Title

Astrology Blog by Anagha Bhade


Tuesday, 30 August 2016

राशीभविष्य सप्टेंबर २०१६


राशीभविष्य सप्टेंबर २०१६

                                   (के.पी.पद्धतीप्रमाणे)



 राशीभविष्य अस्टॉलॉजी कौन्सिलिंग मार्फत दिलेली आहेत.

(टीप : सर्व भविष्य चंद्र राशीप्रमाणे दिली आहेत, पण ज्यांना लग्न रास माहीत आहे त्यांनी जन्म रास व लग्न रास अशी दोन्ही भविष्य वाचावीत.

समजा...चंद्र राशी मिथुन आहे आणि लग्न राशी मीन आहे, तर अशांनी मिथुन आणि मीन अशी दोन्ही राशींची भविष्ये पहावीत आणि समन्वय साधावा.)



मेष : राशीस्वामी मंगळ अष्टमात बुध ,गुरु, शुक्र षष्ठात त्यामुळे प्रकृतीची काळजी घ्यावी. अर्थात बुध वक्री आहे व रवि पंचमात त्यामुळे फार काळजीची गरज नाही. द्वितीयेश शुक्र षष्ठात रवि पंचमात ,षष्ठेश बुध वक्री आणि लाभेश शनि अष्टमात त्यामुळे आर्थिक बाबतीत महिना पहिल्या पंधरवाड्यापेक्षा दुसऱ्या पंधरवड्यात चांगला राहील. तृतीयेश बुध षष्ठात व रवि पंचमात आल्याने प्रकाशक, स्टेशनरी विक्रेते ह्यांना हा महिना आर्थिक दृष्ट्या चांगला जाईल. पंचमेश रवी पंचमात व पहिल्या आठवड्यात चंद्र पण पंचमात त्यामुळे मुलांशी चांगले जमेल. सप्तमेश शुक्र षष्ठात त्यामुळे जोडीदाराशी जमवून घ्यावे. दशमेश शनी अष्टमात तसेच षष्ठेश बुध वक्री व रवी पंचमात त्यामुळे नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना थोडा संयम बाळगावा लागेल. एकंदरीत हा महिना सर्वसाधारण जाईल. 



वृषभ : राशी स्वामी शुक्र पंचमात आहे. तसेच गुरु व बुध देखील पंचमात आहेत. त्यामुळे प्रकृतीच्या दृष्टीने काही काळजी नाही. द्वितीयेश बुध वक्री असून पंचम भावात आहे त्यामुळे पैशाची कामे रखडतील.चतुर्थेश रवि चतुर्थात आहे, विद्यार्थ्यांकरता हा योग चांगला आहे. पंचमेश बुध पंचमात तसेच शुक्र व लाभेश गुरु देखील पंचमात आहेत त्यामुळे मुलांशी चांगले जमेल. कलाकारांना पण हा योग चांगला आहे. षष्ठेश शुक्र पंचमात व पहिल्या आठवड्यात चंद्र देखील पंचमात त्यामुळे आर्थिक व्यवहार जपून करावेत. सप्तमात मंगळ व शनि असल्याने जोडीदाराशी पटवून घ्यावे.अष्टमेश पंचमात असल्याने भागीदाराशी व्यवहार जपून करावेत. नवमेश व दशमेश शनि सप्तमात हा योग उद्योजकांना चांगला आहे. कामासाठी काही प्रवास घडतील.एकंदरीत हा महिना चांगला जाईल.

