Title

Astrology Blog by Anagha Bhade


Friday 31 July 2015

राशीभविष्य ऑगस्ट २०१५

राशीभविष्य ऑगस्ट २०१५
(के.पी.पद्धतीप्रमाणे)

(टीप : सर्व भविष्य चंद्र राशीप्रमाणे दिली आहेत, पण ज्यांना लग्न रास माहीत आहे त्यांनी जन्म रास व लग्न रास अशी दोन्ही भविष्य वाचावीत.
समजा...चंद्र राशी मिथुन आहे आणि लग्न राशी मीन आहे, तर अशांनी मिथुन आणि मीन अशी दोन्ही राशींची भविष्ये पहावीत आणि समन्वय साधावा. )

ह्या महिन्यातील महत्वाचे ग्रहांचे राशीप्रवेश :

१४ ऑगस्ट पासून शुक्र कर्क राशीत वक्री , २३ ऑगस्ट पासून बुध कन्या राशीत, ३१ जुलै पासून मंगळ कर्क राशीत ,१७ ऑगस्ट पासून रवि सिंह राशीत,१४ जुलै पासून गुरु सिंह राशीत, २ ऑगस्ट पासून शनि वृश्चिक राशीत मार्गी होत आहे .


मेष : मेष राशीचा स्वामी मंगळ चतुर्थात त्याच्या जोडीला रवि व बुध हे सर्व योग प्रकृती ठणठणीत राहील असे दाखवतात . तसेच ह्या महिन्यात प्रवास फारसा होणार नाही . तुम्ही घरात जास्त वेळ देऊ शकाल . ह्या महिन्यात आर्थिक व्यवहार जपून करावेत कारण शुक्र पंचमात आणि केतू बाराव्या स्थानात आहेत . हे दोन्ही ग्रह व्यवहारात नुकसान दाखवतात . जी लोक सध्या घरापसुन लांब आहेत त्यांना स्वगृही येण्या करता काळ उत्तम आहे . चतुर्थात तीन ग्रह असल्याने शिक्षणाच्या दृष्टीने चांगला काळ आहे . १७ ऑगस्ट नंतर कला /क्रीडा , शेयर्स चा व्यवसाय असणारे लोक ह्यांच्या करता काळ चांगला आहे . जोडीदाराशी सबंध सर्वसाधारण राहतील . सध्याचा काळ धार्मिक /अध्यात्मिक कार्याला चांगला आहे .नोकरी/व्यवसायात कामाचा ताण राहील तसेच आर्थिक बाबतीत सुद्धा पटकन हातावेगळी होण्याची शक्यता कमी आहे . हा महिना सर्वसाधारण राहील .


