Title

Astrology Blog by Anagha Bhade


Friday, 29 November 2013

हरवलेला चष्मा भाग -२



हरवलेली वस्तू परत मिळेल का? हा प्रश्न बघताना  ,

जर लाभस्थानाचा उपनक्षत्र स्वामी मार्गी ग्रहाच्या नक्षत्रात असून जर हरवलेली वस्तू ज्या भावावरून बघतात त्या भावाचा कार्येश असेल व ती वस्तू ज्या भावावरून बघतात त्या भावाचा उपनक्षत्र स्वामी जर मार्गी ग्रहाच्या नक्षत्रात असून लाभ स्थानाचा कार्येश असेल  तर तर ती वस्तू परत मिळते .

उद. द्वितीय स्थानावरून हरवलेले पैसे ,दागिने इ. बघतात . समजा पैसे हरवले 
असतील तर द्वितीय भावाचा उपनक्षत्र स्वामी बघावा  तो मार्गी ग्रहाच्या नक्षत्रात असून लाभ स्थानाचा कार्येश असेल व लाभस्थानाचा उपनक्षत्र स्वामी मार्गी ग्रहाच्या  नक्षत्रात असून जर द्वितीय भावाचा कार्येश असेल तर पैसे नक्की मिळतील .

५७ नंबर च्या प्रश्नकुंडली नुसार  मिथुन लग्न गुरूच्या नक्षत्रात व शनिच्या उपनक्षत्रात आहे . 

आता चष्म्याचा विचार कोणत्या स्थानावरून करावा ? असा प्रश्न पडला . 
द्वितीय स्थानावरून डोळ्याचा विचार केला जातो म्हणून मग द्वितीय स्थानाचा उपनक्षत्र स्वामी पाहिला . तो बुध आहे . बुध स्वत: मार्गी आहे व केतूच्या नक्षत्रातआहे . राहू, केतू हे छायाग्रह नेहेमीच मार्गी धरतात . आता द्वितीयस्थानाचा  उपनक्षत्र स्वामी बुध लाभास्थानाचा कार्येश आहे का ते बघू . बुध केतुच्या नक्षत्रात आहे . 

कृष्णमुर्ती पद्धती मध्ये राहू,केतू हे ज्या राशीत असतात त्याच्या अधिपती प्रमाणे तसेच ज्या ग्रहांची त्यांच्यावर  दृष्टी आहे त्या प्रमाणे फळे देतात . तसेच ते 
ज्यांच्या नक्षत्रात आहेत त्याच्या स्वामी प्रमाणे फळे देतात . 

इथे केतू मेषेत आहे . मेषेचा स्वामी मंगळ  . लाभत मेष रास असल्याने मंगळ 
लाभस्थानाचा कार्येश आहे . म्हणजे बुध पण लाभाचा कार्येश  होणार . 
तसेच लाभाचा उप नक्षत्र स्वामी द्वितीय स्थानाचा कार्येश आहे का पहु. 
लाभाचा स्थानाचा उपनक्षत्र स्वामी  राहू आहे . राहू  राहुच्याच नक्षत्रात आहे . जेव्हा कोणताही ग्रह स्वत: च्याच नक्षत्रात असतो तेव्हा तो त्याच्या उपनक्षत्र स्वामीची फळे देतो . राहू शुक्राच्या उपनाक्षत्रात मणजे तो शुक्राची फळे देणार शुक्र चंद्राच्या नक्षत्रात त्यामुळे द्वितीयाचा कार्येश आहेच . 

त्यामुळे ह्या पत्रिकेत दोन्ही नियामाप्रमाणे 'चष्मा ' मिळणार हे नक्की . पण कधी ? 
त्यासाठी ruling planets  पहिले . त्याप्रमाणे सोमवारी चष्मा मिळायला हवा 
असे वाटले . तसेही सोमवारीच शाळेत चौकशी करणार होते . 
पत्रिकेत चंद्र नवम  स्थानी  हो ता . नवम स्थान म्हणजे प्रवासाचे स्थान . शाळेत 
जाणारा मुलगा school bus मधून शाळेत जाण्यासाठीच  प्रवास 
करणार . त्यामुळे चष्मा school bus मधेच असणार असे वाटले . 
सोमवारी सकाळी bus stop वर गेल्यावर   driver काकांना परत विचारले  कि पुन्हा एकदा बघाल का ? ते म्हटले "अहो आत्ताच सकाळी सगळी बस बघितलीच आहे . "

पण सारखे वाटत होते कि प्रश्नकुंडली प्रमाणे चष्मा  मिळेल  . मग ठरवले कि 
थोड्यावेळाने शाळेत जाऊनच  विचारावे . असा विचार करून सगळी कामे पटापट आवारात होते  तेवढ्यात driver काकांचा फोन आला कि चष्मा गाडीतच सापडला . ते म्हटले मी दोनदा आधी पहिले होते पण तेव्हा दिसला 
नाही आत्ता गाडी साफ करणाऱ्या मावशीना सीट  खाली सापडला . शाळेतून घरी येताना मुलगा चष्मा घेऊन घरी आला . 

