Title

Astrology Blog by Anagha Bhade


Monday 30 December 2013

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! 
हे येणारे नवीन वर्ष तुम्हा सगळ्यांना भरभराटीचे , आनंदाचे ,इच्छापुर्तींचे आणि निरोगी जावो . 

ब्लोग च्या सर्व वाचकांना पण धन्यवाद ! नवीनच सुरु केलेल्या ब्लोग ला चांगला प्रतिसाद मिळाला कि खूप बरे वाटते 
व उत्साह वाढतो . ह्या विषयाशी कायम निगडीत राहावे व अभ्यास पण कायम चालू राहावा तसेच काहीतरी लिखाण करत राहायला हवे ह्या उद्देशाने खरेतर ब्लोग लिहायला लागले . कारण लिहायचं म्हणजे अभ्यास आलाच . मला लिखाणाचा खूपच कंटाळा आहे पण त्यावर मात करण्यासाठी मी ब्लोग लिहिण्याचे  ठरवले तर आहे बघुयात आता माझ्या लिखाणाचा उत्साह ह्या पुढील  वर्षी किती टिकतो ते . 
तुम्ही पण काही संकल्प केले असतील तर ते तडीस जावोत ! 


Friday 27 December 2013

पत्रिकेतील गुरु

गुरु हा एक शुभ ग्रह आहे . गुरु  विद्या ( शिक्षण ) ,संतती,भाग्य  ह्याचा कारक ग्रह आहे . गुरु माणसाला व्यापक बुद्धी देतो . गुरु हा सद्सदविवेक बुद्धी देतो . गुरु मुळे  मिळालेले ज्ञान हे उथळ नसते . गुरु कोणत्याही गोष्टीचा खोलवर आणि व्यापक व सकारात्मक विचार करायला शिकवतो . गणिती बुद्धी बुध देतो पण कोणत्यही गोष्टीचा मोठ्या प्रमाणावर व अगदी मुळापासून विचार करण्यची क्षमता गुरु मुळे मिळते . गुरु हा प्रपंचाचा कारक ग्रह आहे . गुरु चांगल्या पद्धतीने व सचोटीने प्रपंच करायला लावतो . गुरु हा अध्यात्मिक प्रगतीचा पण कारक ग्रह आहे . गुरु हा ग्रह समाजात मान मिळवून देणारा आहे . गुरु हा एक सत्कर्म करण्यासाठी आपल्याला कायम प्रेरित करणारा ग्रह आहे . अध्यात्मिक पिंड असणाऱ्या लोकांच्या पत्रिकेत गुरूचा प्रभाव दिसून येतो . गुरु माणसाला त्याग शिकवतो .

संतती विषयक प्रश्नाचा विचार करताना पण पत्रिकेत पंचम स्थान , पंचमेश ह्या बरोबरच संतती कारक गुरु ला खूप महत्व आहे . तसेच शिक्षणाचा विचार करताना पण गुरु बघावा लागतो . पत्रिकेतील वक्री किंवा स्तंभी ( motionless ) गुरु शी जर पापग्रहांचे कुयोग असतील तर गुरु ज्या स्थानाचा भावेश आहे त्याचे किंवा  संतती किंवा शिक्षण ह्या दृष्टीने चांगली फळे  मिळत नाहीत .

गुरूची दृष्टी शुभ  असते . गुरु स्वत: च्य स्थानापासून ५, ७, ९ ह्या स्थानाला बघत असतो म्हणजे त्या स्थानांवर व त्या स्थानातील ग्रहांवर गुरूची दृष्टी असते . उदा. समजा गुरु तृतीय स्थानात आहे तर गुरुची दृष्टी तृतीयापासून ५,७,९ म्हणजे सप्तम,नवम व लाभ स्थानांवर व त्या स्थानात असणाऱ्या ग्रहांवर असेल .

बऱ्याच वेळा आपल्याला सध्या गुरुबल नाही किंवा गुरु पाचवा आहे किंवा सातवा आहे असे ऐकू येत असते ते सर्व गोचर ( transit ) गुरू बद्दल असते . गोचरीने जेव्हा गुरु आपल्या जन्म राशीतून जातो त्यावेळेस पहिला गुरु असतो ( बरेच जण   TRANSITS  लग्न कुंडलीकडून पण बघतात ) गोचर आत्ता गुरु मिथुन राशीत आहे म्हणजे मिथुन राशीच्या लोंकाना ( किंवा मिथुन लग्न राशीच्या लोंकाना ) पहिला गुरु आहे . तसेच कर्क राशीच्या लोंकाना ( कर्क लग्न राशीच्या लोंकाना )आत्ता व्ययात गुरु म्हणजे बारावा गुरु आहे असे म्हंटले जाते .

