Title

Astrology Blog by Anagha Bhade


Tuesday, 31 March 2015

एप्रिल २०१५ राशिभविष्य

श्री . सुनिल देव ह्यांनी लिहिलेले एप्रिल २०१५ चे राशिभविष्य :

राशिभविष्य
एप्रिल २०१५
(के.पी.पद्धतीप्रमाणे)
(टीप : सर्व भविष्य चंद्र राशीप्रमाणे दिली आहेत, पण ज्यांना लग्न रास माहीत आहे त्यांनी जन्म रास व लग्न रास अशी दोन्ही भविष्य वाचावीत.
समजा...चंद्र राशी मिथुन आहे आणि लग्न राशी मीन आहे, तर अशांनी मिथुन आणि मीन अशी दोन्ही राशींची भविष्ये पहावीत आणि समन्वय साधावा. )
मेष : मेष राशीचा स्वामी मंगळ महिन्याच्या सुरुवातीला तुमच्याच राशीत आहे. ज्यांच्या पत्रिकेत मेष लग्न असेल अश्यांना हा महिना उत्साहवर्धक असेल आणि त्यामुळे त्यांचा कामाचा आवाका देखील वाढेल. लग्नी मेष रास असल्यास अष्टम भावात वृश्चिक रास येते, त्यामुळे मानसिक ताण देखील जास्त जाणवू शकेल. द्वितीय भावातील शुक्र तुमच्याच राशीत व केतू बाराव्या स्थानी असल्याने खर्चाचे प्रमाण बरेच वाढेल असे दिसते. तृतीयेश बुध बाराव्या स्थानी व शनि अष्टम स्थानी असल्याने प्रवासाचे बरेच योग येतील पण त्याबरोबर बरेच अडथळे सुद्धा येण्याची शक्यता आहे. चतुर्थात गुरु व केतू-बुध बाराव्या स्थानी असल्याने तुमच्या घरासंबंधी काहीतरी करणे आवश्यक ठरेल, मग ते कागदपत्र, पैसे ह्यासंबंधी अथवा नव्या घराचे पझेशन इ. स्वरूपाचे असू शकेल. पंचमेश रवि बाराव्या भावात असल्याने शेअर अगर तत्सम गुंतवणुकीपासून लांब राहणेच इष्ट! षष्ठातील चंद्र-राहू प्रकृतीसंबंधी थोडी काळजी घेण्याचे सुचवतात. कौटुंबिक स्वास्थ्य/वातावरण उत्तम राहील. दशमेश शनि अष्टमात व रवि बाराव्या स्थानी असल्याने नोकरी करणाऱ्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. एकंदरीत हा महिना संमिश्र स्वरूपाचा दिसतो.
वृषभ : वृषभ राशीचा स्वामी शुक्र बाराव्या स्थानी व रवि लाभात असल्याने हा महिना अतिशय उत्साहवर्धक व कामाच्या बाबतीत उत्तम राहील असे वाटते. द्वितीय स्थानाचा स्वामी बुध पण लाभातच आहे व राहू पंचमात असल्याने तरुण मुलांना प्रेमात पडण्याचे योग आहेत, काही मंडळी त्यात यशस्वी होतील. लाभातील बुध आर्थिक बाबतीत देखील चांगलीच फळे देईल. तृतीय स्थानातील गुरु ज्या लोकांचा व्यवसाय प्रवासाशी संबंधित असेल अश्यांसाठी लाभदायक आहे. गुरु वक्री असल्याने काही लोकांना हा अनुभव कदाचित उशिरा येईल. चतुर्थेश रवि लाभात आणि बुध देखील लाभात विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा महिना उत्कर्षकारक आहे. जितका अभ्यास जास्त तेवढे मार्क जास्त हे गणित नक्कीच लागू पडेल!! मुलाबाळांच्या अभ्यास आणि सर्वसाधारण प्रगतीच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे. षष्ठेश शुक्र बाराव्या स्थानात असल्याने वृषभ राशीच्या लोकांनी खाण्या-पिण्याचे पथ्य सांभाळल्यास प्रकृती चांगली राहील. सप्तमात शनि व सप्तमेश मंगळ बाराव्या स्थानात असल्याने काहींच्या बाबतीत कुटुंबासमवेत छोट्या-मोठ्या प्रवासाचे योग पण आहेत. काहींच्या बाबतीत कौटुंबिक पातळीवर नाराजी जाणवू शकते. लाभात रवि, बुध, केतू हे तीन ग्रह असल्याने व्यवसाय अगर नोकरी ह्या दोन्ही दृष्टीने उत्तम काळ आहे. तसेच आर्थिक लाभ देखील चांगले होतील. एकंदरीत हा महिना वृषभ राशीसाठी सर्व दृष्टीने उत्तम आहे.
मिथुन : मिथुन राशीचा स्वामी बुध दशमात आणि शनि षष्ठात, राहू चतुर्थात हा योग कोणत्याही कार्याला अतिशय उत्तम आहे तरी पण षष्ठ व चतुर्थ ही दोन्ही स्थाने काही बाबतीत त्रासदायक पण असतात. द्वितीय स्थानातील गुरु आर्थिक दृष्ट्या उत्तम आहे. तृतीयेश रवि दशमात व बुध दशमात हे दोन्ही ग्रह तुमच्या पराक्रमाला साथ देतील व तुमच्या हातून लक्षणीय कार्य घडण्याची संभावना आहे. जी मंडळी आधीच सामाजिक कार्यात आहेत, त्यांच्या दृष्टीने त्यांच्या कामाची दखल नक्कीच घेतली जाईल. पंचमेश शुक्र लाभात असल्याने मुलाबाळांच्या दृष्टीने हा काळ अतिशय उत्तम आहे. षष्ठातील शनिमुळे मात्र काहींच्या बाबतीत जुनी दुखणी तोंड वर काढण्याची शक्यता आहे. सप्तमेश गुरु द्वितीयात व बुध दशमात असल्याने कामाचा व्याप बराच राहील व त्याचा परिणाम कौटुंबिक बाबतीत दुर्लक्ष होण्यात दिसून येईल. दशमातील रवि, बुध, केतू व लाभात शुक्र, मंगळ हे दोन्ही योग व्यवसाय अगर नोकरी ह्यांच्या दृष्टीने उत्तम असून अनेक लाभ मिळवून देतील. एकंदरीत मिथुन राशीला हा महिना उत्तम आहे.
