे. एकंदरीत हा महिना प्रकृतीबाबत सावधगिरी बाळगण्याव्यतिरिक्त इतर गोष्टींसाठी चांगला आहे.
धनु : धनु राशीचा स्वामी गुरु नवमात आणि शुक्र चतुर्थात त्यामुळे ज्यांना अध्यात्मिक विषयाची आवड आहे अश्यांना हा योग चांगला आहे. प्रकृतीच्या दृष्टीने हा काळ चांगला आहे. द्वितीयातील चंद्र महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अचानक धनलाभ करून देईल असे वाटते. तृतीयात केतू, शनि बाराव्यात लांबच्या प्रवासाचे योग आहे, मात्र शनि वक्री असल्याने प्रवास लांबणीवर पडू शकतात. चतुर्थात रवि, बुध, शुक्र हे तीन ग्रह त्यामुळे घरगुती बाबतीत जास्त रस घेतला जाईल. घरातील वातावरण उत्तम राहील. मुलांच्या बाबतीत हा काळ ठीक आहे. षष्ठेश शुक्र चतुर्थात व गुरु नवम स्थानी नोकरी करणाऱ्यांना जैसे थे परिस्थिती राहील. सप्तमेश बुध चतुर्थात आणि शनि बाराव्या स्थानी त्यामुळे घरात किरकोळ कुरबुरी होण्याची शक्यता आहे. अष्टमेश चंद्र द्वितीय स्थानी धनलाभाची शक्यता बरीच आहे. नवमात गुरु, राहू त्यामुळे धार्मिक कार्यासाठी वा ध्यानासाठी उत्तम काळ आहे. दशमेश बुध चतुर्थात आणि शनि बाराव्यात त्यामुळे नोकरी अगर व्यवसायाच्या दृष्टीने परिस्थितीत बदल होणार नाही. लाभेश शुक्र चतुर्थ स्थानी ज्यांचा व्यवसाय वाहन अगर रिअल इस्टेट संबंधित आहे, अश्यांना हा महिना चांगला आहे. एकंदरीत धनु राशीला अचानक धनलाभ वगळता हा महिना संमिश्र राहील.
मकर : मकरेचा स्वामी शनि लाभात, चंद्र मकरेतच त्यामुळे शरीर प्रकृती छान राहील, मन उल्हासित राहील. चंद्रामुळे अनेक गोष्टी कराव्याश्या वाटतील. द्वितीयेश शनि पण लाभातच त्यामुळे आर्थिक लाभ संभवतो. मात्र शनि वक्री असल्याने विलंब होण्याची शक्यता आहे. तृतीयात तीन ग्रह रवि, बुध, शुक्र, त्यामुळे अनेक लोकांना छोटे पप्रवास होण्याची बरीच शक्यता आहे. लेखक आणि कलाकारांना सुद्धा हा काळ अतिशय उत्तम आहे. चतुर्थेश मंगळ लाभात त्यामुळे अनेकांना घरासंबंधी निश्चितपणे फायदा दिसतो आणि घरगुती वातावरण देखील आनंदी राहील. पंचमेश शुक्र तृतीयात मुलाबाळांचे शिक्षणासंबंधी चांगले निकाल हाती लागतील. तसेच शेअरचा व्यवहार करणाऱ्यांना देखील हा काळ चांगला आहे. षष्ठेश बुध तृतीयात त्यामुळे प्रकृती उत्तम राहील, काळजी नसावी. सप्तमेश चंद्र लग्नी त्यामुळे जोडीदाराशी उत्तम जमेल. गुरु अष्टमात, शुक्र तृतीयात वाहन चालवताना काळजी घ्यावी. दशमेश शुक्र तृतीय स्थानी त्यामुळे काही लोकांच्या कामाची दखल घेतली जाईल व मान-सन्मान मिळण्याची देखील शक्यता आहे. एकंदरीत हा महिना मकर राशीला अतिशय उत्तम आहे.
