Title

Astrology Blog by Anagha Bhade


Saturday, 26 April 2014

साडेसाती - शनि महाराजांचे ऑडिट

बऱ्याच लोकांना पत्रिकेबद्दल फारसे माहित नसले तरी साधारणपणे स्वत: ची रास माहित असते आणि रास माहिती असण्याचा उपयोग म्हणजे मुख्यत्वे राशी भविष्य वाचण्यासाठी  होतो नाहीतरी ' मला साडेसाती कधी आहे ? ' हे  बघण्यासाठी होतो . स्वत: च्या आयुष्यात जरी काही मनासारखे होत  नसेल , तब्येतीच्या काही तक्रारी असतील नाहीतर आर्थिक प्रोब्लेम्स सगळ्या अप्रिय गोष्टींचा आणि मनस्तापाचा सबंध लोक बर्याच साडेसातीशी  लावत असतात .

सगळ्यात आधी साडेसाती म्हणजे काय ते पाहू ,

जेव्हा गोचर शनि जन्मकुंडलीतील चंद्राच्या व्ययात , चंद्रावरून व चंद्राच्या द्वितीय स्थानातून भ्रमण करतो त्यावेळेस साडेसाती आहे असे म्हणतात . ( शनि एका एकाराशीत अडीच वर्षे असतो त्यामुळे एकूण २. ५ +२. ५+२. ५=७. ५ )
उदा . जर एखादा माणूस तूळ राशीचा आहे तर जेव्हा गोचर ( transit ) शनि कन्येत जाईल तिथपासून ह्या माणसास साडेसाती सुरु झाली असे म्हणतात . गोचर शनि कन्या , तूळ , वृश्चिक ह्या राशीतून जाईल तो पर्यंत तूळ राशीला साडेसाती आहे असे म्हणतात एकदा का शनि धनु राशीत गेला कि तुळेची साडेसाती संपली . मग वृश्चिक राशीच्या माणसास साडेसाती सुरु .

साडेसाती मध्ये वाईटच होते असे काही नाही . बर्याच वेळा साडेसाती मध्ये जबादारी वाढते  अर्थात चांगल्या अर्थाने म्हणजे लग्न होणे मुल होणे इ. पण साडेसातीच्या साडेसात वर्षांमध्ये होणार्या वाईट घटनांचा सबंध फक्त शनीची अवकृपा  म्हणून लावला जातो  .साडेसाती म्हणजे शनीचे audit ! तुम्ही केलेल्या चांगल्या व वाईट कर्मांचा तुमच्यावर होणारा परिणाम . नुसती साडेसाती आहे म्हणून त्रास होईल असे नाही तर  समजा दशा ,गोचर ग्रह हे पण जर विरोधात असतील तर साडेसातीचा त्रास होतो . तसेच तुमच्या पत्रिकेत जर तुमच्या राशीत ( म्हणजे चंद्र रास ) , चंद्राच्या मागच्या किंवा पुढच्या स्थानात जास्त ग्रह असतील किंवा साडेसाती दरम्यान शनीची दृष्टी ज्या स्थानावर पडणार आहे तिथे खूप ग्रह असतील तर साडेसाती मध्ये शनि तेवढ्या ग्रह वरून भ्रमण करेल व त्या स्थानावर दृष्टी टाकेल व त्रास कदाचित जास्त होईल . उदा : जर तूळ रास आहेत जन्मपत्रिके मध्ये जास्त ग्रह तुळेत ,कन्येत किंवा वृश्चिकेत असतील तर साडेसातीचा त्रास कदाचित जास्त होईल ( परत दशा बाकी गोचर हे बघावे लागेलच ) .


चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे त्यामुळे जेव्हा गोचर शनि तुमच्या जन्म राशीतून म्हणजे चंद्रावरून भ्रमण करतो (साडेसातीमधील मधली अडीच वर्षे )तेव्हा मानसिक त्रास तणाव शनि निर्माण करतो तुम्ही त्याच्या ह्या कसोटीतून चांगले तावून सुलाखून बाहेर येता  . अहंकार असणाऱ्या माणसाना अशा वेळेस  खुप त्रास होतो पण जो माणूस आधीपासूनच जमिनीवर आहे  . ' मी , माझे , माझ्यामुळे ' ह्या  शब्दांपासून लांब आहे त्याला शनिच्या साडेसाती  चा फारसा  त्रास होत  नाही  कारण शनि हा ग्रह जीवाला शिवाचे रूप दाखवणारा आहे . साडेसाती मध्ये माणूस बर्याच वेळा परिस्थिती मुळे  हतबल होतो . साडेसाती माणसाला संयम शिकवते , अधिक परिपक्व बनवते . 