कर्क : कर्क राशीचा स्वामी चंद्र महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तृतीय स्थानी, गुरु तुमच्याच राशीत लग्नी, आणि बुध नवम स्थानी त्यामुळे प्रवासाचे योग निश्चित संभवतात. तसेच प्रकृतीच्या दृष्टीने योग चांगले आहेत. द्वितीयेश रवि नवम स्थानी, बुध नवम स्थानी व शुक्र दशमात त्यामुळे आर्थिक दृष्ट्या ज्यांचा शिक्षणाशी संबंध आहे अश्यांसाठी हा काळ उत्तम आहे. तसेच धार्मिक कार्य ज्यांचा व्यवसाय आहे, त्यांच्या व्यवसायाच्या दृष्टीनेही हा काळ चांगला आहे. चतुर्थेश शुक्र दशमात व रवि नवमात हा योग विद्यार्थ्यांना उत्तम आहे. मुलाबाळांच्या प्रगतीच्या दृष्टीने समाधानकारक काळ आहे. सप्तमेश शनि पंचमात वक्री आहे, त्यामुळे कौटुंबिक वातावरण सर्वसाधारण राहील. दशमातील रवि-शुक्र व्यवसाय व नोकरी ह्या दोन्ही दृष्ट्या उत्तम आहे. एकंदरीत हा महिना कर्क राशीसाठी चांगला आहे.
सिंह : सिंह राशीचा स्वामी रवि अष्टमात आणि बुध देखील अष्टमात त्यामुळे शरीर प्रकृतीच्या दृष्टीने थोडा काळजी घेण्याचा काळ आहे. द्वितीयातील राहू आर्थिक दृष्ट्या तितकासा लाभदायक नाही त्यामुळे आर्थिक बाबतीत थोडा कंजूसपणा करण्यास ह्या महिन्यात हरकत नाही. तृतीयेश शुक्र नवमात व रवि अष्टमात ह्या योगामुळे प्रवासात अडथळे येण्याची शक्यता आहे, शक्यतो प्रवास टाळणे श्रेयस्कर! घरासंबंधी ह्या महिन्यात काहीतरी खर्च निघण्याची शक्यता आहे. मुलाबाळांच्या अभ्यासाबाबत जातीने लक्ष घातल्यास अपेक्षित यश मिळेल. घरगुती वातावरण सर्वसाधारण राहील. अष्टमातील तीन ग्रह- रवि, बुध,केतू- नोकरी अगर व्यवसाय करणाऱ्यांना कामात बराच ताण निर्माण करतील. टेक्निकल व्यावसायिकांना मात्र हा महिना आर्थिकदृष्ट्या चांगला आहे. दशमेश शुक्र नवमात व रवि अष्टमात ह्या योगामुळे सरकारी नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठांशी जमवून घेणे इष्ट. एकंदरीत हा महिना सिंह राशीसाठी संमिश्र फळे देईल असे दिसते.
कन्या : कन्या राशीत महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चंद्र व राहू हे दोन्ही ग्रह व अष्टमात मंगळ असल्याने प्रकृतीचा त्रास संभवू शकतो, तरी विशेष काळजी घ्यावी. द्वितीयेश शुक्र अष्टमात व रवि सप्तमात असल्याने ज्यांचा भागीदारीत व्यवसाय असेल त्यांनी आर्थिक बाबतीत काळजीपूर्वक व्यवहार करावेत. तृतीय स्थानात शनि, अष्टमात मंगळ व सप्तमात रवि ही ग्रहस्थिती छोटेमोठे प्रवास दाखवत आहे, मात्र प्रवासात खबरदारी घ्यावी. पंचमेश शनि तृतीयात, रवि सप्तमात मुलाबाळांच्या अभ्यासाच्या दृष्टीने उत्तम आहेत. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील व घरात सुसंवाद राहील. अष्टमातील शुक्र-मंगळ इंजिनिअर्सना थोडाफार कामाचा ताण दाखवतात. लाभातील गुरु सर्वसाधारणपणे नोकरी अगर व्यवसायदृष्ट्या बरा आहे. एकंदरीत हा महिना संमिश्र असला तरीही काही बाबतीत खबरदारी घेणे तेवढेच आवश्यक आहे.
तूळ : तूळ राशीचा स्वामी शुक्र सप्तमात व रवि षष्ठात त्यामुळे अनेक लोकांना प्रकृतीच्या तक्रारी उद्भवतील. रवि आणि शुक्र ह्यांचा संबंध असल्याने हृदयविकार असणाऱ्यांनी खाण्याच्या बाबतीत खबरदारी घ्यावी. द्वितीयातील शनि आर्थिक बाबतीत खूप चांगला नसला तरी काहीतरी लाभ घडवून आणेल. तृतीयेश गुरु दशमात असल्याने तुमच्या कामाचा झपाटा बराच चांगला राहील. ह्या महिन्यात तुमच्या घरात मातुल घराण्यातल्या बऱ्याच मंडळींच्या गाठीभेटी होतील. मुलाबाळांच्या अभ्यासाच्या दृष्टीने महिना उत्तम आहे. षष्ठात रवि-बुध-केतू हे तीन ग्रह प्रकृतीस किरकोळ अपायकारक आहेत, हे वर सांगितले आहेच. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. सप्तमातील शुक्र कौटुंबिक वातावरण उत्तम ठेवेल. मंगळ मात्र अधून-मधून वादविवादाचे प्रसंग आणेल. दशम भावातील गुरु व द्वादश स्थानातील राहू व्यवसाय अगर नोकरीच्या दृष्टीने उत्तम आहेत. मात्र अधूनमधून काही अडथळे आले तरी डगमगून जाऊ नये. एकंदरीत हा महिना प्रकृतीबाबत काळजी सोडता इतर दृष्टीने चांगला आहे.
वृश्चिक : वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ षष्ठात असून केतू पंचमात आहे. शनि तुमच्याच राशीत आहे त्यामुळे वृश्चिक राशीला साडेसाती चालू आहे. प्रकृती संबंधी किरकोळ तक्रारी येऊ शकतील. द्वितीयेश गुरु आर्थिक बाबतीत तितकासा फलदायक होऊ शकणार नाही त्यामुळे आर्थिक व्यवहार जपून करावे. तृतीयेश शनि तुमच्याच राशीत असून वक्रीस्थित असल्याने तरुणांनी कोणत्याही प्रकारचे साहस करण्याचा विचारदेखील करू नये. पंचमातील ग्रह मुलाबाळांच्या प्रगतीच्या दृष्टीने उत्तम आहेत. षष्ठातील शुक्र-मंगळ दोन्ही ग्रह प्रकृतीच्या बाबतीत काळजी करायला लावणारे आहेत. तरीही पंचमातील ग्रह प्रकृतीबाबतच्या तक्रारी लवकर दूर करण्यास कारणीभूत ठरतील. सप्तमेश शुक्र घरगुती वातावरणात किरकोळ वादविवादाचे प्रसंग आणू शकेल, पण तरीही वातावरण ठीक राहील. नवम भावातील गुरु व नवमेश चंद्र एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात धार्मिक स्थळांना भेट देण्याचा योग आणेल. नोकरी-व्यवसायाच्या बाबतीत थोडे जुळवून घेण्याची आवश्यकता आहे. एकंदरीत हा महिना वृश्चिक राशीसाठी संमिश्र आहे असे दिसते.