कुंभ : कुंभ राशीचा स्वामी शनि दशम भावात व बुध द्वितीय स्थानात त्यामुळे काही लोकांना पगाराव्यतिरिक्त आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. शनि वक्री असल्याने विलंब संभवू शकतो. द्वितीय स्थानात रवि, बुध, शुक्र ह्या तीन ग्रहांमुळे अनेक मार्गांनी आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तृतीयेश मंगळ दशमात त्यामुळे तुम्हाला खूप उत्साही वाटेल. चतुर्थेश शुक्र द्वितीय स्थानात व गुरु सप्तम स्थानात विवाहेच्छुंचे विवाह ठरण्याची शक्यता आहे. पंचमेश बुध द्वितीय स्थानात व शनि दशम स्थानी हा योग कलाकारांना उत्तम आहे. मुलाबाळांच्या दृष्टीने देखील हा काळ उत्तम आहे. षष्ठेश चंद्र बाराव्या स्थानी काही लोकांना अचानक खर्च उद्भवण्याची शक्यता आहे. सप्तमात गुरु आणि शुक्र द्वितीयात त्यामुळे जोडीदाराशी सुख संवाद होतील, राहू देखील तिथेच असल्याने थोडे समजुतीने घेतल्यास वातावरण उत्तम राहील. नवमेश शुक्र द्वितीय स्थानी त्यामुळे काही लोकांना उच्च शिक्षणासाठी योग्य संधी मिळेल. दशमात मंगळ व शनि तिथेच नोकरी अगर व्यवसायात चांगल्या संधी मिळतील. लाभेश गुरु सप्तमात आणि शुक्र द्वितीयात त्यामुळे आर्थिकदृष्ट्या उत्तम काळ आहे. द्वादाशात चंद्र व द्वादाशेश शनि दशमात काही लोकांना परदेशात नोकरी मिळण्याचे पण बरेच चान्सेस आहेत. तसेच व्यावसायिक लोकांना पण परदेशातून काम मिळण्याची शक्यता दिसते. एकंदरीत कुंभ राशीला हा महिना उत्तम आहे.
मीन : मीन राशीला रवि, बुध आणि शुक्र तीन ग्रह असल्याने आणि शुक्र उच्चीचा असल्याने तुमची प्रकृती उल्हासित आणि उत्तम राहील. राशीस्वामी गुरु षष्ठ स्थानी असला तरी त्याचा प्रभाव जाणवणार नाही. द्वितीयेश मंगळ नवम स्थानी आणि शनि पण नवम स्थानी त्यामुळे आर्थिक आवक मध्यम राहील. तृतीयेश शुक्र लग्नी, लेखकांना लिखाणासाठी उद्युक्त करेल. ह्याशिवाय काहींना नातेवाईकांची भेट होण्याचे देखील योग आहेत. चतुर्थेश बुध लग्नी असल्याने घरातील वातावरण आनंदी राहील. पंचमेश चंद्र लाभात आणि रवि लग्नी त्यामुळे कलाकार, लेखकांना उत्तम काळ आहे, कलाकारांचे प्रदर्शन भरण्याचे देखील योग आहेत. षष्ठात गुरु, राहू आणि षष्ठेश रवि लग्नी प्रकृतीच्या दृष्टीने एवढे त्रासदायक नाहीत. सप्तमेश बुध लग्नी आणि शनि नवमात हा योग घरातील वातावरण आणि जोडीदाराशी संबंध आनंदी ठेवील. अष्टमेश शुक्र लग्नी शिवाय तो तृतीयेश त्यामुळे वाहन चालवताना सावधगिरी बाळगावी. नवमात शनि, मंगळ आणि बुध लग्नी त्यामुळे तुम्ही केलेल्या कामाची दखल घेतली जाईल. दशमेश गुरु षष्ठात व शुक्र लग्नी उच्चीचा त्यामुळे आर्थिक आवक चांगली राहील. लाभात चंद्र आणि लाभेश शनि नवमात त्यामुळे धार्मिक कार्यासंबंधी सहभाग राहील. चंद्रामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात काही लाभ होण्याची देखील शक्यता आहे. एकंदरीत हा महिना मीन राशीला उत्तम आहे.

No comments:

Post a Comment