Title

Astrology Blog by Anagha Bhade


Monday 1 June 2015

मासिक भविष्य जून २०१५


श्री . सुनिल देव ह्यांनी लिहिलेले जून २०१५ चे राशिभविष्य :
(के.पी.पद्धतीप्रमाणे)

राशिभविष्य
जून २०१५
(के.पी.पद्धतीप्रमाणे)
(टीप : सर्व भविष्य चंद्र राशीप्रमाणे दिली आहेत, पण ज्यांना लग्न रास माहीत आहे त्यांनी जन्म रास व लग्न रास अशी दोन्ही भविष्य वाचावीत.
समजा...चंद्र राशी मिथुन आहे आणि लग्न राशी मीन आहे, तर अशांनी मिथुन आणि मीन अशी दोन्ही राशींची भविष्ये पहावीत आणि समन्वय साधावा. )
मेष : मेष राशीचा स्वामी मंगळ द्वितीय स्थानी, चंद्र महिन्याच्या सुरुवातीला नवमात आणि शुक्र चतुर्थात, घराच्या संदर्भात काहीतरी लाभ दाखवत आहेत. प्रकृती मात्र उत्तम राहील. द्वितीय त्यामुळे भावात तीन ग्रह रवि, मंगळ आणि बुध निश्चितपणे आर्थिक लाभ करून देतील. तृतीयेश बुध द्वितीय स्थानी ज्यांचा व्यवसाय फिरतीचा आहे अश्यांना हा महिना लाभदायक आहे. तृतीयेश बुध असल्याने त्यांच्या बोलण्यात सुद्धा एक प्रकारचे मार्दव जाणवेल. चतुर्थातील गुरु आणि शुक्र घरातील वातावरण आनंदी ठेवेल. चतुर्थातील शुक्र व अष्टमातील शनि वाहने जपून चालवण्याचा संदेश देतात. पंचमेश रवि द्वितीयात, चंद्र पहिल्या आठवड्यानंतर १० आणि ११ ह्या स्थानी जाईल. त्यावेळी शेअरमध्ये लाभ होण्याची बरीच शक्यता आहे. तसेच मुलाबाळांच्या अभ्यासातील व इतर प्रगतीबाबत निश्चिंत असावे. कन्येचा राहू प्रकृतीसंबंधी किरकोळ तक्रारी देण्याची शक्यता आहे. सप्तमेश शुक्र चतुर्थात असल्यामुळे कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील, पण अष्टमातील शनि किरकोळ तणावाचे प्रसंग आणू शकेल. दशमेश शनि अष्टमात आणि बुध द्वितीयात ह्यामुळे कामाच्या ठिकाणी बराच ताण जाणवेल, पण मोबदला पण तेवढाच चांगला मिळेल. एकंदरीत हा महिना उत्तम आहे असे दिसते.
वृषभ : वृषभ राशीचा स्वामी शुक्र गुरूबरोबर तृतीय स्थानी आहे व शनि सप्तमात आहे. प्रकृतीच्या दृष्टीने फारशी काळजी करण्याचे कारण नाही. शिवाय रवि पण वृषभेतच असल्याने प्रकृती ठीक राहील. काही लोकांना उष्णतेचे विकार होण्याची शक्यता आहे. प्रथम भावात बुध, पंचमात राहू व नवमात शनि हा धर्म त्रिकोण बऱ्यापैकी कार्यान्वित झालेला आहे त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांना सत्संग, ध्यानधारणा, धार्मिक स्थळांना भेटी, मन:शांती इ. गोष्टींसाठी उत्तम काळ आहे. तृतीयेतील गुरु अनेक लोकांना धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे संभव दाखवत आहे. सिंह राशीचा स्वामी रवि प्रथम भावात असल्याने मुलांच्या कडे अभ्यासाबाबत अधून-मधून लक्ष घालावे लागेल, पण मुलांची एकंदरीत प्रगती चांगली राहील. सप्तमेश मंगळ तुमच्याच राशीत व सप्तमातच शनि त्यामुळे जोडीदाराबरोबर किरकोळ कुरबुरीचे प्रसंग येतील. महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चंद्र धनु राशीत, गुरु तृतीय स्थानी व केतू लाभ स्थानी आहेत. ज्यांचा व्यवसाय मार्केटिंग, पुस्तक विक्री, हॉटेल मॅनेजमेंट इ. असेल त्यांच्यासाठी काळ लाभदायक आहे. दशमेश शनि सप्तमात व बुध लग्नी ज्यांचे व्यवसाय आधीपासून आहेत, त्यांच्या व्यवसायात मंदी येण्याची शक्यता आहे, व जी नवी मंडळी व्यवसाय करू इच्छितात त्यांनी शनि मार्गी होईपर्यंत थांबल्यास उत्तम. इतर नोकरी करणाऱ्यांसाठी चांगली फळे मिळण्यासाठी शनि मार्गी होईपर्यंत वाट पहावी. एकुणात हा महिना उत्तम आहे.