धनु : धनु राशीचा स्वामी गुरु अष्टमात वक्री आहे व बुध चतुर्थात आहे. ह्याचा परिणाम म्हणजे शरीर प्रकृतीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच वाहन चालवताना देखील काळजी घेणे योग्य राहील. धनेश शनि वक्री असून तो बाराव्या स्थानी आहे, त्यामुळे खर्चाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. चतुर्थात तीन ग्रह व चतुर्थेश गुरु अष्टमात त्यामुळे सर्वसाधारणपणे घराकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. मुलाबाळांच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे. कौटुंबिक वातावरण उत्तम आणि सलोख्याचे राहील असे दिसते. अष्टमेश चंद्र महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात काहीतरी आर्थिक लाभ मिळवून देण्याची शक्यता आहे. दशमेश बुध चतुर्थात, शनि बाराव्या स्थानी व राहू दशमात ही ग्रहस्थिती कामाचा भरपूर ताण दाखवते पण त्यातून तुमच्या कार्याचा गौरव देखील होईल असे दिसते. एकंदरीत हा महिना संमिश्र असून आर्थिक लाभापेक्षा खर्च जास्त अशी परिस्थिती येईल असे दिसते. मात्र कामाच्या बाबतीत बऱ्याच श्रेयाचे मानकरी व्हाल.
मकर : मकर राशीचा स्वामी शनि लाभ स्थानी असून तो वक्री आहे. शरीर प्रकृतीला तेवढा त्रासदायक नसला तरी लाभदायक देखील नाही. द्वितीयेश देखील शनि असल्याने आर्थिक लाभात बऱ्याच प्रमाणात दिरंगाई होण्याची शक्यता आहे. तृतीयातील तीन ग्रह तुम्हाला बऱ्याच प्रमाणात उत्साही ठेवतील असे दिसते. काहींच्या बाबतीत लहान-सहान प्रवासाची शक्यता आहे किंवा काही लोकांची बदली देखील संभवते. घरातील वातावरण आनंदी राहील. काही लोक नवीन घर बुक करतील. मुलाबाळांच्या प्रगतीच्या दृष्टीने महिना चांगला आहे, त्यांच्या अभ्यासात लक्ष घातल्यास उत्तम यश प्राप्त होईल. सप्तमातील गुरु घरात किरकोळ वादाचे प्रसंग आणेल. काही लोकांना जमिन विक्रीतून मनासारखे लाभ होण्याचे योग आहेत. एकुणात हा महिना चांगला आहे असे दिसते.
कुंभ : कुंभ राशीचा स्वामी शनि दशमात आहे व तो वक्री आहे. शास्त्राप्रमाणे ग्रह वक्री असण्याचा परिणाम जर काही झाला नाही तर अतिशय उत्तम योग आहे. अश्या लोकांच्या हातून कोणत्यातरी चांगल्या कामाची मुहूर्तमेढ होण्याची शक्यता आहे. द्वितीयेश गुरु षष्ठात व द्वितीयातील तीन ग्रह द्वितीय स्थानात ह्यामुळे आर्थिकदृष्ट्या उत्तम योग आहे, अनेक लोकांना बरेच आर्थिक लाभ होतील. तृतीय भावातील शुक्र व मंगळ प्रवासाचे योग दाखवत आहेत, काहींना लांबचे प्रवास देखील घडू शकतील. पंचमेश बुध द्वितीय स्थानात शेअरच्या बाबतीत लाभ दाखवत आहे, पण शनि वक्री असल्याने आधी थोडक्या प्रमाणात प्रयोग करून पाहावा. मुलाबाळांच्या दृष्टीने उत्तम काळ आहे. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. अष्टमातील राहू अनपेक्षित धनलाभ मिळवून देईल. ज्या व्यक्तींची पेन्शन मिळायची असेल ह्या महिन्यात हे काम मार्गी लागण्याचे उत्तम योग आहेत. दशमेश मंगळ तृतीयात व दशमात शनि हा योग तुमच्या कामाच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे. बऱ्याच लोकांना प्रमोशन अगर आर्थिक प्राप्ती होईल. एकंदरीत आर्थिक दृष्ट्या आणि इतर सर्व दृष्ट्या हा महिना कुंभ राशीच्या लोकांना उत्तम जाईल.
मीन : मीन राशीचा स्वामी गुरु पंचमात, शनि नवमात व लग्नी रवि-केतू ही ग्रहस्थिती अध्यात्मिक कार्याला अगर ध्यानधारणेसाठी अतिशय उत्तम आहे. ज्यांना धार्मिक कार्याची आवड आहे अश्यांनी या संधीचा जरूर फायदा करून घ्यावा. लग्नी रवि असल्याने प्रकृती उत्तम राहील, तरीही ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे अश्यांनी थोडे जपून राहावे. द्वितीय स्थानातील मंगळ आर्थिक लाभाच्या दृष्टीने तेवढा चांगला नाही, पण शुक्र मात्र काही प्रमाणात आर्थिक लाभ मिळवून देईल. विशेषत: ज्यांचा संबंध शिक्षण, लेखन व्यवसाय, पुस्तके अगर सौंदर्य प्रसाधने ह्या क्षेत्रांशी असेल त्यांना निश्चित लाभदायक आहे. घरातील वातावरण मनमोकळे राहील. तसेच मुलाबाळांच्या अभ्यासातील प्रगती उत्तम राहील. सप्तमातील राहू काही बाबतीत किरकोळ स्वरूपाचे मतभेदाचे प्रसंग उभे करू शकेल. दशमेश गुरु पंचमात असल्याने काही लोकांच्या बाबतीत बदली अगर नवीन नोकरीचे विचार असे योग आहेत. एकंदरीत हा महिना आर्थिक बाबतीत संमिश्र स्वरूपाचा तर इतर दृष्टीने उत्तम आहे.