वृषभ : ह्या महिन्यात मनाविरुद्ध काही प्रवास घडण्याची शक्यता आहे कारण शुक्र वक्री आहे व तृतीयात तीन ग्रह आहेतच . कदाचित भाऊ बहिणीच्या काही कामासाठी प्रवास घडतील . शिक्षणाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना चांगला काळ आहे . तसेच मातृसौख्य चांगले मिळेल . कलाकारांच्या दृष्टीने चांगला काळ आहे. स्पर्धा परीक्षांचे निकाल लांबण्याची शक्यता आहे . जोडीदाराबरोबर वाद टाळणे शहाणपणाचे ठरेल . काही आर्थिक लाभ पण होतील असे वाटते. ह्या महिन्यात भाग्य फारसे साथ देणार नाही त्यामुळे प्रयत्न जास्त करावे लागतील . नोकरी/व्यवसायात पण त्रास होण्याची शक्यता आहे .हा महिना वृषभ राशीच्या लोकांना सर्वसाधारण राहील .
मिथुन : ह्या राशीच्या लोकांना त्यांनी पूर्वी केलेल्या कामाचे फळ ह्या महिन्यात मिळेल . तसेच प्रसिद्धीच्या दृष्टीने पण योग चांगले आहेत . द्वितीयात तीन ग्रह असल्याने आर्थिक दृष्टीने महिना चांगला जाईल.पुस्तक विक्रेते किंवा सरकारी कामाशी सबंधित असलेले व्यावसायिक ह्यांना हा महिना फायद्याचा जाईल. चतुर्थातील राहूमुळे घरासबंधी लाभ होतील तसेच घरात थोडेफार ताण-तणाव पण जाणवतील. कलाकार मंडळी कामात व्यस्त राहतील .मुलांच्या दृष्टीने महिना सर्वसाधारण राहील . ज्या लोकांनी कर्ज मिळण्यासाठी अर्ज केला आहे त्यांना उशिराने किंवा अपेक्षेपेक्षा कमी कर्ज मिळेल.घरातले वातावरण थोडे नरम-गरम राहील .त्यामुळे मौन स्वीकारणे उत्तम . व्यावसायिकांना हा काळ त्यांच्या कार्याची दाखल घेण्याच्या दृष्टीने उत्तम आहे . हा महिना मिथुन राशीच्या लोकांना आर्थिक दृष्ट्या चांगला जाईल.
कर्क : प्रथम स्थानात रवि,बुध ,मंगळ हे ग्रह असल्याने प्रकृती चांगली राहील. समाजामध्ये मान मिळेल . ह्या महिन्यात खर्चाचे प्रमाण वाढेल. भावाबहिणींचे सबंध चांगले राहतील. लेखकांच्या दृष्टीने चांगला काळ आहे . विद्यार्थ्यांना सुद्धा हा काळ चांगला आहे . मुलांशी सबंध खेळीमेळीचे राहतील . व्यावसायिक खेळाडू तसेच ह्या क्षेत्राशी सबंधित व्यावसायिक ह्याना काळ चांगला आहे . कर्ज मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्नात असाल तर यश मिळेल . जोडीदाराबरोबर थोड्या कुरबुरी होऊ शकतील. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्या लोकांना आर्थिक फायदा होईल . भागीदाराशी सबंध सालोख्याचे राहतील . धार्मिक क्षेत्रात कार्य करणार्यांना आर्थिक लाभ होतील. व्यावसायिकांना हा काळ चांगला आहे परंतु लाभ एकदम होणार नाहीत .एकंदरीत हा महिना चांगला जाईल.
सिंह : हा महिना अनेक गोष्टींमध्ये तुम्हाला व्यस्त ठेवेल . प्रकृतीच्या दृष्टीने महिना चांगला आहे . केलेल्या कामाचा मोबदला आर्थिक दृष्टीने लगेच मिळणार नाही . ह्या महिन्यात अनेक प्रवास होतील . कदाचित काही वेळेला प्रवासात ऐनवेळी अडचणी येण्याची शक्यता आहे . तयारीत राहावे . घरासबंधी काही खर्च निघतील. मुलांच्या दृष्टीने महिना सर्वसाधारण आहे . ह्या महिन्यात कामाच्या व्यस्ततेमुळे घरात वेळ कमी दिला जाईल . त्यामुळे थोडीफार घरामध्ये अशांती राहील.अनेक गोष्टींमध्ये लक्ष द्यावे लागत असल्याने मानसिक ताण / थकवा जाणवेल. हा महिना कामाच्या बाबतीत उत्तम परंतु घरघुती बाबतीत नरम-गरम राहील .
कन्या : तुम्ही ठरवलेल्या कामात अडथळे येतील किंवा विलंब होण्याची शक्यता आहे .प्रकृतीच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे . आर्थिक व्यवहारात म्हणावा तसा फायदा होणार नाही कारण द्वितीयेश शुक्र बाराव्या स्थानी असून तो वक्री आहे . कागदपत्राशी सबंधित व्यवहार थोड्याश्या विलंबाने परंतु सुरळीत पार पडतील . ज्या लोकांनी नोकरी संबंधात इंटरव्ह्यू दिले /देणार आहेत त्यांना त्यात यश मिळेल. ज्या लोकांना नवीन घर घेण्यात इंटरेस्ट आहे त्यांनी जरूर घ्यावे त्यात अडचणी येणार नाहीत . शिक्षणाच्या दृष्टीने तृतिय स्थानातील शनि चांगला आहे . बांधकाम क्षेत्रात नोकरी करणाऱ्या लोकांना फायदा होईल. ह्या महिन्यात थोडे प्रवास होतील. काही लोकांना वारसा हक्काने मिळणारी संपत्ती मिळण्याचे योग आहेत .नोकरी करणार्यांनी आपल्या अधिकाऱ्याशी जमवून घेणे उत्तम . नवमेश शुक्र बाराव्या घरात असला तरी वक्री असून थोडे दिवसांनी कर्केत येत आहे .त्यामुळे परदेश प्रवास लांबणीवर पडतील. हा महिना एकंदरीत संमिश्र राहील.