मिथुन : मिथुन राशीचा स्वामी बुध बाराव्या स्थानी, चंद्र सप्तमात आणि राहू चतुर्थात हे योग घरासंबंधी काही अडथळे आणण्याची शक्यता आहे किंवा तुमच्या अगर तुमच्या जवळच्या लोकांच्या प्रकृतीची चिंता करायला लावण्याची शक्यता आहे. द्वितीयातील गुरु-शुक्र धनलाभाच्या दृष्टीने उत्तम आहेत. विशेषत: ज्यांची नोकरी परदेशात आहे, त्यांना जास्त चांगला योग आहे. शनि वक्री असल्याने काही लोकांच्या कार्यात अडथळे येण्याची शक्यता आहे. तृतीयेश रवि बाराव्या स्थानी आहे, ह्याचा अर्थ काही लोकांना परदेशगमनाचे योग येऊ शकतात व ज्यांच्या पत्रिकेत बाराव्या स्थानाशी संबंधित महादशा असेल अशी मंडळी परदेशात जास्त काळ राहतील. मुलाबाळांची खूप चिंता नसली तरी अभ्यास व इतर गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. जोडीदाराबरोबर सुसंवाद आणि खेळीमेळीचे वातावरण राहील. ज्यांचे व्यवसाय पार्टनरशिपमध्ये आहेत अश्या लोकांना जास्त लाभ मिळेल. पण तो लाभ प्रत्यक्ष दिसण्यासाठी शनि मार्गी होण्याची वाट पहावी लागेल. दशमातील केतू परदेशाशी संबंध दाखवत आहे. तसेच दशमेश गुरु तृतीयात आहे. रवि-मंगळ व बुध हे तीन ग्रह बाराव्या स्थानात असल्याने परदेशगमनाचा योग आहे. पण शनि आणि बुध हे दोन ग्रह वक्री असल्याने गोष्टींना विलंब होण्याची बरीच शक्यता आहे. एकंदरीत हा महिना थोड्याफार विलंबाने का होईना लाभदायक आहे.