Wednesday, 4 March 2015

मी अमेरिकेला केव्हा जाईन ?


काही दिवसांपूर्वी  रश्मीचा  ( नाव बदलले आहे ) फोन आला . रश्मी एका आयटी कंपनी मध्ये काम करते . तिला काही कामासाठी अमेरिकेत असणाऱ्या त्यांच्याच तिथल्या ऑफिस मध्ये काही कामासाठी जायचे होते . परंतु काही न काही  कारणाने तिच्या जाण्याची तारीख निश्चित होत नव्हती . दुसरे महत्वाचे म्हणजे तिला व्हिसा पण  करायचा होता . त्यामुळे त्यांच्याच कंपनी मध्ये काम असले तरी मी अमेरिकेला जाऊ शकेन का आणि कधी असा प्रश्न तिला सतावत होता. रश्मीचा मुलगापण तसा लहान म्हणजे ९ वर्षांचा त्यामुळे महिनाभर अमेरिकेला जायचे म्हणजे इथे  त्याची पण सगळी व्यवस्था लावून जाणे भाग होते . त्यामुळे मी अमेरिकेला कधी जाईन हा प्रश्न तिने मला विचारला . अशा  प्रश्नाची उत्तरे प्रश्नकुंडली द्वारे चांगल्या प्रकारे देता येतात त्यामुळे मी तिच्याकडून प्रश्नकुंडली करता १ ते २४९ मधील नंबर मागितला .  तिने लगेच ९९ नंबर दिला . नंबर बघून दोनदा ९ आकडा बघून वाटले अगदी काही अडचण न येता हि अमेरिकेला जाईल  कारण नवम भावावरून लांबचा प्रवास बघतात . 
तिने दिलेल्या नंबर प्रमाणे प्रश्नकुंडली तयार केली .

प्रश्नकुंडली (kp no 99, 20/12/2014, 20:00 ,pune )
Because of some technical issues unable to upload kundali .

९९ नंबर प्रमाणे हि सिंह लग्नाची पत्रिका आहे . पत्रिकेत चंद्र तृतीयात आहे . तसेच चंद्राची कर्क रास बाराव्या भावात आहे . ३  व १२( प्रदेश प्रवास )  हि प्रवासाची स्थाने आहेत . ह्याचाच अर्थ प्रश्न मनापासून विचारला आहे . प्रश्नकुंडली मध्ये जेव्हा चंद्र प्रश्न दाखवतो तेव्हा उत्तर सहसा  चुकत नाही .

मी परदेशी जाईन का? ह्या प्रश्नासाठी बाराव्या भावाचा उपनक्षत्र स्वामी बघावा तो जर तृतीय , नवम किंवा बाराव्या भावाचा कार्येश असून मार्गी ग्रहाच्या नक्षत्रात असेल तर व्यक्ती परदेश प्रवास करते .
ह्या पत्रिकेत बाराव्या भावाचा उपनक्षत्र स्वामी चंद्र आहे . चंद्र स्वत: तृतीय भावात आहे . चंद्र शनीच्या नक्षत्रात त्यामुळे ३,६,७,११,१२  ह्या सर्व भावांचा कार्येश होतो . ह्याचाच अर्थ  परदेश प्रवास होणार .
लाभ स्थानाचा उपनक्षत्र स्वामी शनि तृतीयाचा कार्येश आहे त्यामुळे visa मिळायला पण काही अडचण वाटत नाही .
आता रश्मी अमेरिकेला कधी जाईल हा प्रश्न आहे .

