Title

Astrology Blog by Anagha Bhade


Wednesday, 1 July 2015

मासिक भविष्य जुलै २०१५



मासिक भविष्य जुलै २०१५

श्री सुनिल देव ह्यांनी लिहिलेले जुलै २०१५ चे राशिभविष्य 
राशिभविष्य
जुलै २०१५
(के.पी.पद्धतीप्रमाणे)
(टीप : सर्व भविष्य चंद्र राशीप्रमाणे दिली आहेत, पण ज्यांना लग्न रास माहीत आहे त्यांनी जन्म रास व लग्न रास अशी दोन्ही भविष्य वाचावीत.
समजा...चंद्र राशी मिथुन आहे आणि लग्न राशी मीन आहे, तर अशांनी मिथुन आणि मीन अशी दोन्ही राशींची भविष्ये पहावीत आणि समन्वय साधावा. )

ह्या महिन्यातील महत्वाचे ग्रहांचे राशीप्रवेश :

५ जुलै पासून शुक्र सिंह राशीत, ५ जुलै पासून बुध मिथुन राशीत, ३१ जुलै पासून मंगळ कर्क राशीत, १७ जुलै पासून रवि कर्क राशीत, १४ जुलै पासून गुरु सिंह राशीत प्रवेश करत आहे . 

मेष : ह्या महिन्याच्या सुरुवातीला मेष राशीचा स्वामी मंगळ तृतीयात आहे त्यामुळे द्वितीयातील बुध व षष्ठातील राहू तुम्हाला प्रवासातून आर्थिक लाभ मिळवून देण्याची शक्यता आहे . ह्याचा अर्थ असा कि ज्यांचा व्यवसाय फिरतीचा आहे अशा लोकांना हा काळ लाभदायक आहे . द्वितीयेश शुक्र ५ जुलै नंतर सिंह राशीत जात असल्याने कुटुंबासह मजेत वेळ घालवाल असे वाटते. घरगुती वातावरण चांगले राहील. १६ जुलै पर्यंत ज्या लोकांचा व्यवसाय event management तसेच कलात्मक वस्तू अथवा क्रीडा साहित्य विक्रीचा आहे त्यांना लाभ होतील .मुलांच्या दृष्टीने पण काळ ठीक आहे. षष्ठाचा स्वामी बुध ४ जुलै नंतर मिथुन राशीत जात असल्याने प्रकृतीची काळजी करण्याचे फारसे कारण नाही. शुक्र पंचमात असल्याने जोडीदाराबरोबर खेळीमेळीचे व आनंदाचे वातावरण राहील. घरातील मोठ्या मुलांच्या सहलीच्या योजना आखल्या जातील . ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अर्ज करायचा आहे त्यांच्याकरता उत्तम काळ उत्तम आहे . नोकरीत असणाऱ्या लोकांना वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. व्यवसाय असणार्यांनी व्यवहार साभाळून करावेत .एकंदरीत हा महिना कौटुंबिक दृष्ट्या उत्तम आहे परंतु नोकरी/व्यवसाय करणाऱ्यांनी काळजी घ्यावी .