चला , म्हणजे प्रश्नकुंडली बरोबर आली तर . School bus मधून चष्मा 
प्रवास करत होता तर . नवम स्थान(प्रवास) कसे active  होते बघा . 

प्रश्नकुंडली पहिली नसती तर कदाचित परत परत driver काकांना विचारले नसते आणि त्यांनीही एकदा बघून परत कदाचित लक्ष घातले नसते ते नाहीये म्हणतायत म्हणजे चष्मा हरवला असे समजून नवीन करायला टाकला असता . 

प्रश्नकुंडलीमुळे  चष्मा करण्याचे काम आणि पैसे दोन्हीही वाचले . 

Thursday, 28 November 2013

हरवलेला चष्मा भाग -१

हरवलेला चष्मा ( प्रश्नकुंडली)

एके दिवशी शाळेतून घरी आल्यावर तासाभराने मुलाला त्याचा चष्मा सापडेना . मी म्हटले " अरे आणलास का  शाळेतून  , का शाळेत विसरलास ? " त्यावर तो अगदी confidently  'घरी आणला होता ' असे म्हणाला . मग काय सगळे घर शोधून झाले . तरी चष्मा काही मिळेना . शेवटी मला वाटले कि हा बहुतेक शाळेत विसरला आहे . पण तो म्हणता  होता कि अगदी शाळा संपेपर्यंत चष्मा खिशात होता हे त्याला आठवत होते . मग मात्र मला चष्मा बहुतेक school  bus  मध्ये राहिला असेल हि शंका आली . मी लगेच driver  काकांना फोन लावला . तेव्हा त्यांनी बस मध्ये शोधून सांगितले कि बस मध्ये चष्मा नाही . त्या दिवशी शुक्रवार होता . शनिवार व रविवार शाळेला सुट्टी असते म्हणजे आता सोमवारीच शाळेत जाऊन शोधावे लागणार . 
झाले , चष्मा सापडत नाही म्हटल्यावर आमचे चिरंजीव एकदम नाराज . त्याला मग एकदम माझ्या प्रश्नकुंडलीची आठवण झाली . आता त्याला आपली आई हरवलेल्या वस्तू ज्या प्रयत्न करून पण सापडत नाहीत त्याकरता प्रश्नकुंडली मांडते हे माहित झाले आहे . मग लगेच त्याने " माझा चष्मा मिळेल का ? " हा प्रश्न विचारला आणि ५७ नंबर दिला . 
एव्हाना सगळीकडे शोधून झाले होते . त्यामुळे मी पण प्रश्नकुंडली बघण्याचा विचार केला .

हरवलेली वस्तू परत मिळेल का? हा प्रश्न बघताना  ,
जर लाभस्थानाचा उपनक्षत्र स्वामी मार्गी ग्रहाच्या नक्षत्रात असून जर हरवलेली वस्तू ज्या भावावरून बघतात त्या भावाचा कार्येश असेल व ती वस्तू ज्या भावावरून बघतात त्या भावाचा उपनक्षत्र स्वामी जर लाभ स्थानाचा कार्येश असेल  तर तर ती वस्तू परत मिळते .
उदा . द्वितीय स्थानावरून हरवलेले पैसे ,दागिने इ. बघतात . समजा पैसे हरवले 
असतील तर द्वितीय भावाचा उपनक्षत्र स्वामी बघावा  . तो जर मार्गी ग्रहाच्या 
नक्षत्रात असून लाभ स्थानाचा कार्येश असेल व लाभस्थानाचा उपनक्षत्र स्वामी जर द्वितीय भावाचा कार्येश असेल तर पैसे नक्की मिळतील .

उर्वरित लेख  दुसऱ्या भागात . 

Wednesday, 27 November 2013

पंचमस्थान भाग -२

 पंचमस्थान भाग -२( संतति  योग )

ह्या भागात आपण संतति  योगाचा  'कृष्णमुर्ती पद्धतीने 'विचार करू .
ह्या पद्धती मध्ये  संततीचा विचार पंचम स्थानाच्या उपनक्षत्र स्वामी वरून करतात .