तूळ : तूळ राशीचा स्वामी शुक्र लाभ स्थानी असून केतू षष्ठात मीन राशीत आहे व मीन राशीचा स्वामी गुरु हा देखील लाभातच आहे, त्यामुळे तुमची प्रकृती चांगली राहील. शुक्र वक्री असल्याने आर्थिक लाभ थोडाफार उशिराने होण्याचा संभव आहे. द्वितीय स्थानातील शनि मार्गी झाल्याने तुमचे आर्थिक व्यवहार एकेक करून पूर्ण होतील. तृतीयातील गुरु लाभात आणि केतू षष्ठात हा योग स्पर्धात्मक परीक्षेसाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना यश देईल. पुस्तकाचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना देखील हा काळ आर्थिक दृष्ट्या उत्तम आहे. चतुर्थेश शनि द्वितीय स्थानात मार्गी आहे, त्यामुळे घरासंबंधी रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. पंचमात चंद्र व पंचमेश शनि द्वितीयात मुलाबाळांच्या अॅडमिशनच्या दृष्टीने पण काळ चांगला दर्शवतात. शेअरचा व्यवसाय करणाऱ्यांना ऑगस्टच्या सुरुवातीचा काही काळ चांगला आहे, पुढे मात्र सावधगिरीने व्यवहार करावा. सप्तमेश मंगळ दशमात व गुरु लाभात जोडीदाराशी थोडी कुरबुर होण्याची शक्यता दाखवतात, तरीही त्याच्या मार्फत लाभ देखील होतील. दशमातील तीन ग्रह रवि, मंगळ आणि बुध हे निश्चितपणे अनेक लोकांना नोकरीत प्रमोशन किंवा इतर लाभ मिळवून देतील. एकंदरीत महिना उत्तम आहे.
वृश्चिक :ह्या महिन्यात शनि लग्नी व रवि ,मंगळ नवमात ,पंचमात केतू असल्याने हा योग धार्मिक /अध्यात्मिक दृष्ट्या उत्तम आहे . आर्थिक बाबतीत व्यवहार जपून करावेत , हा महिना थोडा खर्चाचा वाटतो आहे . कामाच्या ठिकाणी उत्साह राहिल. मातृसौख्य चांगले राहील. ह्या महिन्यात तुम्ही कुटुंबा सोबत बरेच मनोरंजनाचे कार्यक्रम आखाल . कलाकार कामामध्ये व्यस्त राहतील.ज्यांच्या पत्रिकेत १ व ६ ह्याच्याशी सबंधित अशा दशा चालू असेल त्यांनी ह्या महिन्यात प्रकृतीस जपावे .जोडीदाराशी सबंध ठीक राहतील. सरकारी नोकरदारांना आर्थिक फायदे होतील. दशमात बुध,गुरु,शुक्र एवढे तीन ग्रह असले तरी बुध व गरु केतूच्या नक्षत्रात असून केतू पंचमात असल्याने तसेच शुक्र वक्री असून नंतर कर्केत जात असल्यामुळे दशमभाव तसा बलवान नाही . त्यामुळे व्यवसाय/नोकरी करणार्यांनी व्यवहार जपून करावेत . एकंदरीत हा महिना काही बाबतीत चांगला आहे व काही बाबतीत खबरदारी घ्यावी .
धनु : धनु राशीचा स्वामी गुरु नवमात आहे त्यामुळे भाग्याची साथ लाभेल तसेच प्रकृती पण चांगली राहील. . शनि बाराव्या स्थानी असल्याने खर्च वाढतील. नवमात बुध,गुरु शुक्र व तृतीयेश शनि बाराव्या स्थानी असल्याने अनेकांना प्रवास घडतील. विद्यार्थ्यांना हा काळ उत्तम आहे . विशेषतः पद्युत्तर शिक्षणासाठी छानच . घरगुती वातावरण आनंदी राहील. शेयर्स चा व्यवसाय करणार्यांनी जपून व्यवहार करावेत . आधीची काही कर्ज असतील तर ह्या महिन्यात फेडू शकाल . मंगळ अष्टमात असल्याने मानसिक ताण जाणवेल तसेच काही लोकांना नातेवाईक किंवा मित्रमंडळ ह्यांच्यासाठी हॉस्पिटलच्या वाऱ्या कराव्या लागतील .व्यवसाय /नोकरी करणार्यांना मानसिक ताण जाणवेल.एकंदरीत हा महिना विशेष आर्थिक लाभदायक नाही .
मकर : ह्या महिन्यात प्रकृतीच्या कुरबुरी राहतील . द्वितीयेश शनि लाभात आर्थिक प्राप्ती मात्र चांगली राहील. केतू तृतीयात व गुरु ,बुध ,शुक्र हे तीन ग्रह अष्टमात असल्याने जोडीदाराची पण आर्थिक प्राप्ती चांगली राहील .वारसा हक्काच्या दृष्टीने प्रयत्न करत असाल तर हा महिना चांगला आहे . घरात थोद्य्फार कुरबुरी झाल्या तरी एकंदरीत वातावरण सुखद राहील .मुलांशी मात्र ह्या महिन्यात थोडे समजुतीने घ्यावे लागेल नाहीतर वादाचे प्रसंग उद्भवतील .ज्यांचा व्यवसाय भागीदारीत आहेत त्यांनी सावधगिरी बाळगावी . ह्या महिन्यात फारसे प्रवास होणार नाहीत . केतू तृतीयात असल्याने नोकरी /व्यवसाय करणार्यांना कामाचा व्याप वाढलेला जाणवेल. एकंदरीत हा महिना संमिश्र राहील .
कुंभ : कुंभ राशीचा स्वामी शनि मार्गी असून तो तुमच्या दशमात आहे. ह्या महिन्यात तुमच्या यशाची कमान चढत राहील. कामाची दाखल गेतली जाईल. तारीख ५-६ च्या दरम्यान चंद्र द्वितीयात येतो. अचानक धनलाभाचा प्रसंग दिसत आहे. तृतीयेश मंगळ षष्ठात, शनि दशमात हा योग इंटरव्ह्यु, अग्रीमेंट , स्पर्धा परीक्षा इ. गोष्टींमध्ये यश मिळेल . विवाह इच्छुकांनी तयारीत राहावे .लग्न ठरण्याचे योग आहेत . शनि दशमात , मंगळ षष्ठात आहे व दशमेश आहे त्यामुळे नोकरी/व्यवसाय करणाऱ्या लोकांना हा काळ उत्तम आहे . एकंदरीत हा महिना उत्तम आहे .
मीन : राशीस्वामी गुरु षष्ठात व केतू लग्नी व ज्यांच्या पत्रिकेत शनि अष्टमात असेल अशा लोकांचे जुने आजार त्रास देऊ शकतील असे वाटते परंतु रवि पंचमात असल्याने आजाराची तीव्रता फार राहणार नाही . आर्थिक दृष्ट्या हा महिना ठीक राहील. आर्थिक व्यवहार सावधानीने करावेत . ज्यांचा व्यवसाय फिरतीचा आहे किंवा पुस्तक व स्टेशनरी चा व्यवसाय असणाऱ्या लोकांचे आर्थिक व्यवहार लांबणीवर पडतील. धार्मिक अध्यात्मिक दृष्टीने हा महिना चांगला जाईल .जोडीदारशी पटवून घेतलेले बरे .भागीदारीत व्यवसाय असणार्यांनी व्यवहारात काळजी घ्यावी .नोकरी /व्यवसायाच्या दृष्टीने काळजीचे कारण नाही . प्रवासाचे फारसे योग वाटत नाहीत . एकंदरीत हा महिना ठीक राहील.
गुरु बदलाचा प्रत्येक राशीवर होणारा परिणाम ह्या विषयावरील लेख लवकरच प्रसिद्ध करू .