बर्याच वेळा साडेसाती चा त्रास कमी होण्यासाठी उपाय काय ? असे विचारले जाते . दर शानिवारी शनि मंदिरात तेल घालणे , शनीचा मंत्र म्हणणे वगेरे उपाय सांगितले जातात त्याने खरेतर बहुतेक माणसाला चांगले कर्म करण्याची बुद्धी होत असावी आणि अहंकार कमी होत असावा असे वाटते  . समजा तुम्ही शनि मंदिरात जाताय ,मंत्र म्हणताय पण ते फक्त कोणीतरी  सांगितले म्हणून आणि एकीकडे घरातील स्वत: च्याच आई वडिलांशी निट  वागत नाही आहात , पैशाचा माज आहे , भ्रष्टाचार , काळा  पैसा मिळवण्यात मग्न आहात तर शनि महाराजाची शिक्षा भोगणे अटळ  आहे .
चांगल्या कर्मानीच शनि महाराज प्रसन्न होतील . 

आपल्या आयुष्यात चांगला , वाईट काळ खरेतर  येत जात असतोच .ते पत्रिकेतील एकंदर ग्रहयोग व महादशेवर अवलंबून आहे . पण सर्वसामान्य माणसाला ज्याचा ज्योतिषशास्त्र ह्या विषयाशी सबंध  नाही त्याला महादशा आणि ग्रहयोग ह्या  विषय ी फारशी माहिती नसते . सगळ्या वाईट घटनांचा सबंध फक्त  साडेसातीशी लावला जातो  . सगळ्यांना कोणती न कोणती महादशा जन्मभर चालूच असते  मग कधी प्रगती करणारी किंवा मग त्रासदायक किंवा मग विशेष वाईटही नाही किंवा फार चांगली पण नाही .  ज्या माणसाच्या दशा  पण नेमक्या साडेसातीच्या काळात
त्रासदायक असतात त्यांना बराच त्रास होण्याची शक्यता असते . महादाशेबद्दल एक वेगळा लेख लिहीनच पुढे .

शनि हा तुमच्या कर्माचे मोजमाप तुमच्या पदरात घालतो . चांगल्या कर्मांची चांगली फळे देतो  आणि मूळ पत्रिकेतील ग्रहयोग आणि महादशा  चांगल्या असतील आणि ह्या जन्मी पण कर्म चांगलीच असतील तर शनि कसा त्रास देईल नाही का ?  शेवटी चांगली पत्रिका  म्हणजेच आपल्या आधीच्या जन्माच्या  चांगल्या कर्मांचा raincheck !

सध्या  २ नोव्हेंबर २०१४ पर्यंत कन्या, तूळ आणि वृश्चिक राशीला साडेसाती सुरु आहे . २ नोव्हेंबर २०१४ ला कन्येची साडेसाती संपेल शनि वृश्चिक राशीत प्रवेश  करेल आणि ३ नोव्हेंबर २०१४ पासून तूळ आणि वृश्चिक राशीबरोबर धनु राशीला साडेसाती सुरु होईल . त्यानंतर साधारण अडीच वर्षांनी  शनि धनु राशीत प्रवेश करेल आणि तूळ राशीची साडेसाती संपेल व मकर राशीची सुरु होईल . 

Monday, 21 April 2014

ज्योतिषशास्त्र ???