सर्व प्रथम त्यासाठी पत्रिका कृष्णमुर्ती पद्धती प्रमाणे बनवणे आवश्यक आहे.

जन्मपत्रिके करता संतति संबधी  नियम असा आहे कि
'' पंचम स्थानाचा उपनक्षत्र स्वामी जर द्वितीय ( कुटुंब स्थान ) , पंचम स्थान ( संतति  स्थान ) किंवा लाभ स्थान (  सर्व प्रकारचे लाभ ) ह्यापेकी एकाचा जरी कार्येश असेल तर संतति योग असतो . '

प्रश्नकुंडली करता संतति संबधी  नियम असा आहे कि ,
'' पंचम स्थानाचा उपनक्षत्र स्वामी जर द्वितीय ( कुटुंब स्थान ) , पंचम स्थान ( संतति  स्थान ) किंवा लाभ स्थान (  सर्व प्रकारचे लाभ ) ह्यापेकी एकाचा जरी कार्येश असेल व तो उपनक्षत्र स्वामी जर मार्गी ग्रहाच्या नक्षत्रात असेल तर संतति योग असतो . ' 

आता संतति योग आहे ह्याची खात्री झाल्यावर मग कधी? 
त्यासाठी महादशा स्वामी बघावा . महादशा स्वामी जर २,५,११ ह्या पेकी भावांचा कार्येश असेल व चतुर्थ स्थानाचा बलवान कार्येश नसेल तर त्या महादशेत संततियोग असतो . महादशा स्वामी जर अनुकूल असेल तर मग अंतर्दशा स्वामी बघावा तो सुद्धा  जर २,५,११ह्या पेकी भावांचा कार्येश असेल व चतुर्थ स्थानाचा बलवान कार्येश नसेल तर ती अंतर्दशा निवडावी . तसेच विदशा पण त्याच नियमाने ठरवावी . अशा प्रकारे साधारण काळ काढता येतो . 

प्रश्नकुंडली मध्ये नियमाप्रमाणे जर योग असेल तर महदशा व अंतर्दशा ठरवताना . बाकी नियामाबरोबर अजून एक नियम म्हणजे वक्री ग्रहांच्या नक्षत्रात  असलेला महादशा स्वामी फळ देत नाही . तसेच महादशा/ अन्तर्दशा स्वामी मार्गी असून स्वत: वक्री असेल  तर तो मार्गी झाल्यानंतर फळ देतो . 

जो महादशा स्वामी  किंवा अंतर्दशा स्वामी २,५,११ बरोबर चतुर्थ स्थानाचा बलवान कार्येश असेल . त्या महादशेत/ अंतर्दशेत  बर्याच वेळा abortions होण्याची शक्यता असते . कारण चतुर्थ हे पंचामाला बारावे म्हणजे विरोध करणारे स्थान आहे . अशा वेळेस योग्य दशेची  वाट बघणेच योग्य. 

ज्या दाम्पत्यांना काही medical  प्रोब्लेम मुळे मुल होत नसते अशांनी पण योग्य
दशा बघून treatment  घेतल्यास जास्त चांगले .









Monday, 25 November 2013

पंचम स्थान भाग -१ (संतति योग)

पंचम स्थान भाग -१ (संतति योग) :