वरील राशी भविष्य अनघा भदे  व सुनील देव (Astrology Counselling ) ह्यांनी लिहिले आहे .



Thursday 30 July 2015

गुरुपोर्णिमेच्या निमित्ताने …

आज गुरुपोर्णिमा सगळ्यात पहिले माझे गुरु म्हणजे माझे आई वडील  . आई -वडील सगळ्यात निरपेक्ष राहून सतत आयुष्यभर मार्गदर्शन करत असतात . 
माझी आई सौ . सुनिता पळसुले  व वडील श्री . विजय पळसुले ह्या दोघांनाहि माझा सर्वप्रथम नमस्कार !
आपल्या आयुष्यात बरेच गुरु असतात म्हणजे अगदी शाळा , कॉलेज , इतर क्लासेस मधले गुरु , आपण ज्यांना आदर्श मानतो अशी लोकं .अशांना पण माझा नमस्कार !
निसर्ग व त्यातील प्रत्येक गोष्ट ह्यापासून  आपण काहीतरी शिकत असतो. त्या निसर्गाला आज वंदन .

ज्योतिषशास्त्र ह्या विषयी सांगायचे तर ज्यांची बरीच पुस्तके मी वाचली असे सर्व आदरणीय ज्योतिर्विद्य,
माझे गुरु श्री . सुनील देव  ह्या सगळ्यांना मन:पूर्वक नमस्कार .
ह्या सगळ्यांचे आशीर्वाद घेण्याचा दिवस आहे .
त्या सर्वांचे आशीर्वाद कायम मला मिळोत हि इच्छा !
Last but not the least 'INTERNET' through which we always learn many things !


Tuesday 7 July 2015

कृष्णमूर्ती पद्धतीचे ज्योतिष क्लासेस

कृष्णमूर्ती  पद्धतीचे ज्योतिष क्लासेस जुलै अखेरीपासून सुरु करत आहोत .