जेव्हा सांगते कि मी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करते आहे ,मला ह्या विषयात खूप इंटरेस्ट आहे तेव्हा बर्याच reactions येतात त्यापेकी काही चांगल्या ,काही आश्चर्य व्यक्त करणाऱ्या आणि काही  "ज्योतिषशास्त्र ??? सध्या तुला  काही काम दिसत नाही ! "अशा  अर्थाच्या असतात . खरेतर अशी REACTION देण्यात त्या व्यक्तीला एक तर ज्योतिष ह्याविषयाची फारशी माहिती नसते किंवा बऱ्याच प्रमाणात चुकीची माहिती असते त्यामुळे काही करायला नसेल तर time pass म्हणून ज्योतिष शिकतात असा काहीतरी त्यांचा समज असतो . आपण स्वत: उच्च शिक्षित असलो कि 'ज्योतिष 'ह्या विषयाला एकदम फालतू time pass समजणे  किंवा अंधश्रद्धा इतकेच दोन options अशा लोकांकडे असतात . मला वाटते हे मत होण्यासाठी ह्या विषयाचा बरेच वेळा झालेला चुकीचा प्रचार कारणीभूत असावा . तसेच फारसा अभ्यास न करता लोकांना भल्यामोठ्या फिया घेऊन उगाचच काहीतर सतत धार्मिक विधी / मंत्र - तंत्र सांगणारी तसेच उगचच घाबरवून सोडणारी  मंडळी कारणीभूत असावीत . ह्या विषयात काम करणारी बरीच विद्वान मंडळी पण आहेत जी अगदी मनापासून ह्या शास्त्राशी प्रामाणिक राहून योग्य मार्गदर्शन करीत असतात . परंतु अशी लोक बाकी लोक जे ह्या विषयाचा गैरवापर करतात त्यांच्यापेक्षा कदाचित कमी प्रमाणात असावेत . त्यामुळे साहजिकच ज्योतिषी म्हणजे पैसे उकळून काही बाही सांगणारा किंवा एकंदर हा विषय म्हणजे अंधश्रद्धा असेच चित्र बऱ्याच लोकांच्या डोळ्यासमोर आहे . 

                  ज्योतिषशास्त्र हे 'शास्त्र'  नव्हेच फक्त अंधश्रद्धा आहे असे एक मत असते बर्याच जणाचे  . मला वाटते कि ह्यात ' शास्त्र ' हा शब्द विज्ञान (science )ह्या अर्थाने वापरलेला नाही तर तो नागरिक शास्त्र , समाजशास्त्र ह्यामध्ये जो 'शास्त्र ' ह्या शब्दाचा जो अर्थ अभिप्रेत आहे त्या दृष्टीने वापरला असावा . शास्त्राचा इथे अभिप्रेत असलेला अर्थ बर्याच जणांच्या पत्रिकेचा अभ्यास करून त्यातून काही नियम बनवून त्याचा analysis साठी उपयोग करणे व त्यातून मार्गदर्शन करणे हा असावा . ह्यामध्ये ग्रहांना दिलेले कारकत्व किंवा सुचकत्व हे बर्याच observation नंतर नक्की केलेले असावे असे वाटते . उदा . शुक्र हा वैवाहिक सौख्याचा ग्रह घटस्फोटांच्या पत्रिकेत बिघडलेला ( अशुभ ग्रहांच्या योगात ) आढळतो . 
           पत्रिकेतून लोकांना एक POSITIVE ATTITUDE देणे व योग्य मार्गदर्शन करणे हा ज्योतिष विद्येचा प्रमुख हेतू आहे . त्यामुळे असे मार्गदर्शन करणाऱ्यास ASTROLOGER  न म्हणता  ASTRO -COUNSELOR म्हणणे मला जास्त appropriate  वाटते .

कितीतरी गोष्टींमध्ये हे मार्गदर्शन उपयोगी पडू शकते उदा . शिक्षण म्हणजे कोणत्या शाखेचे शिक्षण  घ्यावे .आता ह्यामध्ये त्या  व्यक्तीचा कल कोणत्या बाजूस आहे त्याची बौद्धिक क्षमता किती आहे , पुढील दृष्टीने कोणत्या क्षेत्रात काम करणे जास्त अनुकूल वाटते आहे ह्याचा पत्रिकेच्या दृष्टीने  विचार करून शिक्षण शाखा सुचवता येऊ शकते .            

आपल्याला होणारे आजार ह्याचा अंदाज पत्रिकेतून शकतो . आता ह्यावर काही जण म्हणतील कि पत्रिका बघितली कि झाले डॉक्टरांची गरजच काय ? असा लगेच प्रतिवाद करतील पण पत्रिकेतून शरीरातील कोणत्या भागाची जास्त काळजी घ्यावे एवढे कळू शकते पण आजार झाला तर डॉक्टरांना पर्याय नाहीच . समजा एखादी स्त्री जर IVF सारखी महागडी treatment घेत असेल तर ती यशस्वी होण्याच्या दृष्टीने पत्रिकेनुसार योग्य / अनुकूल काळ बघून सुचवता येतो . 