कर्क राशीत गुरु उच्चीचा मानतात मकर राशीत गुरु निचीचा व कन्येत गुरु निर्बली मानतात .
गुरु चा रंग पिवळा व रत्न पुष्कराज आहे .

हि झाली गुरु  ग्रहाबाबत प्राथमिक माहिती . गुरु प्रत्येक स्थानात तसेच प्रत्येक राशीत कोणत्या ग्रहाच्या योगात कशी फळे देतो हा पुढे अभ्यासाचा विषय आहे .
पत्रिका बघताना कोणत्याही एका ग्रहाचा विचार करून चालत नाही पण जेव्हा प्रत्येक ग्रहा बद्दल विचार करू त्यानंतरच समग्र पत्रिकेचा विचार करता येईल . पत्रिकेचा अभ्यास करताना मला नेहिमी हत्तीच्या गोष्टीची आठवण होते म्हणजे आधी शेपूट ,सोंड , पाय असे एक एक अवयव दिसत दिसत मगच पूर्ण हत्त्ती केव्हा दिसतोय याची उत्सुकता असते . पूर्ण हत्तीचा माझा शोध सुरू आहेच …

Sunday 22 December 2013

कठीण विवाहयोग

हल्ली बऱ्याच वेळा मुलाच्या आईची किंवा परिवारातील लोकांची तक्रार असते कि मुलाला लग्नच करायचे नाही  असे वाटते.  तो स्थळ  बघतच नाहीये . तो स्वत: हून काही ठरवत नाहीये . बर मग लग्न करायचेच नाही असे पण स्पष्ट सांगत पण नाही .

अशाच एका मुलाची हि पत्रिका आहे .

लग्न कुंडली :





कृष्णमुर्ती पद्धती (भावचलित )कुंडली :



पारंपारिक पद्धत : 
तूळ लग्न आहे . सप्तमेश मंगळ आहे . तसेच चंद्र पण  तूळेत आहे . त्यामुळे चंद्राचा सप्तमेश पण मंगळ होतो. 
मंगळ प्रथमस्थानी आहे . त्याची दृष्टी सप्तमावर आहे . शुक्र-राहू युती आहे . शनीची ह्या युतीवर दहावी दृष्टी आहे . पण गुरूची पण दृष्टी शुक्र - राहू युती वर आहे . एकंदर जेव्हा पत्रिकेतील शुक्र राहू च्या युतीत असतो तसेच त्यावर पापग्रहांची
दृष्टी असते व महादशा देखील वैवाहिक सौख्याच्या विरोधात असतात तेव्हा बहुतेक वेळा लग्न होऊनही काही सुख मिळत नाही किंवा मग लग्नच होत नाही . ह्या पत्रीकेच्या बाबतीत मुलाचे वय (३०-३५ च्या दरम्यान ) अजूनही लग्नाचे आहे परंतु एकंदर पत्रिका बघत लग्न होणे कठीणच दिसते आहे .  ते कसे हे कृष्णमुर्ती पद्धतीने पत्रिका पाहिल्यास अजून स्पष्ट होईल . 