वृषभ : ह्या महिन्याच्या ५ जुलै नन्तर शुक्र चतुर्थात असल्याने सर्व लक्ष घरासाबंधी कामाकडे जास्त राहील. द्वितीयात तीन ग्रह असल्याने वृषभ राशीला आर्थिक दृष्ट्या अतिशय उत्तम काळ आहे. गुरु तृतीयात उच्चीचा असल्याने सतत कार्यरत व उत्साही राहाल. शिक्षकांना तसेच वक्त्यांना हा काळ आर्थिक दृष्ट्या उत्तम आहे. घरासाबंधी व्यवहाराकरता हा महिना फायदेशीर आहे. शुक्र चतुर्थात व रवि द्वितीयात असल्याने नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील व तसेच घरातील वातावरण आनंदी राहील. राहू पंचमात व बुध द्वितीयात हा ग्रहयोग कलाकार,खेळाडू तसेच शेयर ब्रोकर्स ना आर्थिक दृष्ट्या उत्तम आहे. मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने पण हा काळ चांगला आहे. गुरु तृतीयात व बुध द्वितीयात असल्याने शक्यतो वादावादीचे प्रसंग टाळावेत. एकंदरीत महिना उत्तम आहे .
मिथुन : प्रकृतीच्या दृष्टीने हा महिना उत्तम राहील परंतु प्रथम भावातील मंगळ उष्णतेचे विकार देऊ शकतो त्या दृष्टीने काळजी घ्यावी. आर्थिक दृष्टीने महिना सर्वसाधारण राहील. तृतीयातील शुक्र दशमातील केतू व षष्ठातील शनि हे सर्व योग अध्यात्मिक दृष्ट्या चांगले आहेत. ज्यांना ह्याची आवड असेल त्यांनी सत्संगाचा लाभ घ्यावा. चतुर्थात राहू असल्याने घरघुती वाद टाळावेत. ज्या व्यक्ती घरापासून लांब राहतात त्यांना घराची ओढ जाणवेल. शेयर ब्रोकर्सना हा काळ शेयर्स घेण्याच्या दृष्टीने चांगला आहे . मुलांच्या दृष्टीने पण हा काळ चांगला आहे. षष्ठात शनि वक्री व लग्नी मंगळ असल्याने जुनी दुखणी डोके वर काढतील. जोडीदाराच्या संदर्भात काळ चांगला आहे. नोकरी/व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ संमिश्र आहे. व्यवसाय निमित्त छोटे प्रवास होण्याची शक्यता आहे.
कर्क : प्रकृतीच्या दृष्टीने हा महिना सर्वसाधारण राहील. आर्थिक दृष्ट्या महिना जे आधीच परदेशात आहेत त्यांना चांगला आहे. ह्या महिन्यात परदेशगमनाचा बऱ्याच जणांना नोकरी निमित्त जाण्याचा योग आहे. तृतिय स्थानदेखील प्रवास दाखवत आहे त्यामुळे होतकरू तरुणांनी तयारीत राहायला हरकत नाही. उच्च शिक्षणाच्या प्रवेशासाठी उत्तम काळ आहे. ह्या महिन्यात पाहुणे येण्याची शक्यता आहे. शेअर्सचा व्यवसाय असणार्यांनी गुतंवणूक जपुन करावी अन्यथा पैसे अडकण्याची शक्यता आहे. काहींच्या बाबतीत मुले लांब राहायला जाण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण सर्वसाधारण राहील. प्रथमात गुरु पंचमात शनि व नवमात केतू ह्या धर्म त्रिकोणात तीन ग्रह असल्याने ज्यांना अध्यात्माची आवड आहे अशा लोकांनी सत्संग केल्यास त्याचा उत्तम लाभ होईल. कर्क राहिला हा महिना उत्तम आहे असे दिसते.
सिंह : प्रथमात शुक्र तसेच प्रथमेश रवि लाभात व राहू द्वितीयात हे सर्व योग अतिशय उत्तम स्थिती दाखवत आहेत ह्याचा अर्थ ह्या महिन्यात तुमच्या मध्ये उत्साह तसेच उत्तम प्रकृती व अनेक प्रकारचे लाभ असा कपिलाषष्ठी चा योग आहे. लाभात रवि,मंगळ,बुध आणि द्वितीयात राहू असल्याने अनेक मार्गाने आर्थिक लाभ होतील. प्रवासाच्या दृष्टीने हा महिना तितकासा अनुकूल नाही. घर खरेदी/विक्री व्यवहार मध्ये विलंब होऊ शकतात. शेअर्स च्या व्यवसायात असलेल्यांनी ते विकून फायदा होऊ शकेल. मुलांच्या दृष्टीने पण काळ अनुकूल आहे. काही जणांना कफ ,छातीचे आजार अशी दुखणी आहेत त्यांनी काळजी घ्यावी. पेन्शनची कामे मार्गी लागतील. काही लोकांना त्यांचे अडकलेले पैसे देखील ह्या काळात मिळू शकतील .व्यावसायिकांच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे. नोकरी करणार्यांना प्रमोशन च्या दृष्टीने चांगले योग आहेत. एकंदरीत हा महिना उत्तम आहे.