तसेच जर ARRANGED MARRIAGE असेल तर पत्रिका बघून अनुरूप जोडीदाराची निवड करता येईल येईल परंतु फक्त  गुणमिलन करू नये सखोल पत्रिका बघावी तसेच जर प्रेमविवाह असेल तर उगीचच पत्रिका बघत राहू नये . कारण अशा वेळेस लग्न करण्याचे त्या दोघांचे नक्कीच असते मग उगीचच पत्रिका बघून जुळत नसेल तर सांगूनही उपयोग  नाही . 


नोकरी करावा कि व्यवसाय तसेच कोणत्या क्षेत्रात जास्त अनुकूल आहे ह्या सर्वांचा विचार पत्रीकेतून करता येतो . आता तुम्ही म्हणाल कि पत्रिका बघितली नाही तर काय ? तर काही नाही ,कदाचित आपण न कळत योग्यच वाट निवडतो अथवा अयोग्य . पण जर चुकीची वाट निवडली तर मग बरेच कष्ट करून मनासारखे यश मिळत नाही आणि नैराश्य येऊ शकते . पण त्यातूनही जो सर्व अडचणीवर मात करतो त्याला पत्रिकेची गरज नाही. पत्रिका हे भविष्य घडवण्यासाठी मार्गदर्शनाचे काम करते भविष्य घडवत नाही ते तुम्हालाच करायचे आहे योग्य प्रयत्न अधिक योग्य मार्गदर्शन बरोबर यश असे मला वाटते . 




Wednesday, 16 April 2014

जुळून येती रेशीमगाठी !

जुळून येती रेशीमगाठी ! लेखाच्या नावावरून वाटले असेल तुम्हाला कि मराठी मालिकेविषयी काहीतरी आहे का ? आणि  ज्योतिष विषयक ब्लोग वर का  ? तर हे कोणत्याही मालिकेबद्दल नसून सर्वसाधारण पणे आपल्याकडे जी arranged  marriage होतात त्या विषयी आहे . बरेच जण  मुला / मुलीचे लग्न म्हटले कि ' पत्रिका बघणार आहोत ' म्हणजेच गुणमेलन झाले तरच पुढे ते ' स्थळ' बघू असे सांगतात . आता असे गुणमेलन करणे म्हणजे काय तर वधू  वराचे जन्म
नक्षत्रावरून  किती गुण जमत आहे ते पाहणे . हे पंचागात बघून लगेच काढता येते . ठराविक गुण जमले तर ठीक नाहीतर पत्रिका जुळत नाही असे म्हणून सरळ ते ' स्थळ ' reject केले जाते . आता गुणमेलानाची हि पद्धत मला तरी योग्य वाटत नाही . अशाप्रकारे पत्रिका बघण्याचा एकमेव फायदा कदाचित ' स्थळ' फारसे मान्य नसेल तर नकार द्यायला कारण म्हणून फार फार तर होईल .
मग पत्रिका बघूच नये का ? खरेतर 'जे होईल ते बघू  ,सगळीच लोक कुठे पत्रिका बघतात ? पण त्यांचे संसार होतातच न चांगले , कशाला ह्या फंदात पडा ' एकतर हा attitude चांगला पण पत्रिका बघायच्या नावाखाली फक्त गुणमेलानाला महत्व देवून 'उगाचच पत्रिका जमत नाही ' असा बाऊ करण्यात काही अर्थ नाही असे मला वाटते .
मग पत्रिका बघायचीच असेल तर काय बघायला पाहिजे ? ह्याचे उत्तर म्हणजे पत्रिका सखोल सगळ्या दृष्टीने बघायला हवी . पत्रिकेत वैवाहिक सौख्य कसे आहे ? आयुष्य कसे आहे ? संतती सुख कसे आहे ? पत्रिकेत पुढे येणाऱ्या महादशा ह्या सगळ्या दृष्टीने कशा आहेत ? ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा .
विवाह संबंधी माहिती माझ्या आधीच्या काही लेखांमध्ये दिली आहेच.

विवाह ( सप्तम स्थान ) http://anaghabhade.blogspot.in/2013/11/blog-post_23.html

घटस्फोट http://anaghabhade.blogspot.in/2013/11/blog-post_9537.html

त्यामुळे मला वाटते  कि पत्रिका बघायचीच असेल तर फक्त गुणमेलन करू नका सखोल बघा त्यातूनच योग्य मार्गदर्शन होईल . 