कृष्णमुर्ती पद्धत :
सर्वप्रथम पत्रिका कृष्णमुर्ती पद्धतीने तयार केलेली असावी 
ह्या पद्धती प्रमाणे विवाहाच्या प्रश्नासाठी सप्तम स्थानाचा उपनक्षत्र स्वामी बघतात .
ह्या पद्धती प्रमाणे विवाहासाठीचा नियम असा कि 
 "जर जन्मपत्रिकेनुसार सप्तम स्थानाचा उपनक्षत्र स्वामी द्वितीय , सप्तम व लाभ ह्यापेकी किमान एका स्थानाचा कार्येश असून षष्ठ स्थानाचा एकमेव कार्येश नसेल तर २,७,११ ह्या स्थानाच्या दशेत/ अंतर्दशेत विवाह होतो . "
ह्या पत्रिकेत सप्तमाचा उपनक्षत्र स्वामी गुरु आहे . 
गुरुचे कार्येशत्व बघू : गुरु तूळ राशीत आहे परंतु कृष्णमुर्ती पद्धतीप्रमाणे केलेल्या पत्रिकेत बाराव्या स्थानी आहे . गुरूच्या राशी  तृतीय  व षष्ठ भावारंभी आहेत . गुरु राहूच्या नक्षत्रात आहे . राहू अष्टमात आहे . राहू शुक्राच्या युतीत असल्यामुळे शुक्राची फळे देईल . तसेच मिथुन राशीत असल्यामुळे बुधाची पण फळे देईल . 
गुरु ३,६,८,१२
राहू ८
शुक्र १,८ 
बुध ४,५,९,११,१२ ( राहू शुक्राच्या युतीत असल्याने मुख्यत्वे शुक्रचीच फळे देईल ) 
तसेच षष्ठ स्थानात मीन रास आहे . षष्टात एकही ग्रह नाही . षष्टेश गुरूच्या नक्षत्रात एकही ग्रह नाही . तसेच कोणत्याही ग्रहाचा उपनक्षत्र स्वामी पण गुरु नाही त्यामुळे गुरु षष्ठ स्थानाचा एकमेव कार्येश आहे . ह्याचा अर्थ ह्या मुलाचे लग्न होणे कठीण! . 
आता खरे म्हणजे महादशा बघायची पण गरज नाही परंतु कोणत्याही प्रश्नाचा सर्व बाजूने विचार करावा . 
सध्या गुरूची महादश २०१७ पर्यंत आहे . गुरुचे कार्येशत्व वर आले आहेच . गुरु महादश विवाहास SUPPORT करत नसून उलट विरोधाच करत आहे .
आत शनि ची महादशा २०१७ ते २०३६ पर्यंत आहे . शनि लाभत आहे परंतु चंद्राच्या नक्षत्रात आहे चंद्र व्ययात आहे  त्यामुळे शनि व्यय स्थानाची व दशमाची फळे प्रामुख्याने देईल .
शनीचे कार्येशात्व : ४,५,१०,११,१२
 पुढे येणाऱ्या दशा पण विवाहास अनुकूल वाटत नाहीत .
एकंदर विवाह योग कठीणच आहे !
बघुयात पुढे काय होते ते . 

Tuesday 17 December 2013

पत्रिकेतील चंद्र

चंद्र ह्या ग्रहाला पत्रिकेत खूप महत्व आहे . आपल्यापेकी बर्याच जणांना पत्रीकेविषयी फारशी माहिती नसली तरी आपली रास माहित असते . ह्याचाच अर्थ स्वत: च्या पत्रिकेत चंद्र कोणत्या राशीत आहे हे माहित असते . बर्याच वेळा आपण पेपर किंवा मासिकातील राशिभविष्य सुद्धा वाचत  असतो . तिथे पण बहुतांशी ठिकाणी राशिभविष्य हे चंद्र राशी नुसार दिलेले असते . आता साहजिकच जगातल्या सगळ्या लोंकाचे भविष्य फक्त १२ राशी म्हणजे बारा भागात विभागलेले असते मग ते खरेच बरोबर असेल का? ह्याचे सोपे उत्तर खरे तर ' नाही ' कारण राशिभविष्य लिहिताना फक्त चंद्राचाच विचार केलेला असतो . पत्रिकेतील इतर ग्रह , महादशा , अंतर्दशा , चांगले किंवा वाईट योग ह्याबद्दल प्रत्येक पत्रिकेत वेगळेपणा असतोच . परंतु राशीभविष्य जर चंद्रराशीवरून  असेल तर सध्याचे गोचार ग्रहमान कसे आहे ह्याचा चंद्राकडून विचार करता येतो तसेच जर लग्न राशीवरून असेल तर लाग्नराशिप्रमाणे गोचर भ्रमणाचा अंदाज येतो .

जेव्हा पण साडेसातीबद्दल बोलती किंवा ऐकतो तेव्हा साडेसाती सुद्धा आपल्या राशी प्रमाणेच असते . जेव्हा गोचर शनि जन्मकुंडलीतील चंद्राच्या व्ययात , चंद्रावरून व चंद्राच्या द्वितीय स्थानातून भ्रमण करतो त्यावेळेस साडेसाती आहे असे म्हणतात . ( शनि एका एकाराशीत अडीच वर्षे असतो त्यामुळे एकूण २. ५ +२. ५+२. ५=७. ५ )
उदा . जर एखादा माणूस तूळ राशीचा आहे तर जेव्हा गोचर ( transit ) शनि कन्येत जाईल तिथपासून ह्या माणसास साडेसाती सुरु झाली असे म्हणतात . गोचर शनि कन्या , तूळ , वृश्चिक ह्या राशीतून जाईल तो पर्यंत तूळ राशीला साडेसाती आहे असे म्हणतात एकदा का शनि धनु राशीत गेला कि तुळेची साडेसाती संपली . मग वृश्चिक राशीच्या माणसास साडेसाती सुरु .