पारंपारिक पद्धत :
पंचम स्थानावर मुख्यत्वे  संतति / उपासना /कला/ क्रीडा(खेळ) / investment इ . गोष्टी बघतात . त्यापेकी ह्या लेखात आपण फक्त संतति विषयाचाच  विचार करू .
संतति योग आहे का ? असेल तर केव्हा ? इ.  सर्व गोष्टींचा विचार ह्या स्थानावरून करतात .
संतति  संबंधी विचार करताना पंचम स्थान , पंचमेश ( पंचम स्थानाचा अधिपती ) तसेच संतति  चा कारक ग्रह म्हणून 'गुरु' तसेच पंचमावर व पंचमेशावर दृष्टी असणारे ग्रह ह्या सर्वांचा विचार करायला हवा .
पंचमात पापग्रह असणे ( पंचमातील शनि बर्याच वेळेस मुल होण्याच्या दृष्टीने विलंब लावतो )तसेच पंचमेश बिघडलेला असणे म्हणजे
पंचमेश शत्रू राशीत असणे , त्याचा कोणत्याही एक किंवा त्याहून अधिक ग्रहाशी कुयोग असणे  . पंचमेश अष्टमाच्या युतीत असणे ,पंचमेश वक्री असणे  इ.
गुरु हा संतति चा कारक ग्रह जर पत्रिकेत नीच राशीत पापग्रहाच्या कुयोगात असेल किंवा वक्री असेल तसेच गुरु पाप ग्रहाच्या युतीत असेल तर संतती सुखाच्या दृष्टीने चांगले नाही . गुरु- राहू युती सुद्धा संतति सुखाच्या दृष्टीने वाईटच असते .
तसेच पत्रिकेतील महादशेचा पण विचार करणे क्रमप्राप्त आहे . जर महादशा संतति होण्याच्या दृष्टीने supporting नसतील तर मग योग्य महादशा येई पर्यंत वाट बघणे आपल्या हातात असते .
हा विषय खूप मोठा आहे परंतु पंचम स्थानासाबंधी माहिती थोडक्यात देण्याचा हा प्रयास आहे .
माझ्या मते महादशांचा विचार कृष्णमुर्ती पद्धतीप्रमाणे चांगला करता येतो . तसेच कृष्णमुर्ती पद्धती मध्ये कशाप्रकारे संतति चा विचार केला जातो ते पुढील भागात
देण्याचा प्रयत्न करते .
हे सर्व वाचून , कोणतीही एक गोष्ट आपल्या पत्रिकेत आहे म्हणून संततीच्या दृष्टीने वाईट असा निष्कर्ष  काढू नये कारण कोणतेही अनुमान काढताना पत्रिकेचा सर्व बाजूने  निट  विचार करावा लागतो . 




इच्छित व्यक्तीशी विवाह होईल का?

इच्छित व्यक्तीशी विवाह होईल का?

बऱ्याच  वेळा लग्नाळू मुला मुलीना  हा प्रश्न पडतो . जर त्त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम असेल किंवा 'स्थळ ' बघण्याचा  कार्यक्रम झाल्यानंतर  एकमेकांची पसंती येई दरम्यानच्या काळात पण हाच प्रश्न असतो . असाच प्रश्न एका मुलीने काही दिवसांपूर्वी विचारला होता . तिने २-३ महिन्यापूर्वी एक मुलगा ( 'स्थळ' ) पहिला  होता . तिला तो पसंत होता व त्याच्याबरोबर लग्न व्हावे अशी तिची मनापासून इच्छा होती . परंतु त्या मुलाकडून मात्र होकार हि येत नव्हता व नकार पण . बरेच दिवस झाल्यावर आता ह्या मुलाचा विचार सोडून नवीन स्थळ बघावे असे घरातल्या लोकांचे म्हणणे होते . ह्या सगळ्या गोंधळामुळे तिने ' माझे त्या मुलाशी लग्न होईल का? '
हा प्रश्न विचारला . त्याकरता १८ नंबर कळवला . हा प्रश्न प्रश्नकुंडलीने चांगल्या प्रकारे सोडवता येतो . ज्या व्यक्तीचा हा प्रश्न आहे  त्या व्यक्तीला ' माझे इच्छित व्यक्तीशी ( ज्या कोणाशी त्या व्यक्तीस विवाह होणे अपेक्षित आहे . ती व्यक्ती ) विवाह होईल का ?'  हा प्रश्न मनात धरून १-२४९ ह्या मधील एक नंबर देण्यास सांगावे . त्या वेळेस जो नंबर डोळ्यासमोर येईल तो सांगण्यास सांगावे . lucky number  वगेरे देऊ नयेत .

ह्या प्रश्नासाठी नियम असा आहे कि ' सप्तमस्थानाचा उपनक्षत्र स्वामी  जर स्थिर राशीत असून २,७,११ चा कार्येश असेल तर इच्छित व्यक्तीशी विवाह होईल . ' तसेच तो उपनक्षत्र स्वामी वक्री किंवा वक्री ग्रहाच्या नक्षत्रात नसावा .

१८ नंबर प्रमाणे प्रश्नकुंडली तयार केली .



१८ नंबर हा मेष लग्न ,शुक्राच्या भरणी नक्षत्रात व केतूच्या सब मध्ये आहे .
ह्या कुंडली प्रमाणे सप्तमाचा उपनक्षत्र स्वामी केतू आहे . केतू छाया ग्रह
असल्याने नेहेमीच मार्गी धरतात . केतू शुक्राच्या नक्षत्रात व शुक्र पण मार्गी आहे .

