प्रश्नकुंडली : कृष्णमुर्ती पद्धत
फलज्योतिषशास्त्रात प्रश्नकुंडली हा एक महत्वाचा विभाग आहे. ह्या पद्धती मध्ये जातकाचे जन्मासबंधी तपशीलाची गरज नसते . कोणत्याही प्रश्न करता कृष्णमुर्ती पद्धतीने प्रश्नकुंडली मांडण्या करता प्रश्नकर्त्यास १ ते २४९ मधील कोणताही एक नंबर देण्यास सांगतात .
जो प्रश्न विचारायचा आहे तो मनात धरून १ ते २४९ मधील जो नंबर पहिल्यांदा डोळ्यासमोर/ मनात येईल तो नंबर सांगावा . नंबर देताना लकी नंबर वगेरे सांगू नयेत . प्रश्नकुंडली मांडताना पहिला सगळ्यात महत्वाचा नियम असा कि प्रश्न कर्त्याच्या मनात त्या प्रश्नाबाबत तळमळ हवी . उगीचच टाइम पास म्हणून किंवा ज्योतिषाची टर उडवण्यासाठी म्हणून विचारलेला नसावा . सर्वसाधारणपणे पत्रिकेत चंद्र प्रश्नाशी संबंधित असतो.प्रश्न ज्या भावाशी संबंधित असतो त्या भावात चंद्र असतो अथवा कर्क रास असते.
प्रश्नाच्या स्वरूप प्रमाणे कोणती स्थाने बघावीत ह्या बद्दल काही नियम आहेत. जसे घर घेण्याबाबत प्रश्न असेल तर चतुर्थ स्थानाचा उपनक्षत्र बघावा लागतो . चतुर्थ स्थानाचा उपनक्षत्र जर मार्गी ग्रहाच्या नक्षत्रात असून तो जर चतुर्थ(घराचे स्थान), लाभ ( सर्व प्रकारचे लाभ) , व्यय ( गुंतवणूक ) ह्या स्थानांचा कार्येश असेल तर घर घेण्याचा योग त्या स्थानाच्या दशेत अंतर्दशेत असतो.
(चतुर्थ स्थानाचा उपनक्षत्र स्वामी जर तृतीय स्थानाचा बलवान कार्येश असेल तर घर घेणे बाबत अडचणी येतील कारण तृतीय हे चतुर्थाचे व्यय स्थान आहे.)
अजून अचूक कालनिर्णयाकरता ruling planets (r .p ) घेऊन त्यातून रवि भ्रमणाप्रमाणे महिना काढावा .
घर लाभेल का ? हे बघण्यासाठी चतुर्थ स्थानाचा उपनक्षत्र स्वामी कोणत्या स्थानाचा बलवान कार्येश आहे ते बघावे तसेच महादशा व अंतर्दशा ह्याचा विचार करून मग ठरवावे .
कृष्णमुर्तीच्या मते प्रश्नकुंडली हे दैवी मार्गदर्शन आहे .त्यामुळे प्रश्नकर्त्याने किती प्रामाणिक पणे प्रश्न विचारला आहे त्यावर त्याच्या उत्तराचा पडताळा येतो .
खालील प्रकारचे प्रश्न प्रश्नकुंडलीने बघता येतात .उदाहरणार्थ
घरासंबंधी प्रश्न:
घर विकत घेणे , विकणे , घराला भाडेकरू मिळणे , भाडेकरू जागा सोडून जाणे.जागेत बदल आहे का?
तसेच जमिनीची खरेदी / विक्री .
नोकरीत बदल आहे का? नवीन नोकरी मिळेल का? प्रमोशन मिळेल का? ठराविक नवीन प्रोजेक्ट मिळेल का?
बदली होईल का? कधी?
ठराविक व्यवसाय करावा का?
विवाह कधी होईल?
प्रेमविवाह होईल का?
इच्छित व्यक्ती कडून होकार येईल का?
एखादी वस्तू हरवली असेल तर ती मिळेल का? साधारण कधी व कुठे ?
चोरलेली वस्तू/ऐवज मिळेल का ? चोर सापडेल का?
परदेशगमन योग आहे का? कधी?
असे अनेक प्रश्न प्रश्नकुंडलीने सोडवता येतात.
प्रश्नकुंडलीची मुख्य मर्यादा म्हणजे हि फक्त एका प्रश्नाशी निगडीत असते. प्रश्नकुंडली विषयी थोडक्यात माहिती देण्यासाठी हे लिहिले आहे.
ज्यांनी कोणी कृष्णमुर्ती पद्धतीने प्रश्नकुंडलीचा अभ्यास केला आहे किंवा ज्यांना ह्या पद्धतीचा उपयोग झाला आहे त्यांनी जरूर आपले अनुभव सांगावेत .
No comments:
Post a Comment