चंद्र हा पृथ्वीच्या सगळ्यात जवळचा ग्रह आहे . 'चंद्रम मनसो जात: ' म्हणजे चंद्र मनाचा कारक ग्रह आहे . चंद्र मातेचा कारक ग्रह आहे . साधारणपणे अडीच दिवसात चंद्र रास बदलतो . चंद्राच्या नक्षत्रानुसार महादशांचा क्रम ठरवतात . मुहूर्त शस्त्रात चंद्राला महत्व आहेच . विवाहा संबंधातील गुणमेलन पण चंद्र नक्षत्र वरून करतात .

सर्व प्रकारचे द्रव पदार्थ चंद्राच्या अमलाखाली येतात . विहिरी , तळी , जलाशय , समुद्र ह्या सर्वच चंद्र कारक
आहे .चंद्राची स्वत: ची रास कर्क . वृषभ राशीतील चंद्र उच्च  तसेच वृश्चिक राशीत चंद्र नीच मानला जातो .
निसर्ग कुंडलीत ( म्हणजे मेष लग्नाच्या कुंडलीत ) कर्क  हि चंद्राची रास चतुर्थ स्थानात येते . चंद्रावरून acidity होणे ,रक्तदोष ,अनियमित मासिक  धर्म ,मानसिक त्रास ,निद्रानाश ,मानसिक विकृती ,पचनसंथेचे विकार इ. गोष्टींचा विचार करतात . चंद्राचे रत्न मोती आहे .

Saturday 14 December 2013

अंतरपाटातील अंतर

मुलगा/ मुलगी विवाह योग्य झाली कि आई वडिलांना सून / जावई  यायचे वेध लागतात .
पण बर्याच वेळा लग्न ठरण्यास उशीर होत असतो .
लग्न लवकर न ठरण्याची वेगवेगळी कारणे असतात  त्यातील काही कारणे म्हणजे त्याच्या / तिच्या अपेक्षा खूप आहेत . दिसायला चांगला, चांगले करियर म्हणजे   आर्थिक स्थिती उत्तम असणाराच जोडीदार हवा आहे . वयात जास्त अंतर नको . अजून योग नाही वगेरे .
बाकी सगळे मुद्दे मान्य केले तरी वयातले अंतर ह्य मुद्द्यावर मात्र विचार करायला हवा असे वाटते .
हल्ली ५-६ वर्षाचे अंतर हे खूप वाटायला लागले आहे . खरेतर आजकाल मुली पण   शिकतात त्यांना पण चांगले जॉब असतात . त्यामुळे त्यांना जोडीदार साहजिकच आपल्याहून एक पाऊल पुढेच अपेक्षित असतो यात काही गैर पण नाही पण जेव्हा लोक म्हणतात ( विशेषत: मुली व त्यांचे पालक ) कि ५-६ वर्षांचे अंतर नको  आम्ही २-३ वर्ष अंतर असणारे स्थळच बघत आहोत आणि बाकी त्या स्थळाची कहिही चौकशी न करता ते नाकारतात तेव्हा साहजिकच असा प्रश्न पडतो कि  खरेच एवढे अंतर खूप आहे का ? केवळ त्या एकमेव कारणासाठी स्थळ नाकारणे कितपत योग्य आहे ?
मला असे वाटते कि ५-६ वर्षाचे  अंतर असले तर स्थळ बघायला काही हरकत नसावी . कधी कधी वयापेक्षा मुलगा दिसायला लहान वाटतो किंवा वयाने लहान असून मोठा पण वाटू शकतो . तेच त्याच्या maturity बद्दल पण म्हणता येईल . कितीतरी तेवढे किंवा जास्त अंतर असलेल्या जोडप्याचे सुखी  संसार बघतच असतो . आत्ताचा काळ बदलला आहे. आता ५-६ वर्ष अंतर म्हणजे generation gap असते वगेरे पण एकू येते पण  तरीही अशावेळेस मुलाला भेटून मगच मत बनवावे असे वाटते . अर्थात वयातील अंतर किती असावे ह्या बाबतीत वेगळी मते असू शकतात .