Thursday, 10 April 2014

रविची स्थानगत फले

रवि  संबंधी  माहिती आधी दिलीच आहेच .
http://anaghabhade.blogspot.in/2014/01/blog-post_26.html
( पत्रिकेतील रवि )

स्थानगत ग्रहाच्या फलांचा अभ्यास केला तरी तो ग्रह  कोणत्या स्थानांचा अधिपती ( lord ) आहे . कोणत्या राशीत आहे . अजून कोणत्या ग्रहांशी युती किंवा योग करत आहे ह्यावर त्याचे फलित अवलंबून असते .परंतु ह्या सगळ्याची प्रथम पायरी म्हणून स्थानगत फले अभ्यासायला हवीत .


पत्रिकेतील रवीच्या स्थानावरून सर्वसाधारण सर्वसाधारण पणे जन्मवेळेचा अंदाज येतो किंवा किती वाजता जन्म आहे ह्यावरून रवि पत्रिकेत कोणत्या स्थानात असेल ह्याचा अंदाज बांधता येतो म्हणजे जर प्रथम  रवि असेल तर सकाळी ६ ते ८ या दरम्यान जन्म असतो . व्यय स्थानी रवि असेल तर ८-१० या दरम्यान जन्म असतो . लाभ स्थानी रवि असेल तर सकाळी ८ ते १० या दरम्यान जन्म असतो.दशमस्थानी दशमस्थानीअसेल तर १० ते १२  दुपारी जन्म . नवम स्थानी असेल तर १२ते दुपारी २ मध्ये जन्म , अष्टमात असेल तर २-४ दुपारी  जन्म , सप्तम स्थानी असेल तर ४-६ संध्याकाळी जन्म , षष्ठ स्थानात असेल तर संध्याकाळी ६-८ मध्ये जन्म , पंचमात असेल तर रात्री ८-१० मध्ये जन्म , चतुर्थात असेल तर रात्री १२-२ मध्ये जन्म , तृतीय स्थानात असेल तर २-४ रात्रीचा जन्म व द्वितीय स्थानात ४-६पहाटेचा जन्म असे अनुमान घेता येते . 

पत्रिकेत रवि ज्या राशीत असतो त्यालाच sunsign असे म्हणतात . उदा . जर कर्क राशीत रवि असेल तर तुमची sunsign cancer आहे असे म्हणतात . पाश्च्यात्य  ज्योतिषशास्त्रात sunsign ला महत्व दिले आहे . लिंडा गुडमन चे sunsign वरील पुस्तक तर प्रसिद्ध आहेच. राशिगत रवीच्या अभ्यासाकरता हे पुस्तक चांगले आहे .

कोणत्याही ग्रहाचा राशिगत अभ्यास करण्याकरता त्या राशीचे गुणधर्म अधिक ग्रहाचा स्वभाव असे मिश्रण केले कि अंदाज येतो . तसेच स्थानगत फला  करता त्या स्थानावरून बघण्यात येणाऱ्या गोष्टी तसेच त्या ग्रहाचा स्वभाव व कारकत्व ह्याचे मिश्रण केले कि साधारण फलाचा अंदाज येतो .

एखाद्या व्यक्तीचा स्वभाव ठरण्यात त्याची त्याची लग्न रास , चंद्र रास आणि सूर्य रास ( sunsign )  गोष्टींचा महत्वाचा वाटा  असतो .

रविवरून पिता , सरकारी कामे / कर्मचारी , स्वाभिमान , गर्व , अधिकार ,अधिकारी व्यक्ती प्रतिकारशक्ती ,हृदय , पाठ,डोळ्यांचे आजार इ. गोष्टींचा विचार केला जातो .

आपण रवीची ची स्थानगत फले बघुयात . 

प्रथम स्थानात रवि असता : प्रतिकारशक्ती चांगली असते . भरपूर आत्मविश्वास असतो . समाजात मान असतो . 

द्वितीय स्थानात रवि असता : द्वितीय स्थान हे कुटुंब , धन स्थान आहे . ह्या स्थानावरून डोळे , घसा ह्या अवयव बघितले जातात . इथे रवि पापग्रहांबरोबर ( शनि,हर्शल,मंगळ , राहू )असेल तर डोळ्यांचे ,दातांचे 
किंवा घशाचे आजार असण्याची शक्यता असते . पापग्रहांबरोबरचा रवि आर्थिक नुकसान पण करतो . रवि-गुरु युती आर्थिक प्रगती दाखवते . 