केतू हा मेष राशीत आहे . त्यामुळे मंगळ कोणत्या राशीत आहे ते बघावे तर मंगळ पण सिंह ह्या स्थिर राशीत आहे .केतूचा नक्षत्रस्वामी शुक्र हा पण वृश्चिक  ह्या स्थिर राशीत आहे .
तसेच केतू शुक्राच्या नक्षत्रात असून शुक्र सप्तमात असल्याने व शुक्राची रास  द्वितीय आणि सप्तम भावारंभी असल्याने केतू २ व ७ ह्या स्थानाचा कार्येश आहेच .
तसेच ११ भावाचा उ . न . स्वामी केतू प्रथमाचा कार्येश आहेच . म्हणजे मुलीची इच्छापूर्ती पण होणार .

त्यामुळे त्या मुलीचे त्या मुलाशी नक्की लग्न होईल . असे सांगितले
त्याप्रमाणे काही दिवसांपूर्वीच ते लग्न ठरल्याचे कळले  व आता लग्नाची तयारी जोरात सुरु आहे .




Saturday, 23 November 2013

सप्तमस्थान- भाग २(घटस्फोट)

सप्तमस्थान- भाग २(घटस्फोट)
घटस्फोटाचे योग बघताना मुख्यत्वे सप्तम स्थान , सप्तमेश तसेच विवाहाचा कारक ग्रह शुक्र तसेच येणाऱ्या महादशा या सर्वाचा विचार करावा लागतो .
बर्याच वेळा सप्तमात पापग्रह असणे , सप्तमेश वक्री असून त्याचे पापाग्रहाशी कुयोग असणे इ . कारणे असतात.
बर्याच पत्रिकामध्ये शुक्राचा हर्षल, शनि , मंगल ,नेपचून ह्या ग्रहाशी प्रतियोग , षडाष्टक किंवा केंद्रयोग असतो. तसेच काही वेळेस शुक्र राहू युती पण असते .
कृष्णमुर्ती पद्धती प्रमाणे घटस्फोट होण्यासाठी महादशा स्वामी बघावा लागतो. तो जर सहा किंवा बारा भावांचा बलवान कार्येश असून तृतीय भावाचा पण कार्येश असेल तर कायदेशीर विवाह विच्छेद म्हणजे ' घटस्फोट ' होतो . जर तृतीय स्थानाशी संबंध आला नाही तर मग बहुतेक वेळा वैवाहिक सौख्य मनासारखे न मिळणे , एकमेकांपासून लांब राहणे इ. गोष्टी होतात .
बऱ्याच वेळा विचार केल्यावर असे वाटते कि आधीच्या काळी पण असे ग्रहयोग लोंकाच्या पत्रिकेत असणार पण त्याकाळी घटस्फोटाचे प्रमाण खूप कमी होते. आत्ता ते खूप वाढले आहे. त्याची बरीच कारणे आहेत जसे कि आधीची पिढी सोशिक होती किंवा तेव्हाची स्त्री शिकलेली नव्हती त्यामुळे आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी नव्हती इ.
पण प्रश्न असा आहे कि आत्ता सुद्धा बरेच जण घटस्फोट घेऊन सुखी होतात का? आता ते कोणत्या कारणाने घटस्फोट घेत आहेत त्यावर अवलंबून आहे ( काही जनाच्या बाबतीत खरेच लग्न टिकवून ठेवणे हे त्रासदायक असते ) पण नुसते पटत नाही म्हणून घटस्फोट घेणे योग्य आहे का ? विशेषत: मुले असताना .
जास्तीत जास्त जोडीदाराला समजून घेऊन नाते टिकवण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवा .
अर्थात दोघांकडून हे महत्वाचे .

नोकरी / व्यवसाय (दशमस्थान)