तसेच ज्या मुलींची / मुलांची लग्न काहीही कारण नसताना  वेळेत ( म्हणजे  बघायला लागल्या पासून लवकर ) ठरत नाहीत असे मुले/ मुली पण नाराज असतात . त्यांनीही लग्न ठरत नाही म्हणून नाराज होऊ नये . लग्न ठरेपर्यंत त्या काळात करियर कडे जास्त लक्ष द्यावे  ,एखादा आवडणारा छंद जोपासावा . पुढे लग्न झाल्यावर जबादारी वाढते त्यावेळेस स्वत: साठी वेळ मिळतोच असे नाही . आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने बघावे असे वाटते .त्यांच्या आई  वडिलांनी (परिवाराने)पण लग्न ठरत नाही या विषयाचा फार  मोठा issue  करू नये .

हे सगळे इथे लिहिण्याचा हेतू म्हणजे बरेच लग्नाच्या विवाहोस्तुक  लोक  हा ब्लोग वाचतात हे  'विवाह योग कधी आहे ?' अशा ज्या मेल्स येतात त्यावरून कळते . त्यामुळे हा विचार त्यांच्या  पर्यंत पोहचावा असे वाटले .

Thursday 12 December 2013

पत्रिका अभ्यास भाग -४


राशीचक्रातील सातवी  रास तूळ  (७): 
अधिपती(LORD ) :शुक्र 
तत्व:वायुतत्व 
शरीरातील भाग :  गर्भाशय , अपेंडिक्स 

राशीचक्रातील आठवी रास वृश्चिक (८): 
अधिपती(LORD ) :मंगळ 
तत्व:जलतत्व 
शरीरातील भाग : reproductive organs 

राशीचक्रातील नववी रास धनु  (९): 
अधिपती(LORD ) :गुरु 
तत्व:अग्नीतत्व 
शरीरातील भाग : मांड्या 

राशीचक्रातील दहावी रास मकर  (१०): 
अधिपती(LORD ) :शनि 
तत्व:पृथ्वितत्व 
शरीरातील भाग : गुढगे 

राशीचक्रातील अकरावी रास कुंभ  (११):
अधिपती(LORD ) :शनि 
तत्व:वायुतत्व 
शरीरातील भाग : पोटऱ्या 


राशीचक्रातील बारावी रास मीन  (१२):
अधिपती(LORD ) :गुरु
तत्व:जलतत्व
शरीरातील भाग :पाऊले


राशींच्या स्वभावाबाबत माहिती बर्याच जणांना असेलच . शरद उपाध्ये यांच्या राशीचक्र कार्यक्रमात हि सर्व माहिती आहे.

आता नक्षत्रा विषयी माहिती बघू .
प्रत्येक रास ३० अंश असते त्या ३० अंशात प्रत्येक राशीत तीन नक्षत्रे असतात . दोन पूर्ण व एका नक्षत्राचा काही भाग .

 
नक्षत्रांची नावे खालील प्रमाणे :

अश्विनी, भरणी , कृत्त्तिका,रोहिणी, मृग, आर्द्रा , पुनर्वसू,पुष्य ,आश्लेषा,मघा ,पूर्वा,उत्तरा , हस्त,चित्रा ,स्वाती , विशाखा,
अनुराधा,ज्येष्टा ,मूळ ,पूर्वाषाढा,उत्तराषाढा,श्रवण ,धनिष्ठा ,शततारका,पूर्वाभाद्रपदा,उत्तराभाद्रपदा,रेवती. 

प्रत्येक राशीतील नक्षत्रे :
 
मेष रास: अश्विनी, भरणी , कृत्त्तिका काही भाग 
वृषभ रास : काही भाग कृत्त्तिका,रोहिणी, मृग

मिथुन रास : काही भाग मृग, आर्द्रा , पुनर्वसू

कर्क रास : काही भाग पुनर्वसू,पुष्य ,आश्लेषा

सिंह रास :मघा ,पूर्वा,उत्तरा

कन्या रास : काही भाग उत्तरा , हस्त,चित्रा

तूळ रास :काही भाग  चित्रा ,स्वाती , विशाखा

वृश्चिक रास : काही भाग विशाखा,अनुराधा,ज्येष्टा

धनु रास:मूळ ,पूर्वाषाढा,उत्तराषाढा

मकर रास : काही भाग उत्तराषाढा,श्रवण ,धनिष्ठा 

कुंभ रास :काही भाग धनिष्ठा ,शततारका,पूर्वाभाद्रपदा

मीन रास :काही भाग  पूर्वाभाद्रपदा,उत्तराभाद्रपदा,रेवती. 