कर्क : कर्क राशीचा स्वामी चंद्र महिन्याच्या पहिल्या आठवड्यात षष्ठात आणि गुरु-शुक्र कर्क राशीतच असल्याने अनेक लोकांना काहीतरी अचानक आर्थिक लाभाचा प्रसंग येऊ शकेल. प्रकृतीच्या दृष्टीने थोडाफार त्रास संभवतो, विशेषत: ज्यांना डायबेटीस आहे, अश्यांनी साखर आटोक्यात ठेवणे जरुरी आहे. सिंह राशीचा स्वामी रवि लाभात व बुध लाभात हा देखील एक चांगला आर्थिक लाभाचा योग आहे. तृतीय भावातील राहू कन्येत, कन्येचा स्वामी बुध लाभात, आणि लग्नेश षष्ठात तुम्हाला सर्वच कामात एक प्रकारचा उत्साह जाणवेल. तसेच तुमच्या शब्दालाही वजन प्राप्त होईल. चतुर्थेश शुक्र लग्नी व शनि पंचमात त्यामुळे घरगुती बाबतीत तुम्ही आनंदाने लक्ष घालणार आहात. आपल्या सर्व कौटुंबिक सदस्यांच्या गरजा अगर मागण्या तुम्ही आनंदाने पुरवणार आहात! मुलाबाळांच्या बाबतीत काळजीचे अजिबात कारण राहणार नाही, त्यांचे अभ्यास, परीक्षा सुरळीत चालतील. जोडीदाराशी सुसंवाद राहील व सलोख्याचे संबंध राहतील. नवमेश गुरु लग्नी व बुध लाभात त्यामुळे मोठ्या प्रवासाचे योग आहेत, पण सध्या बुध वक्री असल्याने कदाचित ह्या गोष्टीस विलंब लागेल किंवा कृष्णमुर्तीचा नियम पाळल्यास हातातोंडाशी आलेली गोष्ट घडणार देखील नाही. पण माझ्या अनुभवाप्रमाणे कमीत कमी बुध हा वक्री असताना देखील इतका नकारात्मक नसतो. दशमेश मंगळ लाभात, चंद्राची वाटचाल षष्ठातून सुरु होऊन नवम, दशम, आणि लाभातून होत असताना त्याच्या जोडीला शुक्र लग्नात काहीतरी अचाट गोष्टी तुमच्या हातून होणार हे नक्की!! (‘अचाट’चा अर्थ ज्याच्या त्याच्या पत्रिकेच्या दर्जानुसार घ्यावा.) एकंदरीत हा महिना कर्क राशीला उत्तम आहे.
सिंह : सिंह राशीचा स्वामी रवि दशमात व चंद्र पंचमात त्यामुळे प्रकृतीच्या दृष्टीने असे दिसते की थोड्याफार आजारपणातून रिकव्हरी मात्र ताबडतोब होईल. द्वितीयात राहू कन्येचा व बुध दशमात त्यामुळे कामाच्या ठिकाणाहून आर्थिक लाभ चांगला होईल. तृतीयेश शुक्र बाराव्या स्थानी आहे हा लांबच्या प्रवासाचा योग असला तरी कदाचित शनिमुळे त्याला बाधा येऊ शकते. सप्तमेश शनि चतुर्थात व बुध दशमात त्यामुळे असे दिसते की तुमचे सर्व लक्ष कामाच्या व्यापात राहील. अष्टमेश बाराव्या स्थानी असल्याने वाहने जपून चालवावीत. त्यातील एक चांगला भाग म्हणजे चतुर्थ, अष्टम आणि द्वादश हा मोक्ष त्रिकोण असल्याने हा काळ ध्यानधारणा, प्रवचन, सत्संग ह्या द्वारे मानसिक शांतीसाठी अतिशय लाभदायक आहे. दशमात रवि, मंगळ आणि बुध हे तीन ग्रह असल्याने त्यांचा एकत्रित परिणाम व्यवसाय अगर नोकरीच्या ठिकाणी उत्तम दिसून येईल. लाभेश बुध हा देखील दशमात असल्याने चंद्राचे भ्रमण वेळोवेळी लाभदायक ठरणार. एकंदरीत हा महिना बऱ्याच दृष्टीने उत्तम आहे, विशेषत: मोक्ष त्रिकोण अत्यंत प्रभावी आहे, त्याचा लाभ जरूर घ्यावा. काही लोकांची साधना पूर्वी थोडीफार झालेली असेल अश्यांना ह्या महिन्यात निश्चितपणे वेगळा अनुभव येईल.