नोकरी / व्यवसाय (दशमस्थान)
बऱ्याच वेळा विचारला जाणारा प्रश्न म्हणजे " मी नोकरी करणे चांगले कि व्यवसाय ?" .
ह्या प्रश्नाचे उत्तर माझ्यामते कृष्णमुर्ती पद्धतीने जास्त चांगले देता येते. त्याकरता जन्मकुंडली कृष्णमुर्ती पद्धतीने बनवलेली असली पाहिजे. पत्रिकेतील ग्रहाचा भाव पारंपारिक व कृष्णमुर्ती पद्धती मध्ये बदलू शकतात कारण कृष्णमुर्ती पद्धती मध्ये भावारंभ पद्धत वापरली आहे.
दशमस्थान हे कर्म स्थान आहे. त्यामुळे दशम भावाच्या उपनक्षत्र स्वामीवरून नोकरी करणार कि व्यवसाय ते ठरवता येते.
"दशमस्थानाचा उपनक्षत्र स्वामी जर कोणत्याही प्रकारे सप्तमाचा बलवान कार्येश असेल व चर राशीत असेल तर ती व्यक्ती व्यवसाय करेल . जर दशमस्थानाचा उपनक्षत्र स्वामी षष्ठ स्थानाचा कार्येश असेल तर ती व्यक्ती नोकरी करेल. "
षष्ठ स्थानावरून नोकरीचा विचार करतात व सप्तम हे customer ( गिऱ्हाईक) चा विचार होतो .
कधी कधी व्यक्ती आधी नोकरी करते मग व्यवसाय किंवा नोकरी करता करता एखादा जोडधंदा करते .अशावेळेस बरेच वेळा दशमभावाचा उपनक्षत्र स्वामी द्विस्वभाव राशीत असतो.
प्रथम भावावरून माणसाचा कल/ पिंड कळतो म्हणजे व्यवसाय करण्यास अनुकूल आहे का नोकरीकरता .
चतुर्थ स्थान पण बघावे . कृष्णमुर्ती पद्धती मध्ये शिक्षणाचा विचार चतुर्थ स्थानावरून केला आहे. साधारण पणे शिक्षण व (व्यवसाय /नोकरी )ह्याचा संबंध असतो .
काही वेळा आपण घेतलेल्या शिक्षणाचा नोकरी/व्यवसायाशी संबंध येत नाही. त्याकरता एकंदर पत्रिकेतील
ग्रहयोग , ग्रहाच्या राशी , नक्षत्र , येणाऱ्या महादशा ह्या सर्वांचा एकत्रित विचार करावा लागतो . हे सगळे बघून मग व्यवसाय कोणता असेल ह्याचा अंदाज येतो.
दशमाचा उपनक्षत्र स्वामी कोणता ग्रह आहे हे पण पाहावे.
उदा. बुध कम्युनिकेशन , लेखन , प्रकाशन, ज्योतिष,कॉम्पुटर , स्तेशनरी, वकिली, पोस्ट इ संबंधात नोकरी/ व्यवसाय दाखवतो .
दशमस्थानाचा उपनक्षत्र स्वामीचा संबंध कोणत्या भावाशी आहे. त्याचप्रमाणे दशमभाव कोणत्या राशी व नक्षत्रात आहे हे पण बघावे.
आता व्यवसाय म्हटले तरी इतके पर्याय असतात त्यामुळे नक्की काय हे बऱ्याच वेळा अवघड असते . पण त्या व्यक्तीची आवड , क्षमता , शिक्षण येणाऱ्या महादशा ह्या सर्वाचा विचार करून मग ठरवावे.
पत्रिकेच्या आर्थिक स्थिती वरून मग व्यवसाय यशस्वी होईल का? चांगल्या पगाराची नोकरी मिळेल का? ह्या बाबत अंदाज येतो .
दशमाचा उपनक्षत्र स्वामी जर २,६,७,१०,११ ह्या भावाचा बलवान कार्येश असेल तर व्यवसायात चांगले यश मिळते .
साधारणपणे जर ५,९,८ ह्या स्थानाच्या दशा असतील तर नोकरी/ व्यवसायात अडचणी येतात . बहुतेक वेळा जर दशा/ अंतर्दशा अष्टम स्थानाचे फळ दाखवत असेल तर मनस्ताप पण होतो. त्यामुळे ह्या काळात नोकरी बदलू नये . साधारणपणे २,३,६,१०,११ ह्या स्थानाच्या दशा असतील तर नोकरी/ व्यवसायात चांगली प्रगती होते .जो/जे ग्रह दशम स्थानाचे बलवान कार्येश असतात त्या ग्रहाच्या दशा/ अंतर्दशा नोकरीत प्रमोशन / व्यवसायात प्रगती दाखवतात.
माझ्यामते मी दशमस्थानाबाबत थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जाणकारांनी अजून आपली मते व अनुभव मांडावेत .
(संदर्भांकरता सुनील देव , सुरेश शहासने, ज्योतिन्द्र हसबे ह्याची पुस्तके वापरली आहेत . )

विवाह (सप्तमस्थान )

विवाह (सप्तमस्थान )

पत्रिकेचा विषय मुख्यत्वे मुलगी/मुलगा लग्नाचा झाला व स्थळे बघण्याची वेळ आली कि निघतो .मग बरेच वेळा 
विवाहयोग कधी आहे हे विचारले जाते.  स्थळ कसे मिळेल? 
परदेशातले मिळेल कि भारतातले ? असे अनेक प्रश्न विचारले जातात . 

