नोकरी / व्यवसाय (दशमस्थान)
बऱ्याच वेळा विचारला जाणारा प्रश्न म्हणजे " मी नोकरी करणे चांगले कि व्यवसाय ?" .
ह्या प्रश्नाचे उत्तर माझ्यामते कृष्णमुर्ती पद्धतीने जास्त चांगले देता येते. त्याकरता जन्मकुंडली कृष्णमुर्ती पद्धतीने बनवलेली असली पाहिजे. पत्रिकेतील ग्रहाचा भाव पारंपारिक व कृष्णमुर्ती पद्धती मध्ये बदलू शकतात कारण कृष्णमुर्ती पद्धती मध्ये भावारंभ पद्धत वापरली आहे.
दशमस्थान हे कर्म स्थान आहे. त्यामुळे दशम भावाच्या उपनक्षत्र स्वामीवरून नोकरी करणार कि व्यवसाय ते ठरवता येते.
"दशमस्थानाचा उपनक्षत्र स्वामी जर कोणत्याही प्रकारे सप्तमाचा बलवान कार्येश असेल व चर राशीत असेल तर ती व्यक्ती व्यवसाय करेल . जर दशमस्थानाचा उपनक्षत्र स्वामी षष्ठ स्थानाचा कार्येश असेल तर ती व्यक्ती नोकरी करेल. "
षष्ठ स्थानावरून नोकरीचा विचार करतात व सप्तम हे customer ( गिऱ्हाईक) चा विचार होतो .
कधी कधी व्यक्ती आधी नोकरी करते मग व्यवसाय किंवा नोकरी करता करता एखादा जोडधंदा करते .अशावेळेस बरेच वेळा दशमभावाचा उपनक्षत्र स्वामी द्विस्वभाव राशीत असतो.
प्रथम भावावरून माणसाचा कल/ पिंड कळतो म्हणजे व्यवसाय करण्यास अनुकूल आहे का नोकरीकरता .
चतुर्थ स्थान पण बघावे . कृष्णमुर्ती पद्धती मध्ये शिक्षणाचा विचार चतुर्थ स्थानावरून केला आहे. साधारण पणे शिक्षण व (व्यवसाय /नोकरी )ह्याचा संबंध असतो .
काही वेळा आपण घेतलेल्या शिक्षणाचा नोकरी/व्यवसायाशी संबंध येत नाही. त्याकरता एकंदर पत्रिकेतील
ग्रहयोग , ग्रहाच्या राशी , नक्षत्र , येणाऱ्या महादशा ह्या सर्वांचा एकत्रित विचार करावा लागतो . हे सगळे बघून मग व्यवसाय कोणता असेल ह्याचा अंदाज येतो.
दशमाचा उपनक्षत्र स्वामी कोणता ग्रह आहे हे पण पाहावे.
उदा. बुध कम्युनिकेशन , लेखन , प्रकाशन, ज्योतिष,कॉम्पुटर , स्तेशनरी, वकिली, पोस्ट इ संबंधात नोकरी/ व्यवसाय दाखवतो .
दशमस्थानाचा उपनक्षत्र स्वामीचा संबंध कोणत्या भावाशी आहे. त्याचप्रमाणे दशमभाव कोणत्या राशी व नक्षत्रात आहे हे पण बघावे.
आता व्यवसाय म्हटले तरी इतके पर्याय असतात त्यामुळे नक्की काय हे बऱ्याच वेळा अवघड असते . पण त्या व्यक्तीची आवड , क्षमता , शिक्षण येणाऱ्या महादशा ह्या सर्वाचा विचार करून मग ठरवावे.
पत्रिकेच्या आर्थिक स्थिती वरून मग व्यवसाय यशस्वी होईल का? चांगल्या पगाराची नोकरी मिळेल का? ह्या बाबत अंदाज येतो .
दशमाचा उपनक्षत्र स्वामी जर २,६,७,१०,११ ह्या भावाचा बलवान कार्येश असेल तर व्यवसायात चांगले यश मिळते .
साधारणपणे जर ५,९,८ ह्या स्थानाच्या दशा असतील तर नोकरी/ व्यवसायात अडचणी येतात . बहुतेक वेळा जर दशा/ अंतर्दशा अष्टम स्थानाचे फळ दाखवत असेल तर मनस्ताप पण होतो. त्यामुळे ह्या काळात नोकरी बदलू नये . साधारणपणे २,३,६,१०,११ ह्या स्थानाच्या दशा असतील तर नोकरी/ व्यवसायात चांगली प्रगती होते .जो/जे ग्रह दशम स्थानाचे बलवान कार्येश असतात त्या ग्रहाच्या दशा/ अंतर्दशा नोकरीत प्रमोशन / व्यवसायात प्रगती दाखवतात.
माझ्यामते मी दशमस्थानाबाबत थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जाणकारांनी अजून आपली मते व अनुभव मांडावेत .
(संदर्भांकरता सुनील देव , सुरेश शहासने, ज्योतिन्द्र हसबे ह्याची पुस्तके वापरली आहेत . )