कन्या : कन्या राशीचा स्वामी बुध नवमात व राहू लग्नीच. शरीरप्रकृती उत्तम राहील. द्वितीय भावाचा स्वामी शुक्र लाभ स्थानी व शनि तृतीय स्थानी त्यामुळे ज्यांचा व्यवसाय बुकसेलर्स, लेखक, मेडिकल रिप्रेझेंटेटिवज् अश्यांना आर्थिकदृष्ट्या लाभदायक आहे. तसेच ज्यांचा पुरातन (अँटिक) वस्तूंचा व्यवसाय आहे त्यांच्यासाठी देखील हा काळ उत्तम आहे. महिन्याच्या सुरुवातीला चंद्र चतुर्थात व चतुर्थेश गुरु लाभात ह्यामुळे घरगुती बाबतीत वातावरण आनंदाचे राहील. तसेच ज्यांच्या जोडीदाराचा स्वतंत्र व्यवसाय आहे, त्यांना देखील हा काळ उत्तम आहे. पंचमेश शनि तृतीय स्थानी व बुध नवम स्थानी शिवाय लग्नेश बुधच त्यामुळे ज्यांना मंत्रसिद्धीची आवड असेल अश्यांनी अजून जास्त प्रयत्न केल्यास मंत्र सिद्ध होऊ शकेल. मुलाबाळांच्या अभ्यास अगर इतर प्रगतीच्या दृष्टीने देखील उत्तम काळ आहे, काळजीचे कारण नसावे. षष्ठेश शनि तृतीयात व बुध नवमात असल्याने धार्मिक बाबतीत प्रगती दाखवत आहे. खरे तर षष्ठ स्थान एक प्रकारचे धनस्थान आहे. पण षष्ठात षष्ठेश गुरु आहे, गुरु लाभात आहे व षष्ठ स्थानी केतू आहे आणि वर सांगितल्याप्रमाणे शनि तृतीयात आणि बुध नवमात असल्याने मंत्रशक्तीचा लाभ होण्याची शक्यता अधिक वाटते. नवमातील तीन ग्रह रवि, मंगळ आणि बुध वरील सर्व विधानामुळे धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी प्रवृत्त नक्कीच करतात. दशमेश बुध नवम स्थानी वक्री असल्याने तो कर्म स्थानातून लाभ देण्याची शक्यता कमी आहे. एकंदरीत हा महिना धार्मिक दृष्ट्या उत्तम आहे.
तूळ : तूळ राशीचा स्वामी शुक्र दशमात आहे, प्रकृतीच्या दृष्टीने काळजी करण्याचे काही कारण नाही. शुक्र दशमात असल्याने तुमच्या कामात देखील उठून दिसेल असे कर्तृत्त्व गाजवण्याची शक्यता आहे. द्वितीय भावातील शनि कदाचित तुम्हाला आर्थिक बाबतीत फायदा देऊ शकणार नाही. ह्याउलट बराचसा खर्च होण्याची शक्यता आहे. त्यातील काही भाग कदाचित देणगी म्हणून द्याल असे दिसते. तृतीयेश गुरु दशमात, पहिल्या आठवड्यात चंद्र पण तृतीयात, बुध अष्टमात तुमच्या कार्यात तुम्ही बरेच यश मिळवाल असे दिसते. शिवाय कामाची दखल घेतली जाईल इतपत ऑफिसमध्ये अगर सामाजिक कार्य घडेल.चतुर्थेश शनि द्वितीय स्थानात घरासंबंधी देखील बराच खर्च दाखवत आहे. मुलाबाळांच्या अभ्यासातील व इतर प्रगती सुरळीत राहील. षष्ठात केतू व षष्ठेश गुरु दशमात प्रकृतीच्या दृष्टीने फारसे त्रास दाखवत नाहीत. सप्तमेश मंगळ अष्टमात व चंद्र तृतीयात त्यामुळे कौटुंबिक बाबतीत कदाचित दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे, त्यामुळे थोड्याफार कुरबुरी वाढू शकतील. नवमेश बुध अष्टमात व राहू बाराव्या स्थानी त्यामुळे काही अपरिहार्य प्रवास होण्याची शक्यता आहे, पण त्याबरोबर प्रवासात अडचणी येऊ शकतील. दशमेश चंद्र महिन्याच्या सुरुवातीला तृतीय स्थानी व २० तारखेनंतर तो दशमात जेंव्हा येईल हा काळ तुमच्या एकंदरीत कार्यासाठी उत्तम आहे. एकंदरीत हा महिना आर्थिकदृष्ट्या लाभदायक नसला तरी कामाच्या दृष्टीने उत्तम आहे.