  पारंपारिक पद्धत :
                             सर्वसाधारणपणे पारंपारिक पद्धतीने विवाहाचा विचार करताना सप्तमेश , सप्तमातील ग्रह तसेच विवाहाचा कारक ग्रह म्हणून शुक्र तसेच मुलीची  पत्रिका असेल तर रवि इ. गोष्टीचा विचार केला जातो . 
विवाह योग लवकर आहे कि उशिरा ह्याचा अंदाज साधारण सप्तमेश , सप्तमातील ग्रह तसेच विवाह विलंब किंवा लवकर  घडवून आणणारे योग ह्यावरून येतो. महादशा , गुरु भ्रमण इ. चा विचार करून मग साधारण काळ काढता येतो.
विवाहास विलंब करणारे  योग : 
बहुतेक वेळेस शनि-शुक्र युती , चंद्र- शनि युती, पंचमात शनि, सप्तमेश निर्बली, सप्तमात पापग्रह ( मंगळ, .शनि, हर्षल), शुक्र निर्बली , मुलीच्या पत्रिकेत रवि- शनि युती यापेकी काही ग्रहयोग असतील तर बहुतेक वेळा उशिरा विवाह होतो किंवा काही वेळेस विवाह योग येताच नाही. 
विवाह लवकर होण्याचे योग:
शुभ ग्रहाचे एकमेकाशी शुभ संबंध असतील उदा. शुक्र , बुध, चंद्र,गुरु यापेकि ग्रह युतीत असणे , लग्नेश - सप्तमेश युती असणे. 
वरीलपेकी एक किवा त्याहून जास्त योग विवाह लवकर/उशिरा  होण्यास कारणीभूत ठरतात.
व .दा भट ह्यांनी 'सप्तमस्थान' ह्या पुस्तकात खूप छान विवाहाबाबत सर्वप्रकारची माहिती दिली आहे . 

कृष्णमुर्ती पद्धत :
                          कृष्णमुर्ती पद्धती प्रमाणे विवाह संबंधीचे प्रश्न बघताना सप्तमस्थानाचा उपनक्षत्र स्वामी बघतात . 
सप्तमाचा उपनक्षत्र स्वामी जर २( कुटुंब स्थान ) , ७( जोडीदाराचे स्थान), ११(लाभ स्थान) यापेकी एकाचा जरी कार्येश असेल व षष्ठ स्थानाचा एकमेव कार्येश नसेल तर त्या स्थानाच्या दशेत -अंतर्दशेत विवाह होतो. 
                         सप्तमाचा उपनक्षत्र स्वामी वरून जोडीदाराच्या बाबतीत अंदाज बांधता येतात . जर सप्तमाचा उपनक्षत्र स्वामी  शनि असेल तर मुलीस जोडीदार वयात जास्त अंतर असलेला मिळतो .(मुलाच्या बाबतीत समवयस्क किंवा वयाने जास्त मोठी वधु  मिळते ) जर चंद्र, शुक्र, बुध असेल तर वयात कमी अंतर असलेला मिळतो. रवि , मंगळ असेल तर वयात मध्यम अंतर असते .
                       सप्तमाचा उपनक्षत्र स्वामी कोणत्या स्थानाचा बलवान कार्येश आहे त्यावरून लग्न कसे ठरेल हे ठरवता येते. उदा.तृतीयाचा कार्येश असेल तर विवाह संस्था , आत्ये- मामे भावंडे , जवळ राहणार इ. , बाराव्या स्थानाचा कार्येश असेल तर परदेशातील ,पंचमाचा कार्येश असेल तर प्रेमविवाहाची शक्यता असते ( अर्थात त्या करता पत्रिकेत शुक्र, मंगळ, हर्षल ह्याचे योग लागतात . शुक्र-मंगळ युती किंवा नवपंचम योग तसेच शुक्र-हर्युती अथवा नवपंचम इ.)

               
   वरील सर्व योगाचा , महादशा,अंतर्दशाचा तारतम्याने विचार करून मग विवाह योग कधी आहे ते ठरवावे .

                       ह्या विषयाची व्याप्ती बरीच आहे पण  ह्या लेखात थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे . 
तरी मंगळ दोष , घटस्पोट,वैधव्य योग ,पुनर्विवाह योग राहून गेले आहे. जमले तर पुन्हा लिहीन .