तृतीय  स्थानात रवि असता : हे पराक्रम स्थान आहे . इथे असणारा रवि पण आत्मविश्वास चांगला देतो . 

चतृर्थ  स्थानात रवि असता : ह्या स्थानावरून ग्रुहसौख्य, मातृसौख्य , घर , गाडी , मृत्यू समयीची स्थिती इ. इतर ग्रहांच्या योगाप्रमाणे फळे मिळतात . पापग्रहांबरोबर असता चतुर्थ स्थानाची फारशी चांगली फळे मिळत नाहीत 

पंचम स्थानात रवि असता : ह्या स्थानावरून संतती , विद्या ,कला,उपासना  इ. गोष्टी बघतात. ह्या स्थानातील रवि पापग्रहांच्या योगात नसता संतती सुखास चांगला असतो . 

षष्ठ स्थानात रवि असता : ह्या स्थानावरून आजार, मातुल घराणे , नोकरी इ. बघतात. रवी हा सरकारी नोकरीचा कारक ग्रह आहे त्यामुळे बर्याच वेळा अशा नोकरीत अधिकार योग देतो . ह्या स्थानावरून आजारपण बघितले जाते त्यामुळे रवि पापग्रहांच्या युतीत , केंद्रयोगात किंवा प्रतियोगात असता त्या ग्रहांप्रमाणे आजाराचे स्वरूप ठरते . उदा . रवि- मंगळ युती हाडे मोडणे किंवा उष्णतेचे विकार देऊ शकते .

सप्तम स्थानात रवि असता : ह्या स्थानावरून जोडीदार , विवाह , धनद्यातील भागीदार इ.बघतात . जोडीदार मानी असतो . बर्याच वेळाग्रहांबरोबर असलेला रवि वैवाहिक सौख्य देत नाही विशेषत: बायाकांच्या पत्रिकेत रवि , मंगळ पापग्रहांच्या योगात असतील तर वैवाहिक सौख्य फारसे चांगले नसते . 

अष्टम स्थानात रवि असता : प्रतिकार शक्ती कमी असते . बर्याच वेळा अष्टमातील ग्रह बर्याच वेळा  मनस्ताप देतात . सरकार दरबारी SUPPORT न करणारा इथला रवि आहे . 

नवम स्थानात रवि असता : हे भाग्य स्थान आहे तसेच परदेश गमन पण ह्या स्थानावरून बघतात . हे स्थान रवीच्या दृष्टीने सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यात मदत करणारे आहे . 

दशम स्थानात रवि असता : हे स्थान रविकरता एक शुभ स्थान आहे . इथला रवि नोकरीत विशेषत: सरकारी नोकरीत चांगला हुद्दा  आणि मान असतो . सत्त्तेत असणार्यांन करता पण हा रवि शुभ फले देतो . 

एकादश / लाभ स्थानात रवि  असता : एकंदरच लाभातील ग्रह  आर्थिक दृष्ट्या शुभ फळे देतात . लाभ स्थानातील रवि आर्थिक लाभास चांगला . इच्छा आकांक्षा पूर्ण करणारा आहे . 

व्यय / द्वादश स्थानात रवि असता : इथला रवि पाप ग्रहांच्या योगात असेल तर आर्थिक नुकसान , डोळ्यांचे त्रास आणि बंधनयोग देणारा आहे . 

इथे रवीची स्थानगत फले जरी दिली असतील तरी  ढोबळमानाने अंदाज येण्यासाठीच त्याचा उपयोग जास्त आहे .कोणत्याही  ग्रहाची फले हि त्याच्या महादशेत व अंतर्दशेत प्रामुख्याने मिळत असतात . तसेच स्थानगत फलांपेक्षा त्याचे इतर ग्रहांशी होणारे योग जास्त प्रभावी वाटतात . 
महादशेच्या interpretation करता कृष्णमुर्ती पद्धती मला जास्त प्रभावी वाटते . त्याबद्दल पण पुढे लिहिण्याचा विचार आहेच . 


Thursday, 3 April 2014

ज्योतिष शास्त्र का , कशासाठी ?