आता शनीची महादशेत गुरूची अंतर्दशा आहे  .गुरु चतुर्थ भावाचा प्रथम दर्जाचा कार्येश असला तरी इथे प्रश्न short stay /शोर्ट travel to US चा आहे  ( जर प्रश्न २-३ वर्षाच्या stay चा असता तर गुरु अंतर्दश घेत आलीे नसती )व गुरु ४ बरोबर १२ चा कार्येश आहेच. बुध सुद्धा  केतूच्या नक्षत्रात आहे व केतू मीन राशीत असल्याने गुरूची फळे देईल .  त्यामुळे गुरूच्या अंतर्दशेत व बुधाच्या विदशेत साधारण १७ मार्च  २०१५ च्या आत जाणे होईल . अजून  अचूकतेकारता   रुलिंग प्लानेटस मधून रवि भ्रमण बघावे .

प्रश्नवेळेस रुलिंग planet  खालील प्रमाणे :
लग्न स्वामी : चंद्र
नक्षत्र स्वामी : शनि
राशी स्वामी : मंगळ
दिवसाचा स्वामी :शनि

प्रश्नकुंडली मध्ये रवी धनु राशीत केतूच्य नक्षत्रात आहे  गुरु रुलिंग मध्ये नाही त्यामुळे धनु रास सोडावी लागेल नंतर मकरेत रवीच्या उत्तराषाढा  नक्षत्रात जाईल . पण रवि रुलिंग मध्ये नाही त्यामुळे मकर राशीत चंद्राचे श्रवण नक्षत्र धरायला  हरकत  नाही . हा PERIOD साधारण २४ जानेवारी ते ६ फेब्रुवारी असा येतो . त्यामुळे ह्या काळात अमेरिकेला जाशील असे सांगितले व त्याप्रमाणे ती २५ तारखेला गेली . visa मिळायला पण काही अडचण आली नाही . 

Friday, 20 February 2015

कृष्णमुर्ती पद्धत म्हणजे काय ?

ज्योतीष शास्त्रामध्ये भविष्य सांगण्याच्या विविध पद्धती आहेत . सर्वसामान्य पणे पारंपारिक पद्धती नुसार भविष्य कथन केले जाते ज्या मध्ये तुमची मूळ जन्मपत्रिका बघितली  जाते . पत्रिकेतील ग्रह त्यांचे एकमेकांशी होणारे योग , महादशा , गोचर इ. गीष्टींचा विचार केला जातो . परंतु ह्या पद्धती मध्ये कोणत्याही प्रश्नाकरता साधारण कोणत्या भावाचा व ग्रहांचा विचार करायचा हे ठरलेले असले तरी विशिष्ठ नियम नाहीत . त्यामुळे एक तर बऱ्याच  अभ्यास व अनुभव ह्यांच्या जोरावर  अचूकता येत जाते व बर्याच वेळा अभ्यासा पेक्षा अंत:स्फूर्तीचा भाग जास्त  असतो . तसेच फलादेश सांगताना नक्षत्रांचा फारसा उपयोग न केल्याने चुकण्याचा जास्त संभव असतो . त्यामुळे ह्यातील त्रुटींचा अभ्यास करून व त्यावर बरेच वर्षे संशोधन करून चेन्नई येथील के. एस . कृष्णमुर्ती ह्यांनी हि नवीन पद्धत शोधून काढली .
     
कृष्णमुर्ती पद्धत हि नक्षत्रांवर  आधारित आहे .  ह्यासाठी त्यांनी अनेक ज्योतिषविषयक संस्कृत ग्रंथ व तमिळ मधील नाडी  ग्रंथांचा अभ्यास केला . ह्या सगळ्या संशोधानातून त्यांनी एक महत्वाचा निष्कर्ष काढला व असा सिद्धांत मांडला कि
" कोणताही ग्रह हा त्याच्या दशेत किंवा अंतर्दशेत तो ज्या स्थानी आहे त्या संबंधी फल न देता त्याचा नक्षत्र स्वामी जिथे आहे व त्या नक्षत्र स्वामीच्या राशी जिथे आहेत त्याची प्रामुख्याने फले देतो " . 

त्यामुळे ग्रह पत्रिकेत उच्च राशीत आहे कि नीच राशीत आहे वगेरे गोष्टीना महत्व राहत नाही . 
तसेच कोणत्या भावांची फले मिळणार हे नक्षत्र स्वामी वर अवलंबून आहे व शुभ फळे मिळणार कि अशुभ हे त्याच्या उपनक्षत्र स्वामी ( sub ) वर अवलंबून आहे .
 आता sub म्हणजे काय हे बघू . ह्या पद्धती मध्ये प्रत्येक नक्षत्राचे नऊ विभाग केले आहेत ते समान नाहीत तर विशोत्तरी दशेच्या प्रमाणात प्रत्येक नक्षत्र विभागले आहे . त्या नऊ ग्रहांच्या प्रत्येक विभागास sub म्हणतात .

कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये फलादेश सांगताना प्रत्येक भावाचा उपनक्षत्र स्वामी तसेच प्रत्येक ग्रह कोणत्या ग्रहाच्या नक्षत्रात आहे व कोणत्या ग्रहाच्या उपनक्षत्रात आहे हे माहिती असणे आवश्यक आहे तसेच भावचलित कुंडली द्वारेच बघणे योग्य आहे .
आता ह्या पद्धतीची वैशिठ्य म्हणजे फालादेश सांगण्यासाठी वापरण्यात येणारे ठराविक नियम  , तसेच येणाऱ्या महादशांचे interpretation करणे ह्या पद्धती मध्ये सोपे जाते . तसेच ruling planet म्हणजे तात्कालिक ग्रहांचा आधार घेऊन जास्तीत जास्त अचूक उत्तरे मिळतात .