कोर्स चा कालावधी : ५ महिने , आठवड्यातून एक दिवस एक तास 

ह्या कोर्से मध्ये संपूर्ण कृष्णमुर्ती पद्धतीचा अभ्यास अनेक उदाहरणासकट घेतला जाईल . 
जन्मपत्रिका , प्रश्नकुंडली ह्याचा अभ्यासक्रमात समावेश आहे . 
कोर्स संपल्यावर परीक्षा घेतली जाईल . त्यात उत्तीर्ण होणार्यांना ' वेदांग ज्योतिष ' ह्या संस्थेचे प्रमाणपत्र दिले जाईल. 

कृष्णमुर्ती पद्धतीने ज्योतिष शिकण्यासाठी पारंपरिक ज्योतिषाचे साधारण ज्ञान असल्यास उत्तम नाहीतर आवश्यक तेवढे शिकवले जाईलच.

इच्छुकांनी खालील नंबर वर संपर्क करावा :

अनघा भदे- 9011201560
anaghabhade@gmail.com

सुनिल देव -9822206170
sunil_deo41@hotmail.com

Wednesday 1 July 2015

मासिक भविष्य जुलै २०१५



मासिक भविष्य जुलै २०१५

श्री सुनिल देव ह्यांनी लिहिलेले जुलै २०१५ चे राशिभविष्य 
राशिभविष्य
जुलै २०१५
(के.पी.पद्धतीप्रमाणे)
(टीप : सर्व भविष्य चंद्र राशीप्रमाणे दिली आहेत, पण ज्यांना लग्न रास माहीत आहे त्यांनी जन्म रास व लग्न रास अशी दोन्ही भविष्य वाचावीत.
समजा...चंद्र राशी मिथुन आहे आणि लग्न राशी मीन आहे, तर अशांनी मिथुन आणि मीन अशी दोन्ही राशींची भविष्ये पहावीत आणि समन्वय साधावा. )

ह्या महिन्यातील महत्वाचे ग्रहांचे राशीप्रवेश :

५ जुलै पासून शुक्र सिंह राशीत, ५ जुलै पासून बुध मिथुन राशीत, ३१ जुलै पासून मंगळ कर्क राशीत, १७ जुलै पासून रवि कर्क राशीत, १४ जुलै पासून गुरु सिंह राशीत प्रवेश करत आहे . 

मेष : ह्या महिन्याच्या सुरुवातीला मेष राशीचा स्वामी मंगळ तृतीयात आहे त्यामुळे द्वितीयातील बुध व षष्ठातील राहू तुम्हाला प्रवासातून आर्थिक लाभ मिळवून देण्याची शक्यता आहे . ह्याचा अर्थ असा कि ज्यांचा व्यवसाय फिरतीचा आहे अशा लोकांना हा काळ लाभदायक आहे . द्वितीयेश शुक्र ५ जुलै नंतर सिंह राशीत जात असल्याने कुटुंबासह मजेत वेळ घालवाल असे वाटते. घरगुती वातावरण चांगले राहील. १६ जुलै पर्यंत ज्या लोकांचा व्यवसाय event management तसेच कलात्मक वस्तू अथवा क्रीडा साहित्य विक्रीचा आहे त्यांना लाभ होतील .मुलांच्या दृष्टीने पण काळ ठीक आहे. षष्ठाचा स्वामी बुध ४ जुलै नंतर मिथुन राशीत जात असल्याने प्रकृतीची काळजी करण्याचे फारसे कारण नाही. शुक्र पंचमात असल्याने जोडीदाराबरोबर खेळीमेळीचे व आनंदाचे वातावरण राहील. घरातील मोठ्या मुलांच्या सहलीच्या योजना आखल्या जातील . ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अर्ज करायचा आहे त्यांच्याकरता उत्तम काळ उत्तम आहे . नोकरीत असणाऱ्या लोकांना वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. व्यवसाय असणार्यांनी व्यवहार साभाळून करावेत .एकंदरीत हा महिना कौटुंबिक दृष्ट्या उत्तम आहे परंतु नोकरी/व्यवसाय करणाऱ्यांनी काळजी घ्यावी .