वृश्चिक : वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ सप्तमात तसेच तो षष्ठेश पण आहे. शनि वृश्चिकेत आणि बुध सप्तमात शरीर प्रकृतीच्या दृष्टीने जुन्या दुखण्यांचा किरकोळ त्रास वगळता चांगला काळ आहे. महिन्याच्या सुरुवातीला द्वितीय स्थानी चंद्र, पंचमात केतू आणि नवम स्थानी गुरु धार्मिक विधी करणाऱ्या लोकांना पहिल्या दोन आठवड्यांचा काळ उत्तम आहे. नोकरी अगर व्यावसायिकांना आर्थिक दृष्ट्या हा काळ बऱ्यापैकी आहे. तृतीयेश आणि चतुर्थेश शनि, लग्नी व बुध अष्टमेश, शनिची बुधवार दृष्टी हे सर्व योग प्रवास करताना अगर वाहन चालवताना सावधगिरी बाळगण्याचा इशारा देत आहेत. मुलाबाळांच्या अभ्यासातील अगर परीक्षेतील प्रगती उत्तम राहील. सप्तमातील रवि, मंगळ, बुध हे तीन ग्रह त्यावर शनिची दृष्टी कौटुंबिक वातावरण नरम गरम ठेवील असे दिसते. नवमातील गुरु-शुक्र धार्मिक स्थळांना भेटी देण्यास उत्तम आहेत. दशमेश रवि सप्तमात व पहिल्या आठवड्यात चंद्र द्वितीयात व्यावसायिक लोकांना काही प्रमाणात लाभ मिळवून देण्याची शक्यता आहे. भागीदारीत व्यवसाय असणाऱ्यांना मात्र थोडेसे नमते घ्यावे लागणार आहे. नोकरी करणाऱ्यांना देखील वरिष्ठांबरोबर सलोख्याचे वातावरण ठेवल्यास उत्तम काळ आहे. लाभातील राहू चंद्रभ्रमणाप्रमाणे अनेक प्रकारे वेगवेगळ्या मार्गांनी लाभ मिळवून देईल. एकंदरीत हा महिना बऱ्यापैकी आहे.
धनु : धनु राशीचा स्वामी गुरु अष्टमात व बुध षष्ठात त्यामुळे शरीर प्रकृतीबाबत तक्रारी उद्भवू शकतील. त्यामुळे जून महिन्यात प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी. द्वितीयेश शनि बाराव्या स्थानी व बुध षष्ठ स्थानी त्यामुळे आर्थिक प्राप्ती बऱ्यापैकी होईल असे दिसते. काही लोकांना लांबच्या प्रवासाचे योग येतील. चतुर्थातील केतू व बाराव्या स्थानातील शनि शेअर वा तत्सम गुंतवणुकीपासून लांबच राहावे असा इशारा देतात. मुलाबाळांकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. सप्तमेश बुध षष्ठात त्यामुळे कौटुंबिक वातावरण चंद्रभ्रमणावर अवलंबून राहील. दशमातील राहू नोकरी करणाऱ्यांसाठी उत्तम आहे, तसेच आर्थिक लाभ देखील बरेच मिळवून देईल. लाभेश शुक्र अष्टमात व शनि बाराव्या स्थानी काही लोकांना कामाचा ताण बराच जाणवेल असे दिसते. एकंदरीत हा महिना संमिश्र फळे देणार आहे असे दिसते.
मकर : मकर राशीचा स्वामी शनि लाभात व बुध पंचमात प्रकृतीच्या दृष्टीने हा योग उत्तम आहे. द्वितीयेश शनि देखील लाभात असल्याने आर्थिक प्राप्तीचे योग येतील. तृतीयातील केतू छोटेमोठे प्रवास घडवून आणेल. पंचम भावातील रवि, बुध आणि मंगळ व लाभातील शनि ह्या ग्रहस्थितीमुळे शेअर मध्ये गुंतवणूक केली असल्यास काही प्रमाणात लाभ मिळतील. तसेच मुलाबाळांच्या दृष्टीने देखील काळ उत्तम आहे. षष्ठेश बुध पंचमात असल्याने शरीर प्रकृतीची चिंता नसावी. सप्तमातील गुरु-शुक्र कौटुंबिक वातावरण सलोख्याचे व आनंदाचे ठेवील. नवमात कन्येचा राहू व बुध पंचमात आहे, राहूमुळे ध्यानधारणा व धार्मिक कार्ये ह्यात अडथळे येण्याची शक्यता आहे. तरीही नेटाने धार्मिक व अध्यात्मिक चर्चेद्वारा मन:शांती मिळू शकेल...ह्याचे कारण म्हणजे प्रथम, पंचम आणि नवम भावांचा संबंध येत आहे आणि शनि लाभात आहे. दशमेश शुक्र सप्तमात व शनि लाभात व्यावसायिकांना हा काळ चांगला आहे, तसेच नोकरी करणाऱ्यांना देखील प्रमोशनचे चान्सेस आहेत. एकंदरीत हा महिना उत्तम आहे.