मिथुन : प्रथमेश व चतुर्थेश बुध चतुर्थात वक्री आहे तसेच षष्ठात मंगळ व शनि त्यामुळे प्रकृतीची काळजी घ्यावी. मात्र रवि तृतीयात असल्याने फारशी काळजी करण्याचे कारण नाही. द्वितीयेश चंद्र पहिल्या आठवड्यात चतुर्थात आहे, राहू तृतीयात आहे व रवि पण तिथेच आहे. ज्यांचे व्यवसाय बांधकाम साहित्य, जमीन अगर शिक्षणासंबंधी आहेत अश्यांना काळ चांगला आहे, ऑर्डर्स चांगल्या मिळतील. तसेच रवि तृतीयात असल्याने जे उत्तम वक्ते आहेत अश्यांना व्याख्यानासाठी बोलावणी येतील व त्यातून धनप्राप्ती देखील संभवते. षष्ठेश व लाभेश मंगळ षष्ठात हा योग आर्थिक दृष्ट्या चांगला आहे. चतुर्थात शुक्र,बुध,गुरु ह्या सारखे शुभ ग्रह त्यामुळे घरात वातावरण छान राहील. पंचमेश शुक्र चतुर्थात आहे व चंद्र देखील तिथेच त्यामुळे मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे लागेल. तसेच प्रेमात पडलेल्यांनी थोडासा धीर धरावा. शुक्र आणि चंद्र दोघांची दृष्टी दशमावर असल्याने चतुर्थासंबंधी व्यवसाय भरभराटीला येतील. व्ययेश शुक्र चतुर्थात असल्याने घरात गुंतवणुकीस महिना चांगला आहे. षष्ठात शनि व मंगळ हे दोन ग्रह असल्याने ज्यांना उष्णतेचे विकार आहेत अश्यांनी काळजी घेणे इष्ट आहे. तसेच ज्यांना सांधेदुखी अगर त्वचाविकार आहेत अश्यांनी देखील काळजी घेणे आवश्यक आहे. अष्टमेश शनि षष्ठात तसेच मंगळ पण षष्ठात त्यामुळे भागीदारांकडून फायदा होईल. चतुर्थात बुध, शनी षष्ठात हा योग स्पर्धा परिक्षांसाठी चांगला आहे. एकंदरीत हा महिना चांगला जाईल.




कर्क : कर्क राशीचा स्वामी चंद्र पहिल्या आठवड्यात तृतीयात असल्याने आणि तिथेच बुध,गुरु, शुक्र हे तीन ग्रह असल्याने छोट्या प्रवासाचा योग आहे. तसेच प्रकृतीच्या दृष्टीने देखील हा योग उत्तम आहे. द्वितीयेश रवि द्वितीयात व शुक्र तृतीयात हा योग लेखक, प्रकाशक ह्यांच्यासाठी उत्तम आहे. तसेच जे कमिशन एजंट आहेत त्यांना देखील  हा योग उत्तम आहे. चतुर्थेश शुक्र तृतीयात असल्याने तसेच तृतीयात अनेक ग्रह असल्याने बराच काळ कामानिमित्त घराबाहेर राहण्याचे योग आहेत, तसेच घरासंबंधी खर्च होण्याची शक्यता आहे. आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल असे दिसते. पंचमातील शनि, मंगळ व तृतीयातील बुध मुलांच्या अभ्यासासाठी उत्तम आहे. तसेच दशमेश मंगळ पंचमात व तृतीयात बुध, गुरु, शुक्र हा योग कलाकारांना चांगला आहे. सप्तमेश शनि  पंचमात असल्याने जोडीदाराशी संबंध चांगले राहतील. नवमेश गुरु तृतीयात ,तृतीयेश व व्ययेश बुध तृतीयात हे सुद्धा प्रवास दाखवत आहेत. एकंदरीत हा महिना चांगला जाईल.



सिंह : प्रथमेश रवि प्रथमात आहे. त्यामुळे प्रकृती चांगली राहील. द्वितीयेश व लाभेश बुध द्वितीयात तसेच शुक्र व गुरु देखील द्वितीय भावात आहेत. हे आर्थिक लाभ दाखवत आहेत परंतु ते लाभ तुम्हाला दुसर्या पंधरवड्यात मिळतील. तरीदेखील आर्थिक स्थिती चांगली राहील.पहिल्या आठवड्यात चंद्रपण द्वितीय भावात आहे. त्यामुळे काही प्रमाणात आर्थिक लाभ होतील. तृतीयेश शुक्र द्वितीयात आहे. त्यामुळे भावाबहिणीच्या गाठीभेटी होतील. तसेच प्रकाशक, पुस्तक विक्रेते, व्याख्याते, कमिशन अजेंट ह्यांच्यासाठी हा महिना उत्तम आहे. चतुर्थेश व नवमेश मंगळ चतुर्थात तसेच शनी देखील चतुर्थात हा योग विद्यार्थाना छान आहे. पंचमेश गुरु द्वितीय भावात आहे त्यामुळे मुलांशी चांगले जमेल. ह्या महिन्यात शुक्र द्वितीयात व मंगळ चतुर्थात असल्याने फारसे प्रवास होणार नाहीत. एकंदरीत हा महिना चांगला जाईल.