(संदर्भांकरता व.दा भट , सुरेश शहासने, ज्योतिन्द्र हसबे ह्याची पुस्तके वापरली आहेत . ) 

प्रश्नकुंडली : कृष्णमुर्ती पद्धत

 प्रश्नकुंडली :   कृष्णमुर्ती पद्धत 

           फलज्योतिषशास्त्रात  प्रश्नकुंडली हा एक महत्वाचा विभाग आहे. ह्या पद्धती मध्ये जातकाचे जन्मासबंधी  तपशीलाची गरज नसते . कोणत्याही प्रश्न करता कृष्णमुर्ती पद्धतीने प्रश्नकुंडली मांडण्या करता प्रश्नकर्त्यास १ ते २४९ मधील कोणताही एक नंबर देण्यास सांगतात . 
                जो प्रश्न विचारायचा आहे तो मनात धरून १ ते २४९ मधील जो नंबर पहिल्यांदा डोळ्यासमोर/ मनात येईल तो नंबर सांगावा . नंबर देताना लकी नंबर वगेरे सांगू नयेत . प्रश्नकुंडली मांडताना पहिला सगळ्यात महत्वाचा नियम असा कि प्रश्न कर्त्याच्या मनात त्या प्रश्नाबाबत तळमळ हवी . उगीचच टाइम पास म्हणून किंवा ज्योतिषाची टर उडवण्यासाठी म्हणून विचारलेला नसावा . सर्वसाधारणपणे पत्रिकेत चंद्र प्रश्नाशी संबंधित असतो.प्रश्न ज्या भावाशी संबंधित असतो त्या भावात चंद्र असतो अथवा कर्क रास असते. 
                प्रश्नाच्या स्वरूप प्रमाणे कोणती स्थाने बघावीत ह्या बद्दल काही नियम आहेत. जसे घर घेण्याबाबत प्रश्न असेल तर  चतुर्थ स्थानाचा उपनक्षत्र बघावा लागतो . चतुर्थ स्थानाचा उपनक्षत्र जर मार्गी ग्रहाच्या नक्षत्रात असून तो जर चतुर्थ(घराचे स्थान), लाभ ( सर्व प्रकारचे लाभ) , व्यय ( गुंतवणूक ) ह्या स्थानांचा कार्येश असेल तर घर घेण्याचा योग त्या स्थानाच्या दशेत अंतर्दशेत असतो. 
(चतुर्थ स्थानाचा उपनक्षत्र स्वामी जर तृतीय स्थानाचा बलवान कार्येश असेल तर घर घेणे बाबत अडचणी येतील कारण तृतीय हे चतुर्थाचे व्यय स्थान आहे.)
अजून अचूक कालनिर्णयाकरता ruling  planets (r .p ) घेऊन त्यातून रवि भ्रमणाप्रमाणे महिना काढावा . 
घर लाभेल  का ? हे बघण्यासाठी  चतुर्थ स्थानाचा उपनक्षत्र स्वामी कोणत्या स्थानाचा बलवान कार्येश आहे ते बघावे तसेच महादशा व अंतर्दशा ह्याचा विचार करून मग ठरवावे .
                    कृष्णमुर्तीच्या मते प्रश्नकुंडली हे दैवी मार्गदर्शन आहे .त्यामुळे प्रश्नकर्त्याने किती प्रामाणिक पणे प्रश्न विचारला आहे  त्यावर त्याच्या उत्तराचा पडताळा येतो . 
                     खालील प्रकारचे प्रश्न प्रश्नकुंडलीने बघता येतात .उदाहरणार्थ  
घरासंबंधी प्रश्न:
घर विकत घेणे , विकणे , घराला भाडेकरू मिळणे , भाडेकरू जागा सोडून जाणे.जागेत बदल आहे का? 
तसेच जमिनीची खरेदी / विक्री . 
नोकरीत बदल आहे का? नवीन नोकरी मिळेल का? प्रमोशन मिळेल का? ठराविक नवीन प्रोजेक्ट मिळेल का?
 बदली होईल का? कधी?
ठराविक व्यवसाय करावा का? 
विवाह कधी होईल? 
प्रेमविवाह होईल का?
इच्छित व्यक्ती कडून होकार येईल का? 
एखादी वस्तू हरवली असेल तर ती मिळेल का? साधारण कधी व कुठे ?
चोरलेली वस्तू/ऐवज मिळेल का ? चोर सापडेल का? 
परदेशगमन योग आहे का? कधी? 
असे अनेक प्रश्न प्रश्नकुंडलीने सोडवता येतात. 
                   प्रश्नकुंडलीची मुख्य मर्यादा म्हणजे हि फक्त एका प्रश्नाशी निगडीत असते. प्रश्नकुंडली  विषयी थोडक्यात माहिती देण्यासाठी हे लिहिले आहे. 
                     ज्यांनी कोणी कृष्णमुर्ती पद्धतीने प्रश्नकुंडलीचा अभ्यास केला आहे किंवा ज्यांना ह्या पद्धतीचा उपयोग झाला आहे त्यांनी जरूर आपले अनुभव सांगावेत .