कुंभ : कुंभ राशीचा स्वामी शनि दशमात, बुध चतुर्थात शरीर प्रकृती चांगली राहील. द्वितीय भावातील केतू नोकरी अगर व्यवसायाच्या ठिकाणी निश्चित आर्थिक लाभ करून देईल. तृतीयेश मंगळ चतुर्थात त्यामुळे फारसे प्रवास घडतील असे वाटत नाही. पण चंद्राच्या भ्रमणाप्रमाणे काही वेळेला पुस्तक विक्रेते आदी व्यावसायिकांची चांदी होईल. चतुर्थात तीन ग्रह रवि, मंगळ, बुध निश्चितपणे नवीन घर खरेदी अगर घरासंबंधी व्यवहार ह्यात लाभ करून देतील. पंचमेश बुध चतुर्थ स्थानी लहान मुलांच्या बाबतीत थोडी काळजी घ्यावी लागेल असे सुचवतो. षष्ठातील गुरु, शुक्र आर्थिक बाबतीत उत्तमच आहेत. प्रकृतीची फारशी काळजी करण्याचे कारण नाही. कौटुंबिक वातावरण देखील सलोख्याचे राहील. दशमेश मंगळ चतुर्थात, शुक्र षष्ठात तसेच शनि दशमात आणि बुध चतुर्थात हे सर्व ग्रहयोग व्यावसायिक दृष्ट्या आणि नोकरी करणाऱ्या सर्वांना अतिशय उत्तम आहेत, वरिष्ठांकडून कामाची दखल घेतली जाईल असे दिसते. एकंदरीत हा महिना सर्व दृष्टींनी उत्तम आहे.
मीन : मीन राशीचा स्वामी गुरु पंचमात, लग्न स्थानी केतू व नवमात शनि प्रकृती दृष्ट्या काळ उत्तमच आहे. शिवाय ज्यांना अध्यात्माची आवड आहे त्यांच्या ध्यानधारणेसाठी अतिशय उत्तम काळ आहे. एकाग्रता उत्तम होईल आणि त्यापासून निश्चितपणे लाभ होईल. त्याबरोबर तरुण मंडळींचे सूत देखील जमू शकेल. द्वितीयेश मंगळ तृतीय स्थानी त्यामुळे वक्ते, शिक्षक आणि भविष्यवेत्ते ह्यांना हा काळ अतिशय उत्तम आहे. मुलाबाळांच्या दृष्टीने देखील हा काळ उत्तम आहे. सप्तमेश बुध तृतीयात, राहू सप्तमात जोडीदाराशी किरकोळ कुरबुरी होऊ शकतील. महिन्याच्या सुरुवातीला दशमात चंद्र व केतू लग्न स्थानी काही लोकांच्या हातून भरीव कार्य होण्याची शक्यता आहे. तसेच काही लोकांची बदली अगर नोकरीत बदल होण्याची संभावना आहे. लाभेश शनि नवमात व बुध तृतीयात आर्थिक लाभापेक्षा अध्यात्मिक लाभ जास्त दर्शवतो आहे. एकंदरीत हा महिना अध्यात्मिक लाभ भरपूर प्रमाणात मिळवून देणार आहे. मीन राशीच्या लोकांना निश्चितपणे मन:शांतीचा लाभ होईल.