त्यामुळे कृष्णमुर्ती पद्धतीचा वापर करून  शिक्षण कोणत्या शाखेचे  घ्यावे, नोकरी करावी कि व्यवसाय , कोणत्या  प्रकारह व्यवसाय करावा , विवाहाचा योग कधी आहे , विवाहासाठी पत्रीकामेलन ( ह्यात फक्त गुणमेलन अपेक्षित नाही तर दोन्ही पत्रिकांचा वैवाहिक सौख्याच्य दृष्टीने ग्रहयोग व पुढे येणाऱ्या दशा ह्या सर्वांचा विचार करावा लागतो ) 
संतती संबंधी प्रश्न , घरासाबंधी प्रश्न , उच्च शिक्षण , परदेशगमन इ. गोष्टी बद्दल मार्गदर्शन करता येते . 
तसेच प्रश्नकुंडली च्या आधारे वरील कोणत्याही प्रश्नांचे उत्तर देता येते . ज्यावेळेस जन्मवेळ माहिती नसते त्यावेळेस प्रश्नकुंडली नेहेमीच उपयोगी पडते तसेच  हरवलेली वस्तू सापडेल का ? कुठे ? कधी ? असे प्रश्न पण प्रश्नकुंडली द्वारे बघता येतात . 




Wednesday, 11 February 2015

हरवलेले घड्याळ

आमच्या एका ओळखीच्यांचे घड्याळ हरवले होते . ते एका पार्टी ला जाऊन घरी आले आणि मग नंतर त्यांना ते घड्याळ  काही केल्या सापडेना  घरात पण खूप शोधले . दहा हजार रुपयांचे घड्याळ सापडत नाही म्हटल्यावर ते अस्वस्थ झाले . त्यांना मग कृष्णमुर्ती पद्धती मध्ये ' हरवलेल्या वस्तू ' सापडतील का ? कधी ? कुठे ? असे प्रश्न विचारता येतात हे नुकतेच  कळाले होते त्यामुळे लगेचच  मला फोन केला .  फोन करण्याआधी त्यांनी ते घड्याळ घरात शोधण्याचा अगदी प्रामाणिक प्रयत्न केला होता हे त्यांच्याकडून कळालेच . त्यांना मग मी ' माझे घड्याळ सापडेल का ? ' हा प्रश्न मनात ठेवून १-२४९ ह्या मधील कोणताही एक नंबर सांगा असे मी सांगितले . त्यांनी लगेच १५० नंबर सांगितला . मी मग १५० नंबर वरून प्रश्नकुंडली बघितली .
१५० नंबर  म्हणजे वृश्चिक लग्न येते . १५० नंबर ची प्रश्नकुंडली खाली देत आहे . 


सर्वसाधारण पणे  मौल्यवान वस्तू , दागिने वगेरे द्वितीय भावावरून बघतात . हरवलेल्या वस्तू मिळतील का ? ह्या प्रश्नासंबंधी चा नियम असा आहे कि जर प्रश्नकुंडलीतील लाभ स्थानाचा उपनक्षत्र स्वामी ती वस्तू ज्या भावावरून बघतात त्या भावाचा कार्येश असेल व वक्री ग्रहाच्या नक्षत्रात नसेल तर ती हरवलेली वस्तू मिळते . 
ह्या पत्रिकेमध्ये लाभ स्थानाचा उपनक्षत्र स्वामी चंद्र आहे . चंद्र कधीच वक्री नसतो तसेच चंद्र मंगळाच्या नक्षत्रात आहे व मंगळ पण मार्गी आहे  ह्याचाच अर्थ असा कि चंद्र मंगळाच्या माध्यमातून ६ व ११ ह्या भावांचा कार्येश आहे . आता इथे खरेतर द्वितीय ( मौल्यवान वस्तू ) ह्या भावाशी चंद्राचा  थेट सबंध येत नाही पण तरीही घड्याळ मिळेल असे सांगितले कारण माझ्या बघण्यात असे आले आहे कि  लाभ स्थानाचा उपनक्षत्र स्वामी जर ६ व ११ चा कार्येश असेल तर शक्यतो वस्तू मिळते . तसेच लाभ स्थानाचा उपनक्षत्र स्वामी चंद्र हा मंगळाच्या नक्षत्रात आहे व प्रथमात वृश्चिक रास असल्याने  प्रथम भावाचा कार्येश आहेच . त्यामुळे  त्यांची घड्याळ सापडण्याची इच्छा पूर्ण होईल . ह्या सगळ्याचा सारासार विचार करून घड्याळ मिळेल असे सांगितले . आता कुठे मिळेल हे पाहण्यासाठी द्वितीय भावाचा उपनक्षत्र स्वामी पहिला तो मंगळ आहे . मंगळ  चतुर्थात कुंभ राशीत आहे  . त्यामुळे घड्याळ घरातच असावे असे अनुमान केले कुंभेत मंगळ गुरूच्या नक्षत्रात आहे . ह्याचा अर्थ घरात जिथे study रूम आहे किंवा जिथे बसून वाचन किंवा कॉम्पुटर वर काम केले जाते अशा जागी घड्याळ सापडण्याची शक्यता जास्त आहे . अशा जागी शोध म्हणून सांगितले . 
दुसर्याच दिवशी त्यांचा मेसेज आला कि घड्याळ सापडले ते  ज्या सोफ्यावर बसून नेहेमी पेपर वाचतात किंवा laptop घेऊन काम करतात त्या सोफ्याखाली घड्याळ सापडले .प्रश्नकुंडली मध्ये पण राहू लाभत आहे . प्रश्नावेळेस रवी, बुध ( राहू ) , मंगळ , चंद्र असे होते . घड्याळ सापडले तेव्हा चंद्र राहूच्याच  नक्षत्रात होता . 
बघा ग्रह कसे मार्गदर्शन करत असतात ते . 