ज्योतिषशास्त्र का , कशासाठी ? हा प्रश्न बर्याच वेळा लोकांना पडतो . मला पण हाच प्रश्न पडला होता . आमच्या  घरात  म्हणजे माहेरी पत्रिका , ज्योतिष वगेरे विषय फारसे कधी ऐकले नव्हते अगदी नाही म्हणायला माझे पणजोबाना जे माझ्या जन्माच्या आधीच वारले , ह्या विषयात रस होता व त्यांचा त्याबाबतीत बराच अभ्यास होता असे माझ्या आजीकडून व पणजीआजीकडून ऐकले होते .  तसेच माझ्या आजीचा भाऊ म्हणजे माझे मामाआजोबाना ह्या विषयात बराच interest होता . पण अर्थातच त्यामुळे  माझा ह्या विषयाशी सबंध येणे अवघडच होते .
माझ्या आई बाबांचा लग्नात साधारण जी पत्रिका बघितली जाते म्हणजे गुणमिलन करता तेवढाच सबंध !  ( जे आता कळतंय कि ' किती गुण जमले ' हे फारसे महत्वाचे नाही . पत्रिका बघायचीच असेल तर सखोल बघितली पाहिजे म्हणजे ग्रहयोग , महादशा वागेरेचा निट अभ्यास केला पाहिजे . नुसते अमके गुण जमले ह्याला तसा फारसा अर्थ नाही . ) त्यामुळे घरात ह्या विषयाची अजिबात चर्चा होत नसे .

माझे  लग्न झाले नंतर  काही काळ इथे नोकरी मग नवर्याच्या जॉब मुळे  अमेरिकेत बरीच वर्षे होते आणि आधीच्या लेखात उल्लेख केला तसा भारत भेटी करता एकदा आले असताना शरद उपाध्ये ह्यांचा 'भविष्यावर बोलू काही ' हा कार्यक्रम  बघण्यात आला आणि मग ह्या विषयाकडे माझे लक्ष गेले . तेव्हा मला 'ज्योतिषशास्त्र का , कशासाठी ?' हा प्रश्न पडला . एक म्हणजे जर पूर्ण ज्योतिष शास्त्र हे कर्म सिद्धांतावर अवलंबून आहे ह्याचा अर्थ कि आपण चांगले कर्म केले कि चांगलीच फले  मिळणार आणि जे नशिबात आहे ते होणारच असेल तर मग कशासाठी पत्रिका / ज्योतिष बघायचे ? पण त्याच वेळेस  मग अतिशय साधी सरळ , कधी कोणाचे वाईट न केलेली माणसे आणि त्यांची काही दुखे: मला जास्त प्रकर्षाने दिसू लागली . उदाहरणच द्यायचे झाले तर माझा सख्खा  मामा ऑफिस म्हणून जायला बाहेर पडला ,एका ट्रक च्या धडकेमुळे त्याचा अपघात झाला व त्यातून तो वाचू शकला नाही . त्यावेळेस माझा मामेभाऊ अवघा ४-५ वर्षांचा होता . आजी ,  आजोबा ,मामी आणि घरातले इतर ह्या सर्वांना  हा धक्का खूप मोठा होता . ह्या घटनेचा  जेव्हा विचार करते तेव्हा सतत का बरे असे झाले ? माझ्या आजी-आजोबांनी , मामीनी असे काय बिघडवले होते कोणाचे ? माझ्या मामेभावाकडून  का देवाने पित्याचे सुख हिरावून घेतले असे प्रश्न पडतात . त्यावेळेस वाटते कि नुसती ह्या जन्मी केलेली चांगली कर्मे पुरेशी नसावीत त्या पलीकडेही काही आहे . कदाचित असा विचार करून आपण आपलीच समजूत घालतोय असाही विचार मनात आला . 

अशी बरीच उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर घडत असतात . कोणाला खूप प्रयत्न करून मुल  न होणे , कोणाचे जोडीदाराशी न पटणे सतत भांडणे होत राहणे मग घटस्फोट , मनस्ताप होणे, कोणाला सतत आर्थिक प्रोब्लेम्स असणे , शिक्षण आणि पात्रता असतांना मनासारखा जॉब न मिळणे इ. 