वृषभ : ह्या महिन्याच्या ५ जुलै नन्तर शुक्र चतुर्थात असल्याने सर्व लक्ष घरासाबंधी कामाकडे जास्त राहील. द्वितीयात तीन ग्रह असल्याने वृषभ राशीला आर्थिक दृष्ट्या अतिशय उत्तम काळ आहे. गुरु तृतीयात उच्चीचा असल्याने सतत कार्यरत व उत्साही राहाल. शिक्षकांना तसेच वक्त्यांना हा काळ आर्थिक दृष्ट्या उत्तम आहे. घरासाबंधी व्यवहाराकरता हा महिना फायदेशीर आहे. शुक्र चतुर्थात व रवि द्वितीयात असल्याने नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील व तसेच घरातील वातावरण आनंदी राहील. राहू पंचमात व बुध द्वितीयात हा ग्रहयोग कलाकार,खेळाडू तसेच शेयर ब्रोकर्स ना आर्थिक दृष्ट्या उत्तम आहे. मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने पण हा काळ चांगला आहे. गुरु तृतीयात व बुध द्वितीयात असल्याने शक्यतो वादावादीचे प्रसंग टाळावेत. एकंदरीत महिना उत्तम आहे .
मिथुन : प्रकृतीच्या दृष्टीने हा महिना उत्तम राहील परंतु प्रथम भावातील मंगळ उष्णतेचे विकार देऊ शकतो त्या दृष्टीने काळजी घ्यावी. आर्थिक दृष्टीने महिना सर्वसाधारण राहील. तृतीयातील शुक्र दशमातील केतू व षष्ठातील शनि हे सर्व योग अध्यात्मिक दृष्ट्या चांगले आहेत. ज्यांना ह्याची आवड असेल त्यांनी सत्संगाचा लाभ घ्यावा. चतुर्थात राहू असल्याने घरघुती वाद टाळावेत. ज्या व्यक्ती घरापासून लांब राहतात त्यांना घराची ओढ जाणवेल. शेयर ब्रोकर्सना हा काळ शेयर्स घेण्याच्या दृष्टीने चांगला आहे . मुलांच्या दृष्टीने पण हा काळ चांगला आहे. षष्ठात शनि वक्री व लग्नी मंगळ असल्याने जुनी दुखणी डोके वर काढतील. जोडीदाराच्या संदर्भात काळ चांगला आहे. नोकरी/व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ संमिश्र आहे. व्यवसाय निमित्त छोटे प्रवास होण्याची शक्यता आहे.
कर्क : प्रकृतीच्या दृष्टीने हा महिना सर्वसाधारण राहील. आर्थिक दृष्ट्या महिना जे आधीच परदेशात आहेत त्यांना चांगला आहे. ह्या महिन्यात परदेशगमनाचा बऱ्याच जणांना नोकरी निमित्त जाण्याचा योग आहे. तृतिय स्थानदेखील प्रवास दाखवत आहे त्यामुळे होतकरू तरुणांनी तयारीत राहायला हरकत नाही. उच्च शिक्षणाच्या प्रवेशासाठी उत्तम काळ आहे. ह्या महिन्यात पाहुणे येण्याची शक्यता आहे. शेअर्सचा व्यवसाय असणार्यांनी गुतंवणूक जपुन करावी अन्यथा पैसे अडकण्याची शक्यता आहे. काहींच्या बाबतीत मुले लांब राहायला जाण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण सर्वसाधारण राहील. प्रथमात गुरु पंचमात शनि व नवमात केतू ह्या धर्म त्रिकोणात तीन ग्रह असल्याने ज्यांना अध्यात्माची आवड आहे अशा लोकांनी सत्संग केल्यास त्याचा उत्तम लाभ होईल. कर्क राहिला हा महिना उत्तम आहे असे दिसते.
सिंह : प्रथमात शुक्र तसेच प्रथमेश रवि लाभात व राहू द्वितीयात हे सर्व योग अतिशय उत्तम स्थिती दाखवत आहेत ह्याचा अर्थ ह्या महिन्यात तुमच्या मध्ये उत्साह तसेच उत्तम प्रकृती व अनेक प्रकारचे लाभ असा कपिलाषष्ठी चा योग आहे. लाभात रवि,मंगळ,बुध आणि द्वितीयात राहू असल्याने अनेक मार्गाने आर्थिक लाभ होतील. प्रवासाच्या दृष्टीने हा महिना तितकासा अनुकूल नाही. घर खरेदी/विक्री व्यवहार मध्ये विलंब होऊ शकतात. शेअर्स च्या व्यवसायात असलेल्यांनी ते विकून फायदा होऊ शकेल. मुलांच्या दृष्टीने पण काळ अनुकूल आहे. काही जणांना कफ ,छातीचे आजार अशी दुखणी आहेत त्यांनी काळजी घ्यावी. पेन्शनची कामे मार्गी लागतील. काही लोकांना त्यांचे अडकलेले पैसे देखील ह्या काळात मिळू शकतील .व्यावसायिकांच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे. नोकरी करणार्यांना प्रमोशन च्या दृष्टीने चांगले योग आहेत. एकंदरीत हा महिना उत्तम आहे.