कन्या : कन्येचा स्वामी बुध दशमात तसेच मंगळ पण दशमात असल्याने तुम्ही महिनाभर कार्यमग्न राहाल. त्या कार्यातून तुम्हाला समाधान मिळेलच पण तुमच्या कार्याचा गौरव पण करण्यात येईल. प्रथमत राहू असल्याने मनाची चंचलता वाढण्याची शक्यता आहे. ह्या महिन्यात खर्चाचे प्रमाण वाढेल. ज्यांच्या पत्रिकेत मुळातच प्रसिद्धी योग आहे अशा व्यक्तींना ह्या महिन्यात प्रसिद्धी मिळाल्या शिवाय राहणार नाही. ज्यांचा व्यवसाय प्रकाशन, पुस्तक विक्रेते किंवा फिरतीचा व्यवसाय /नोकरी असणार्यांना हा काळ उत्तम आहे. ज्यांना घर विकायचे आहे त्यांना त्या दृष्टीने अनुकूल काळ आहे. प्रेमवीरांना ह्या काळात संयम बाळगल्यास बरे राहील. प्रकृतीच्या दृष्टीने हा महिना सर्वसधारण आहे. जोडीदाराशी ह्या महिन्यात संयमाने वागावे अन्यथा वादाचे प्रसंग उद्भवतील . दशमात तीन ग्रह रवि, मंगळ, बुध व गुरु लाभात हे सर्व योग व्यवसाय/नोकरीच्या दृष्टीने अत्यंत चांगले आहेत. अनेकांना प्रमोशन तसेच आर्थिक लाभ होण्याचे योग आहेत. एकंदरीत हा महिना उत्तम आहे .
तूळ : शुक्र लाभात, गुरु दशमात आणि केतू षष्ठ स्थानात ह्या योगांमुळे तुमच्या कार्याची दाखल घेतली जाईल. पण त्यातून आर्थिक लाभ तितकासा होणार नाही. खर्चाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. तृतीयेश गुरु कार्यमग्न ठेवेल परंतु आर्थिक लाभ ह्या महिन्यात फारसे दिसून येत नाहीत. घरासंबंधी सर्व कामे लांबणीवर पडतील असे वाटते. मुलांचे शाळा/कॉलेज प्रवेश सुद्धा लांबणीवर पडू शकतात. जोडीदारापासून लांब राहण्याचे योग वाटतात. नवमात तीन ग्रह व राहू बाराव्या घरात असल्याने प्रवास होतील. षष्ठेश गुरु दशमात व बुध अष्टमात असल्याने पैशाचे व्यवहार जपून करावेत. तसेच कामाच्या ठिकाणी देखील भरपूर ताण पडण्याची शक्यता आहे. नवमातील दोन ग्रह रवि आणि मंगळ, लांबच्या प्रवासाचे योग दाखवत आहेत, त्यामुळे काही लोकांना कामानिमित्त परदेश वारी देखील करावी लागेल असे दिसते. एकंदरीत हा महिना सर्वसाधारण वाटत आहे
वृश्चिक: मंगळ अष्टमात व शनी प्रथमात ह्या ग्रहस्थिती मुळे सतत कोणता ना कोणता ताण राहील तसेच कोणत्याही गोष्टीत उत्साह राहणार नाही. तुम्ही घराच्या मंडळी बरोबर जितका वेळ घालवाल तितके मानसिक दृष्ट्या चांगले. आर्थिक व्यवहार जपून करावेत. नुकसान होण्याची शक्यता आहे. मुलांच्या दृष्टीने काळजीचे काही कारण वाटत नाही. अष्टमात तीन ग्रह असल्याने व राहू लाभात त्यामुळे पूर्वीची काही येणी असल्यास वसूल होतील परंतु त्याच प्रमाणात खर्चाचे प्रमाण पण तेवढेच राहील. प्रथमात शनि, पंचमात केतू आणि नवमात गुरु ह्या ग्रहांमुळे अध्यात्मिक गोष्टीतून आनंद मिळू शकेल. शेअर्सचा व्यवसाय करणाऱ्यांनी सुद्धा व्यवहार जपून करावेत. नोकरी करणाऱ्यांनी पण वरिष्ठांशी जमवून घ्यावे. लाभातील राहूमुळे काही लाभ संभवतात. एकंदरीत हा महिना सर्वसाधारण वाटतो.