अर्थात आपले माणूस आपल्याला कायमचे सोडून जाणे हे जगातले सगळ्यात मोठे दुख: आहे असे मला वाटते . 
काही गोष्टी आपल्या हातात नसतात काही भोग भोगल्याशिवाय सुटका नाही हे खरेच परंतु काही गोष्टी आपल्याला सुधारता येऊ शकतील का ? असे  वाटू लागले . उदा नोकरी , व्यवसाय , जोडीदाराची निवड , काहि टाळता येण्यासारखे आजार , काही मानसिक त्रास इ. 

जेव्हा उत्सुकतेपोटी का होईना सुरुवातीला जेव्हा ह्या विषयाचा अभ्यास सुरु केला तेव्हा जाणवले कि पत्रिका म्हणजे आपल्या पूर्वजन्मीच्या पाप/ पुण्याचा आराखडा आहे . जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा पत्रिकेशी ताडून बघता त्याची उत्तरे सापडू लागतात  . उदा वैवाहिक सौख्य नसणाऱ्या लोकांच्या पत्रिकेत शुक्र ,सप्तम स्थान , सप्तमेश ,   बिघडलेले असणे म्हणजे पापग्रहाच्या युतीत  केंद्रयोगात ,  प्रतियोगात असणे तसेच महादशा पण सप्तम स्थानाला म्हणजे वैवाहिक सौख्याला विरोध करणार्या षष्ठ आणि व्यय स्थान प्रामुख्याने देणाऱ्या आढळतात . ह्याचाच अर्थ ज्योतिषशास्त्रात  जे वैवाहिक सुखाच्या दृष्टीने शुक्राचे कारकत्व सांगितले आहे तसेच सप्तमेश आणि सप्तम स्थान ह्यांचे महत्व पटते . 

मग अशावेळेस विवाहासाठी पत्रिका बघताना नुसता गुण मिलनाचा विचार पुरेसा नाही त्य पत्रिकेत वैवाहिक सौख्य  आहे कि नाही हे बघणे महत्वाचे आहे तसेच मग संतती सूख  , वयोमर्यादा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे . 
आता पत्रिका बघून काय होणार जे व्हायचे ते तर होणारच आहे न असा प्रश्न पडतो त्यावेळेस कदाचित विवाह जुळवतना 
ह्या सर्व गोष्टींचा विचार करून मग पत्रिका जुळते आहे का ते पहिले तर कदाचित एखादा घटस्फोट टाळता येऊ शकतो . 

अजून एखादे उदाहरण द्यायचे झाले तर ,आता समजा एखाद्याच्या पत्रिकेत मुल होण्याचा योग आहे परंतु abortion होणे 
किंवा एखाद्या treatment ला यश न मिळणे वगेरे गोष्टी होत  असतात.अशावेळेस मानसिक, शाररीक आणि आर्थिक दृष्टीने नुकसान होत असते . तेव्हा दशा / अंतर्दशा जेव्हा अनुकूल असेल तेव्हा प्रयत्न करा असे सांगता येते . 

पत्रिकेतील एकंदर ग्रहस्थिती ,महादशा ह्यांचा विचार करून शिक्षणाची शाखा सुचवता येते . तसेच एखाद्याला योग्य नोकरी / व्यवसायाचे क्षेत्र सुचवता येऊ शकते . कोणत्या दिशेने प्रयत्न करायचे आहेत  मार्गदर्शन मिळू शकते तसेच आत्ताचा काळ चांगला नसला तरी पुढचा काळ चंगला आहे प्रयत्न करत राहा हा आशावाद पत्रिकेतून मिळू शकतो किंवा एखादी गोष्ट मनासारखी घडणार नसेल तर ती accept करण्याची मानसिक तयारी होऊ शकते . 

एकंदर  ज्योतिषी पत्रिकेतून कौन्सेलिंगच करत असतो असे म्हणणे गैर ठरणार नाही . आपल्या पूर्वजांनी जे ज्ञान साठवले आहे त्याचा सुयोग्य वापर करून जीवन नक्कीच सुसह्य बनवता येईल . 

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणे अयोग्यच आणि  प्रत्येक गोष्टीचा पत्रिकेशी सबंध लावणे पण मला योग्य वाटत नाही . 
प्रयत्न तर करावेच लागतात त्याला पर्याय नाही परंतु प्रयत्नांची दिशा मात्र ह्यातून सापडू शकते .  जिथे अडचणी आहेत 
प्रोब्लेम्स आहेत confusions आहेत अशावेळेस ज्योतिष शास्त्राचा उपयोग मार्गदर्शक म्हणून नक्कीच होतो असे मला वाटते .