कन्या : कन्येचा स्वामी बुध दशमात तसेच मंगळ पण दशमात असल्याने तुम्ही महिनाभर कार्यमग्न राहाल. त्या कार्यातून तुम्हाला समाधान मिळेलच पण तुमच्या कार्याचा गौरव पण करण्यात येईल. प्रथमत राहू असल्याने मनाची चंचलता वाढण्याची शक्यता आहे. ह्या महिन्यात खर्चाचे प्रमाण वाढेल. ज्यांच्या पत्रिकेत मुळातच प्रसिद्धी योग आहे अशा व्यक्तींना ह्या महिन्यात प्रसिद्धी मिळाल्या शिवाय राहणार नाही. ज्यांचा व्यवसाय प्रकाशन, पुस्तक विक्रेते किंवा फिरतीचा व्यवसाय /नोकरी असणार्यांना हा काळ उत्तम आहे. ज्यांना घर विकायचे आहे त्यांना त्या दृष्टीने अनुकूल काळ आहे. प्रेमवीरांना ह्या काळात संयम बाळगल्यास बरे राहील. प्रकृतीच्या दृष्टीने हा महिना सर्वसधारण आहे. जोडीदाराशी ह्या महिन्यात संयमाने वागावे अन्यथा वादाचे प्रसंग उद्भवतील . दशमात तीन ग्रह रवि, मंगळ, बुध व गुरु लाभात हे सर्व योग व्यवसाय/नोकरीच्या दृष्टीने अत्यंत चांगले आहेत. अनेकांना प्रमोशन तसेच आर्थिक लाभ होण्याचे योग आहेत. एकंदरीत हा महिना उत्तम आहे .
तूळ : शुक्र लाभात, गुरु दशमात आणि केतू षष्ठ स्थानात ह्या योगांमुळे तुमच्या कार्याची दाखल घेतली जाईल. पण त्यातून आर्थिक लाभ तितकासा होणार नाही. खर्चाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. तृतीयेश गुरु कार्यमग्न ठेवेल परंतु आर्थिक लाभ ह्या महिन्यात फारसे दिसून येत नाहीत. घरासंबंधी सर्व कामे लांबणीवर पडतील असे वाटते. मुलांचे शाळा/कॉलेज प्रवेश सुद्धा लांबणीवर पडू शकतात. जोडीदारापासून लांब राहण्याचे योग वाटतात. नवमात तीन ग्रह व राहू बाराव्या घरात असल्याने प्रवास होतील. षष्ठेश गुरु दशमात व बुध अष्टमात असल्याने पैशाचे व्यवहार जपून करावेत. तसेच कामाच्या ठिकाणी देखील भरपूर ताण पडण्याची शक्यता आहे. नवमातील दोन ग्रह रवि आणि मंगळ, लांबच्या प्रवासाचे योग दाखवत आहेत, त्यामुळे काही लोकांना कामानिमित्त परदेश वारी देखील करावी लागेल असे दिसते. एकंदरीत हा महिना सर्वसाधारण वाटत आहे
वृश्चिक: मंगळ अष्टमात व शनी प्रथमात ह्या ग्रहस्थिती मुळे सतत कोणता ना कोणता ताण राहील तसेच कोणत्याही गोष्टीत उत्साह राहणार नाही. तुम्ही घराच्या मंडळी बरोबर जितका वेळ घालवाल तितके मानसिक दृष्ट्या चांगले. आर्थिक व्यवहार जपून करावेत. नुकसान होण्याची शक्यता आहे. मुलांच्या दृष्टीने काळजीचे काही कारण वाटत नाही. अष्टमात तीन ग्रह असल्याने व राहू लाभात त्यामुळे पूर्वीची काही येणी असल्यास वसूल होतील परंतु त्याच प्रमाणात खर्चाचे प्रमाण पण तेवढेच राहील. प्रथमात शनि, पंचमात केतू आणि नवमात गुरु ह्या ग्रहांमुळे अध्यात्मिक गोष्टीतून आनंद मिळू शकेल. शेअर्सचा व्यवसाय करणाऱ्यांनी सुद्धा व्यवहार जपून करावेत. नोकरी करणाऱ्यांनी पण वरिष्ठांशी जमवून घ्यावे. लाभातील राहूमुळे काही लाभ संभवतात. एकंदरीत हा महिना सर्वसाधारण वाटतो.