Thursday, 5 February 2015

ज्योतिषशास्त्र / पत्रिका समज - गैरसमज व उपयोग

 खरे तर तसे ब्लॉग वर आत्तापर्यंत बर्याच लेखांमधून पत्रिकेचा  आपल्या आयुष्यात कसा उपयोग करून घेता येईल ह्या बद्दल लिहिले आहेच .तरीही सर्वसाधारणपणे बऱ्याच लोकांचा असा समाज असतो कि पत्रिका दाखवून भविष्यात घडणाऱ्या  काही वाईट गोष्टींची माहिती आत्तापासून घेऊन वर्तमान पण खराब करण्यात काय अर्थ आहे . हे त्यांचे मत एका दृष्टीने बरोबर असले तरी कोणताही सुज्ञ ज्योतिषी अशा गोष्टी सांगत नाही ज्या योगे  त्या व्यक्तीस त्रास होईल . दुसरे म्हणजे  ज्योतिषशास्त्राचा उपयोग हा आयुष्यात योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी करावा ज्या योगे जगणे सुखाचे होईल . तसेच आपल्यातील positve गोष्टींचा तसेच पुढे येणारा काळ कोणत्या गोष्टी सुचित करत आहे त्याप्रमाणे प्रयत्नांची दिशा ठरवल्यास नक्कीच यशस्वी होण्यास मदतच होते .

मी नेहेमी सांगत असते कि पत्रिकेचा वापर हा एक मार्गदर्शक म्हणून करावा . सध्या धकाधकीच्या जीवनात बर्याच प्रकारचे ताण असतात मग ते नात्यामधले असतात , करियर , शिक्षण ( सध्या मुलांच्या शिक्षणाचा ताण हे मुलांपेक्षा पालकांनाच जास्त असतो ) , पैसा (जो कितीही मिळवला तरी बऱ्याच जणांना कमीच वाटतो ), लग्न ठरत नाही म्हणून, लग्न झाल्यावर पटत नाही म्हणून , मुल होत नाही म्हणून , मुले असली तर त्यांच्या भविष्याची काळजी म्हणजे त्यांना कोणती वाईट सांगत तर लागणार नाही ना त्यांचे करियर कसे होईल किंवा सध्या बऱ्याच क्लासेस  ( संगीत , dance , चित्रकला ,कराटे , cricket ,टेनिस , वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा ) मध्ये घालाण्याची चढाओढ  खूप असते भले त्या मुलाचा त्या गोष्टीत रस असो वा नसो .  असे बऱ्याच प्रकारचे स्ट्रेस असतात . आता ह्या सगळ्यात पत्रिका कशी उपयोगी पडेल बरे ते पाहूयात .

पत्रिकेवरून साधारण व्यक्तीचा कल कुठल्या विषयात आहे ते समजू शकते त्याप्रमाणे त्याच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळावा म्हणून प्रयत्न करता येतात . तसेच शिक्षणाच्या दृष्टीने पण पत्रिका कोणती शाखा दर्शवते आहे , त्या मुलाची बौद्धिक पातळी तसेच पुढे येणाऱ्या दशा कोणत्या क्षेत्रात करियर करण्याच्या दृष्टीने चांगल्या आहेत . ह्या सगळ्या गोष्टींचा अंदाज बांधता येतो . बऱ्याच वेळा मुले खूप गोंधळलेली असतात नेमके आपल्याला काय करायला आवडेल तसेच  काय  करता येईल व  सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यातून आयुष्यात समाधान आणि पैसा दोन्ही मिळेल का ? असे प्रश्न पडतात . त्या दृष्टीने पण पत्रिका मार्गदर्शन करू शकते . इथे ' मार्गदर्शन ' हा शब्द मुद्दामूनच वापरत आहे कारण पत्रिकेचे  काम हे guidance  करण्याचे आहे शेवटी प्रयत्न त्या व्यक्तीला करणे क्रमप्राप्तच असते . ' There is no alternative for hard work ' फक्त कोणत्या दिशेन प्रयत्न करायचे हे मार्गदर्शन मात्र पत्रिकेतून  मिळू शकते . 

पत्रिकेवरून जसे शिक्षणाबाबतचे मार्गदर्शन मिळते तसेच करियर कोणत्या क्षेत्रात करावे नोकरी करावी कि व्यवसाय , लग्नाचा योग कधी आहे , संतती होण्यासंबंधी काही समस्या असतील तर कोणत्या काळात मेडिकल treatment घ्यावी , घर किवा property मध्ये investment करावी का ? तसेच आपल्याला होणाऱ्या संभाव्य आजार कोणते असू शकतील त्या दृष्टीने काळजी आधीपासून घेता येऊ शकेल जेणेकरून आजाराचे स्वरूप आटोक्यात आणता येईल .
नवरा बायकोचे पटत नसेल तर घटस्फोट घ्यावा का ? दुसऱ्या विवाहानंतर तरी वैवाहीक सौख्य आहे का?
समजा अगदी घटस्फोट घेण्यासारखे  कुयोग पत्रिकेत नसतील व पुढे येणाऱ्या दशा वैवाहिक सौख्यास support करत असतील तर दोघांना सामजस्याने राहा असे  समजावून सांगता येते . ज्याला आपण astro - counselling म्हणू शकतो .
तसेच परदेशात जाण्याचा योग आहे का ? उच्च शिक्षणाकरता परदेशात  संधी मिळेल का ? अशा बर्याच  प्रश्नांचे मार्गदर्शन मिळू शकते .

ज्योतिषशास्त्रा मध्ये एक प्रश्नकुंडली म्हणून फार उपयोगी प्रकार आहे ज्यायोगे कोणत्याही एका प्रश्नाकरता कुंडली मांडता येते मात्र प्रश्न विचारात असणाऱ्या व्यक्तीस त्या प्रश्नाची तळमळ मात्र हवी उगाच time -pass म्हणून विचारून उत्तर कधीहि बरोबर येणार नाही . ह्या प्रश्नकुंडलीच्या माध्यमातून हरवलेली वस्तु परत मिळेल का ? कधी ?साधारण कुठे? असे अंदाज बांधता येतात .तसेच बर्याच वेळा जन्माची अचूक वेळ माहिती नसते  त्यावेळेस पण बरेच प्रश्न प्रश्नकुंडली वरून सोडवता येतात जसे लग्न कधी होईल, नोकरी कधी लागेल , बदली होईल का , प्रमोशन मिळेल का ?एखादी जागा / flat घेणे लाभदायक ठरेल का ? असे बरेच प्रश्न' प्रश्नकुंडली' च्या आधारे सोडवता येतात . ह्यामध्ये कृष्णमुर्ती पद्धत फार प्रभावी वाटते .