कन्या:  लग्नेश बुध प्रथमात आहे. शुक्र पण प्रथमात आहे त्यामुळे प्रकृती चांगली राहील. प्रथमत बरेच ग्रह असल्याने सामाजिक स्थान उत्तम राहील. आर्थिक दृष्टीने महिना सामान्यच राहील. तृतीयेश मंगळ तृतीयात तसेच व्ययेश रवि व्ययात व नवमेश शुक्र प्रथमात त्यामुळे प्रवास घडतील. दशमेश बुध प्रथमात आहे तसेच शुक्र व गुरु देखील प्रथमात आहेत त्यामुळे हा महिना बराच व्यस्त जाईल. चतुर्थेश गुरु प्रथम भावात व रवि व्ययात असल्याने घरात गुंतवणूक कराल. पंचमेश शनि तृतीयात व मंगळ देखील तृतीयात हा योग कलाकारांना चांगला आहे. सप्तमेश गुरु प्रथमात व रवि व्ययात त्यामुळे जोडीदारापासून लांब राहण्याचे योग आहेत. एकंदरीत हा महिना व्यस्त जाईल.



तूळ:  तूळ राशीचा स्वामी शुक्र व्ययात आहे व षष्ठ भावाचा गुरु देखील तिथेच आहे, त्यामुळे तब्येतीच्या बारीक सारीक कुरबुरी राहतील. द्वितीयेश मंगळ द्वितीयात, लाभेश रवि लाभात आहे. तसेच त्रिक स्थानांचे (षष्ठ, अष्टम, व्यय स्थाने) स्वामी व्यय स्थानी आहेत त्यामुळे आर्थिक लाभ होतील. घरात कोणी आजारी असेल तर हॉस्पिटलचे खर्च वाढतील. तृतीय भावाचा स्वामी गुरु व्ययात, तसेच नवमेश व व्ययेश बुध व्ययातच असल्याने लांबचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. चतुर्थाचा स्वामी शनि द्वितीय भावात व मंगळ पण द्वितीयात त्यामुळे नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. पंचम भावाचा स्वामी शनि द्वितीयात असल्याने मुलाबाळांची अभ्यासातील प्रगती उत्तम राहील व त्यांच्याशी पण छान जमेल. सप्तमेश मंगळ द्वितीयात त्यामुळे जोडीदाराशी चांगले जमेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना सर्वसाधारण राहील. एकंदरीत हा महिना ठीक जाईल.



वृश्चिक: राशीस्वामी मंगळ प्रथमात तसेच बुध, गुरु लाभात त्यामुळे प्रकृती चांगली राहील. द्वितीयेश गुरु लाभात व दशमेश रवि दशमात ह्यामुळे आर्थिक लाभ होतील. तृतीयेश व चतुर्थेश शनि प्रथमात त्यामुळे आईशी व भावंडांशी संबंध चांगले राहतील. षष्ठेश प्रथम स्थानात व बुध लाभात आहे त्यामुळे नोकरी-व्यवसायाच्या दृष्टीने महिना छान आहे . दशमेश रवी दशमात व राहू देखील दशमात त्यामुळे एखादे प्रमोशन जर अपेक्षित असेल तर ह्या महिन्यात मिळेल. सप्तमेश शुक्र लाभत यामुळे जोडीदाराशी पण चांगले जमेल.एकंदरीत हा महिना छान जाईल.



धनु: राशीस्वामी गुरु दशमात व रवि नवमात त्यामुळे प्रकृती चांगली राहील. द्वितीयेश मंगळ व्ययात व व्ययेश शनि व्ययात त्यामुळे खर्चाचे प्रमाण वाढेल. बाराव्या भावात शनि,मंगळ व नवमात रवि ह्यामुळे प्रवास घडतील. विद्यार्थ्यांना हा महिना चांगला जाईल. मुलांशीमात्र जमवून घ्यावे. शेयर्स चा व्यवसाय करणाऱ्यांनी व्यवहार जपून करावेत. दशमेश व सप्तमेश बुध दशमात तसेच प्रथमेश गुरु दशमात व षष्ठेश व लाभेश शुक्र पण दशमात हा योग  नोकरी अगर व्यवसायासाठी चांगला आहे. हा महिना बराच व्यस्त जाईल.पंरतु त्यातून लाभ होण्याकरता थोडी वाट बघावी लागेल. एकंदरीत हा महिना ठीक जाईल.