धनु : शरीर प्रकृती उत्तम राहील. द्वियेश शनि बाराव्या स्थानी वक्री तसेच शुक्र नवम भावात हे योग आर्थिक लाभांच्या दृष्टीने फारसे अनुकूल वाटत नाहीत. काहीना प्रवासाचे योग येतील. तृतीयेश शनि लग्नी असल्याने कागदपत्रांसंबंधी रेंगाळलेली कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर असतील. मुलांच्या अभ्यासासंबंधी काळजीचे कारण राहणार नाही, तसेच त्यांच्या अॅडमिशनची कामे देखील मनाप्रमाणे होतील. सप्तमात दोन ग्रह, रवि आणि मंगळ, व राहू दशमात हा योग ज्यांचा सर्वसाधारण लोकांशी संपर्क जास्त येतो अश्यांचा व्यवसाय उत्तम चालेल. वाहने जपून चालवावीत. कला/क्रीडा क्षेत्रातील लोकांचा जनसंपर्क वाढण्याची शक्यता आहे. सप्तमात ग्रहांमुळे ज्यांचा व्यवसाय/नोकरी चा सबंध जास्त लोकांशी येतो त्यांच्या दृष्टीने चांगले. जोडीदाराशी सबंध चांगले राहतील. दशमातील राहू व सप्तमातील तीन ग्रहांमुळे व्यवसाय वृद्धी होण्यास मदत होईल. एकंदर हा महिना संमिश्र स्वरूपाचा आहे .
मकर : मकर राशीचा स्वामी शनि लाभात आहे. तो द्वितीयेश आहे तसेच रवि, बुध, मंगळ षष्ठ स्थानात आहेत ह्या योगामुळे तुम्हाला अनेक प्रकारचे लाभ व्हायला हवेत पण शनि वक्री असल्याने ह्या सर्व गोष्टी शनि मार्गी झाल्यानंतर जास्त अनुभवास येतील तो पर्यंत प्रतीक्षा करा. लेखक मंडळीना हा काळ उत्तम आहे . विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळेल .तसेच घर /वाहन ह्या व्यवहारात फायदा होईल . ज्यांच्या मनात घर भाड्याने द्यायचे आहे त्यांना भाडेकरू पण मिळतील. शेअर्स चा व्यवसाय असणार्यांनी सावधगिरीने व्यवहार करावा .नुकसान होण्याची शक्यता आहे . कदाचित जोडीदारापासून लांब राहण्याचे योग आहेत . बहुदा ज्यांच्या जोडीदारांचा/स्वत:चा व्यवसाय /नोकरी फिरतीची आहे त्यांना जास्त जाणवेल .कामाचा ताण ह्या महिन्यात राहील असे दिसते . एकंदरीत हा महिना संमिश्र आहे .
कुंभ : प्रकृतीच्या दृष्टीने महिना उत्तम आहे. इथे कुंभ राशीचा स्वामी शनि दशमात आहे परंतु वक्री असल्याने तुम्हाच्या कार्यात सध्या अडथळे येण्याची शक्यता आहे. पण केलेल्या कामाचे फळ शनि मार्गी झाल्यावर मिळेलच . आर्थिक कामे रेंगाळण्याची शक्यता आहे. शेअर्समध्ये किंवा लॉटरीमध्ये पैसे गुंतवण्याचा मोह होईल पण तो टाळावा. भावा बहिणीच्या भेटीचे योग येतील. मुलांच्या दृष्टीने पण महिना चांगला जाईल. जोडीदाराबरोबर सलोख्याचे संबंध राहतील. दशमेश मंगळ पंचमात आणि राहू अष्टमात ह्या योगामुळे अनेकांना कामाचा ताण जाणवेल. नवीन नोकरी शोधत असणाऱ्यांना प्रतीक्षा करावी लागेल. हा महिना एकंदरीत " वाट बघा " असे सुचवतो.
मीन : प्रथमात केतू पंचमात गुरु तसेच नवमात शनि ह्या योगांमुळे अध्यात्मिक गोष्टींमध्ये रस घ्याल. पाहुणे येण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण ठीक राहील. स्पर्धेत यश मिळेल. चतुर्थात रवि, मंगळ बुध व सप्तमात राहू ह्यामुळे घरात अनेक गोष्टींची चर्चा होईल. पार्टनरशीपचा व्यवसाय असलेल्या लोकांचा काळ समाधानकारक राहील. फिरतीच्या निमित्ताने छोटेमोठे प्रवास करावे लागण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या दृष्टीने अनुकूल ग्रह आहेत. नोकरी/व्यवसायाच्या दृष्टीने महिना सर्वसाधारण राहील असे दिसते. एकंदरीत हा महिना संमिश्र स्वरूपाचा राहील .