आपल्याला ह्या जन्मी जे भोगायचे आहे किंवा उपभोगायचे आहे त्याचा आराखडा जरी ठरलेला असला तरी आपल्या प्रयत्नांनी आपण नक्कीच जीवन सुसह्य आणि सुखी कर शकतो व योग्य दिशेने प्रयत्न करण्यासाठी पत्रिकेचा वापर निश्चितच होऊ शकतो असे मला वाटते.





Wednesday, 31 December 2014

ब्लॉग च्या सर्व वाचकांना नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीचे ,भरभराटीचे आणि निरोगी जावे .

                          येणाऱ्या  नवीन वर्षात
                   तुमच्या सगळ्या पूर्ण होवोत इच्छा
                           नवीन वर्षाच्या तुम्हा
                        सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा !


वाचकांचे आभार . Pageview वरून कायम आपले लिखाण वाचले जाते आहे हे कळते आणि लिहिण्यास उत्साह येतो .

'पत्रिकेच्या माध्यमातून योग्य दिशेने प्रयत्न ' हाच मुद्दा कायम ठसवण्याचा प्रयत्न मी ह्या ब्लॉग द्वारा करत असते .

पत्रिका म्हणजेच सर्वकाही नाही पण निश्चित पणे हे एक मार्गदर्शक  म्हणून उपयोगी आहे . त्यामुळे सजगपणे आणि

तारतम्याने ह्याचा वापर केल्यास नक्कीच मदत होते .

पुन्हा एकदा सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा !






Saturday, 27 December 2014

राशी व पत्रिकेतील भाव ह्यानुसार आजार

जेव्हा पत्रिकेतून आपल्याला होणार्या संभाव्य आजारांचे अनुमान केले जाते तेव्हा  १, ५,६,८, ११ ,१२ ह्या सर्व भावांचा विचार प्रामुख्याने करावा लागतो म्हणजे ह्या भावात असणारे ग्रह , राशी त्या त्या भावांचे उपनक्षत्र स्वामी .आता जेव्हा हे analysis करायचे तेव्हा प्रत्येक ग्रहानुसार राशीनुसार तसेच नक्षत्र परत्वे कोण कोणत्या आजाराची शक्यता असते हे माहिती असणे आवश्यक आहे .
सर्वप्रथम आपण प्रत्येक राशीच्या अमलाखाली कोणते अवयव व आजार  येतात ते बघुयात .

मेष रास : डोके , मेंदू ( प्रथम स्थानावरून सुद्धा हीच अनुमाने काढता येतात )
आजार : मेंदू किंवा डोक्यासाबंधी  आजार , मेष हि मंगळाची रास असल्याने उष्णता विकार इ.

वृषभ रास : घसा , दात , डोळा , मान ( द्वितीय स्थानावरून सुद्धा हीच अनुमाने काढता येतात.)
आजार : आवाजाशी सबंधित विकार , टोन्सिल्स , दातांचे विकार, कफ तसेच वृषभ हि शुक्राची रास असल्याने व निसर्ग कुंडलीत द्वितीय स्थानी असल्याने अयोग्य आहारावरून होणारे विकार इ. 

मिथुन रास : कान , nervous system , हात (तृतीय स्थानावरून सुद्धा हीच अनुमाने काढता येतात) 
आजार : वायुमुळे होणारे विकार  , मज्जातंतू विषयीचे विकार ( nervous system ) इ. 

कर्क रास : छाती , मन, शरीरातील द्रव पदार्थ किंवा पाचक रस (चतुर्थ स्थानावरून सुद्धा हीच अनुमाने काढता येतात) 
आजार : फुफुसासाबंधी आजार , शरीरातील द्रव पदार्थ , सर्दी इ. 

सिंह रास : heart , पाठ , पाठीचा कणा (पंचम स्थानावरून सुद्धा हीच अनुमाने काढता येतात) 
आजार : heart attack , पाठीच्या कण्या सबंधित आजार इ. 

कन्या : पोट , पचन संस्था , मज्जासंस्था ( षष्ठ स्थानावरून सुद्धा हीच अनुमाने काढता येतात) 
आजार : पचनासबंधी आजार ,acidity ( विशेषत: कन्या राशीत मंगळ असेल तर ) 

तूळ रास : किडनी , कंबर ,गर्भाशय (सप्तम  स्थानावरून सुद्धा हीच अनुमाने काढता येतात) 
आजार  संदर्भात आजार

वृश्चिक रास :reproductive oragans   . ( अष्टम स्थानावरून सुद्धा हीच अनुमाने काढता येतात) 
आजार : किडनी स्टोन , गुदद्वार व वरील सबंधी आजार

धनु रास : मांड्या , बरगड्या इ. (नवम स्थानावरून सुद्धा हीच अनुमाने काढता येतात) 
आजार : वरील संबंधी आजार

मकर रास : गुढगे , हाडे , सांधे इ. (दशम  स्थानावरून सुद्धा हीच अनुमाने काढता येतात) 
आजार : त्वचा विकार , डिप्रेशन तसेच वरील संबंधी आजार

कुंभ रास : दात , रक्ताभिसरण ,पोटऱ्या  (एकादश  स्थानावरून सुद्धा हीच अनुमाने काढता येतात) 
आजार : वरील संबंधी आजार

मीन रास : पावले , पायाची बोटे ,डावा डोळा ( व्यय स्थानावरून सुद्धा हीच अनुमाने काढता येतात) 
आजार : वरील संबंधी आजार

पुढील भागात आपण प्रत्येक ग्रहांवरून होणारे आजार बघुयात .