मकर : राशीस्वामी शनि लाभात तसेच मंगळ पण लाभात त्यामुळे प्रकृती चांगली राहील. द्वितीयेश शनि लाभात आहे व नुकताच मार्गी झाला आहे. लाभेश मंगळ पण लाभात आहे.  हा योग आर्थिक दृष्ट्या चांगला आहे. तृतीय स्थानाचा स्वामी गुरु नवमात तसेच तो व्यय स्थानाचा देखील स्वामी आहे. नवम स्थानातील बुध गुरूशी युती करत आहे त्यामुळे लांबचे प्रवास घडतील. चतुर्थ स्थानाचा स्वामी मंगळ लाभ स्थानी असून तो स्वराशीत आहे.  विद्यार्थ्यांची पुढील शिक्षणासंबंधी सर्व कामे मार्गी लागतील. तसेच घराची इतर कामे देखील व्यवस्थित होतील. पंचम स्थानाचा स्वामी शुक्र नवम स्थानी आहे, तसेच तो दशमेश देखील आहे. त्यामुळे मुलांशी छान जमेल व त्यांच्या अभ्यासाची काळजी राहणार नाही. पंचम व नवम ह्या दोन स्थानांचा संबंध आल्याने धार्मिक/ अध्यात्मिक गोष्टींमध्ये रस घ्याल. अष्टम स्थानाचा स्वामी रवि अष्टम भावातच आहे व शुक्र नवमात आहे त्यामुळे जोडीदाराला प्रवासाचे योग दर्शवतो. नोकरी/व्यवसायाच्या दृष्टीने महिना सर्वसाधारण आहे. तसेच महत्वाचे निर्णय काळजीपूर्वक घ्यावेत.



कुंभ : प्रथम भावाचा स्वामी शनि दशमात व मंगळ देखील दशमात त्यामुळे ह्या महिन्यात कामाचा व्याप वाढेल. तसेच प्रकृती देखील उत्तम राहील. द्वितीयाचा स्वामी गुरु अष्टमात व रवि सप्तमात त्यामुळे आर्थिक चिंता राहतील. तसेच रवि सप्तमात असल्याने सरकारी कागदपत्रे व्यवस्थित तपासून घ्यावीत. तृतीयाचा स्वामी मंगळ दशमात असून प्रथम भावाचा स्वामी शनि पण दशमातच आहे, हा योग काही लोकांना प्रसिद्धीच्या दृष्टीने चांगला आहे. चतुर्थाचा स्वामी शुक्र अष्टमात असल्याने विद्यार्थ्याना अभ्यासासाठी विशेष मेहनत घ्यावी लागेल. तसेच पंचमेश बुध वक्री असून अष्टमात आहे त्यामुळे मुलांबद्दल काही चिंता सतावतील. नवमेश शुक्र अष्टमात असल्याने प्रवासात अडथळे येण्याची शक्यता आहे. दशम भावाचा स्वामी मंगळ तिथेच आहे व तो शनि पण दशमातच आहे. बुध अष्टमात असून वक्री असल्याने व्यवसायात ताण जाणवण्याची शक्यता आहे, तरी सर्व व्यवहार जपूनच करावेत. एकंदरीत हा महिना व्यस्त व थोडा ताण तणावाचा जाईल असे दिसते.



मीन : प्रथमेश गुरु सप्तमात आहे व रवि षष्ठात आहे त्यामुळे प्रकृतीस जपावे. विशेषत: ज्यांच्या पत्रिकेत प्रथम व षष्ठ स्थानातील ग्रहांच्या दशा चालू असतील त्यांनी विशेष काळजी घ्यावी. द्वितीय भावाचा स्वामी मंगळ नवमात असल्याने धार्मिक संस्थांमध्ये काम करणार्यांना तसेच शिक्षण संस्थांमध्ये काम करणाऱ्यांना आर्थिक लाभ होतील. तृतीय भावाचा स्वामी शुक्र सप्तमात असल्याने जोडीदाराशी वादविवादाचे प्रसंग उद्भवू शकतील, तरी सामोपचाराने घ्यावे. चतुर्थाचा स्वामी बुध सप्तम स्थानी आहे व रवि षष्ठात आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात थोड्याफार अडचणी येण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांनी जास्त मेहनत करणे आवश्यक आहे. पंचम भावाचा स्वामी चंद्र सप्तमात आहे व राहू षष्ठात आहे, मुलाबाळांच्या अभ्यासाकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. सप्तमात तीन ग्रह बुध, गुरु, शुक्र त्यामुळे महिन्याभरात तिन्ही ग्रहांचा परिणाम म्हणून जोडीदाराबरोबर कडू-गोड प्रसंग येऊ शकतील. तसेच सप्तमातील ग्रहांमुळे व्यावसायिक संपर्क बऱ्यापैकी वाढतील. नवमात शनि, मंगळ असल्याने ज्यांच डॉक्टरेटचे काम चालू आहे त्यांच्यासाठी ते पूर्ण होण्याच्या दृष्टीने चांगला योग आहे. दशम भावाचा स्वामी गुरु सप्तमात असून रवि षष्ठात आहे हा योग व्यावसायिकांना चांगला आहे. एकंदरीत महिना चांगला जाईल.

No comments:

Post a Comment