धनु : शरीर प्रकृती उत्तम राहील. द्वियेश शनि बाराव्या स्थानी वक्री तसेच शुक्र नवम भावात हे योग आर्थिक लाभांच्या दृष्टीने फारसे अनुकूल वाटत नाहीत. काहीना प्रवासाचे योग येतील. तृतीयेश शनि लग्नी असल्याने कागदपत्रांसंबंधी रेंगाळलेली कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर असतील. मुलांच्या अभ्यासासंबंधी काळजीचे कारण राहणार नाही, तसेच त्यांच्या अॅडमिशनची कामे देखील मनाप्रमाणे होतील. सप्तमात दोन ग्रह, रवि आणि मंगळ, व राहू दशमात हा योग ज्यांचा सर्वसाधारण लोकांशी संपर्क जास्त येतो अश्यांचा व्यवसाय उत्तम चालेल. वाहने जपून चालवावीत. कला/क्रीडा क्षेत्रातील लोकांचा जनसंपर्क वाढण्याची शक्यता आहे. सप्तमात ग्रहांमुळे ज्यांचा व्यवसाय/नोकरी चा सबंध जास्त लोकांशी येतो त्यांच्या दृष्टीने चांगले. जोडीदाराशी सबंध चांगले राहतील. दशमातील राहू व सप्तमातील तीन ग्रहांमुळे व्यवसाय वृद्धी होण्यास मदत होईल. एकंदर हा महिना संमिश्र स्वरूपाचा आहे .
मकर : मकर राशीचा स्वामी शनि लाभात आहे. तो द्वितीयेश आहे तसेच रवि, बुध, मंगळ षष्ठ स्थानात आहेत ह्या योगामुळे तुम्हाला अनेक प्रकारचे लाभ व्हायला हवेत पण शनि वक्री असल्याने ह्या सर्व गोष्टी शनि मार्गी झाल्यानंतर जास्त अनुभवास येतील तो पर्यंत प्रतीक्षा करा. लेखक मंडळीना हा काळ उत्तम आहे . विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळेल .तसेच घर /वाहन ह्या व्यवहारात फायदा होईल . ज्यांच्या मनात घर भाड्याने द्यायचे आहे त्यांना भाडेकरू पण मिळतील. शेअर्स चा व्यवसाय असणार्यांनी सावधगिरीने व्यवहार करावा .नुकसान होण्याची शक्यता आहे . कदाचित जोडीदारापासून लांब राहण्याचे योग आहेत . बहुदा ज्यांच्या जोडीदारांचा/स्वत:चा व्यवसाय /नोकरी फिरतीची आहे त्यांना जास्त जाणवेल .कामाचा ताण ह्या महिन्यात राहील असे दिसते . एकंदरीत हा महिना संमिश्र आहे .
कुंभ : प्रकृतीच्या दृष्टीने महिना उत्तम आहे. इथे कुंभ राशीचा स्वामी शनि दशमात आहे परंतु वक्री असल्याने तुम्हाच्या कार्यात सध्या अडथळे येण्याची शक्यता आहे. पण केलेल्या कामाचे फळ शनि मार्गी झाल्यावर मिळेलच . आर्थिक कामे रेंगाळण्याची शक्यता आहे. शेअर्समध्ये किंवा लॉटरीमध्ये पैसे गुंतवण्याचा मोह होईल पण तो टाळावा. भावा बहिणीच्या भेटीचे योग येतील. मुलांच्या दृष्टीने पण महिना चांगला जाईल. जोडीदाराबरोबर सलोख्याचे संबंध राहतील. दशमेश मंगळ पंचमात आणि राहू अष्टमात ह्या योगामुळे अनेकांना कामाचा ताण जाणवेल. नवीन नोकरी शोधत असणाऱ्यांना प्रतीक्षा करावी लागेल. हा महिना एकंदरीत " वाट बघा " असे सुचवतो.
मीन : प्रथमात केतू पंचमात गुरु तसेच नवमात शनि ह्या योगांमुळे अध्यात्मिक गोष्टींमध्ये रस घ्याल. पाहुणे येण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण ठीक राहील. स्पर्धेत यश मिळेल. चतुर्थात रवि, मंगळ बुध व सप्तमात राहू ह्यामुळे घरात अनेक गोष्टींची चर्चा होईल. पार्टनरशीपचा व्यवसाय असलेल्या लोकांचा काळ समाधानकारक राहील. फिरतीच्या निमित्ताने छोटेमोठे प्रवास करावे लागण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या दृष्टीने अनुकूल ग्रह आहेत. नोकरी/व्यवसायाच्या दृष्टीने महिना सर्वसाधारण राहील असे दिसते. एकंदरीत हा महिना संमिश्र स्वरूपाचा राहील .

No comments:

Post a Comment