प्रत्येक ग्रहाच्या आधिपत्याखालील नक्षत्रे :
प्रत्येक ग्रहाकडे  तीन नक्षत्रांचे स्वामित्व आहे .
प्रत्येक ग्रहाचे स्वामित्व एका ग्रहाकडे आहे म्हणजे उदा. कृत्तिका हे रवीच्या मालकीचे नक्षत्र आहे . तसेच इतर ग्रहांबद्दल ,

रवी : कृत्तिका , उत्तर , उत्तराषाढा

चंद्र : रोहिणी , हस्त , श्रावण

बुध : आश्लेषा , जेष्टां , रेवती

शुक्र:भरणीं , पूर्वा, पूर्वाषाढा

गुरु:पुनर्वसू , विशाखा , पूर्वाभाद्रपदा

शनी: पुष्य , अनुराधा,उत्तराभाद्रपदा

मंगळ :मृग, चित्रा ,धनिष्ट

राहु: आर्द्रा स्वाती,शततारका

केतू: अश्विनी , मघा , मूळ

 पुढील भागात  ग्रहांविषयी माहिती बघू . 

Tuesday 10 December 2013

पत्रिका अभ्यास - भाग ३

मागच्या दोन लेखांमध्ये आपण पत्रिकेतल्या स्थानाबद्दल माहिती घेतली .
पुन्हा एक उदाहरण घेऊ .



वरील पत्रिका हि बेसिक पत्रिका म्हणजे  लग्नकुंडली आहे . ह्या मध्ये ९ नंबर दिसतो आहे ते प्रथम स्थान आहे . ९ नंबर म्हणजे धनु रास . ह्याचाच अर्थ हि पत्रिका धनु लग्नाची आहे .
प्रथमेश/ लग्नेश गुरु आहे
आता   द्वितीय स्थानी १० नंबर आहे म्हणजे द्वितीय स्थानामध्ये मकर रास आहे .
द्वितीयेश शनी आहे .
 त्याप्रमाणे  बाकी स्थाने बघू.
तृतीय स्थान : ११ नंबर म्हणजे कुंभ रास
तृतीयेश शनी आहे . 
चतुर्थ स्थान : १२ नंबर म्हणजे मीन  रास 
चतुर्थेश गुरु आहे . 
पंचम  स्थान : १ नंबर म्हणजे मेष  रास 
पंचमेश मंगळ आहे . 
षष्ठ स्थान : २ नंबर म्हणजे वृषभ  रास 
षष्टेश  शुक्र आहे . 
सप्तम स्थान  : ३ नंबर म्हणजे  मिथुन  रास 
सप्तमेश बुध आहे . 
अष्टम  स्थान : ४  नंबर म्हणजे कर्क रास 
अष्टमेश चंद्र आहे . 
नवम  स्थान : ५ नंबर म्हणजे सिंह  रास 
नवमेश रवी आहे . 
दशम  स्थान : ६ नंबर म्हणजे  कन्या रास 
दशमेश बुध आहे . 
एकादश / लाभ  स्थान : ७ नंबर म्हणजे तूळ  रास 
लाभेश शुक्र आहे . 
द्वादश / व्यय स्थान : ८ नंबर म्हणजे वृश्चिक  रास 
व्ययेश मंगळ आहे . 
 माझ्यामते आता पत्रिकेतील स्थानाबद्दल माहिती झाली असेल . 


आता राशी बघू . 
संपूर्ण राशीचक्र हे ३६० अंशात बसवलेले आहे . म्हणजे १२ राशी आहेत . 
त्यामुळे प्रत्येक राशीला ३० अंश मिळतात . 

 
राशीचक्रातील पाहिली रास मेष (१)
अधिपती(LORD ) :मंगळ 
तत्व:अग्नितत्व 
शरीरातील भाग : मस्तक ( डोके) 

 
राशीचक्रातील दुसरी  रास वृषभ (२) 
अधिपती(LORD ) :शुक्र 
तत्व:पृथ्वीतत्व 
शरीरातील भाग : घसा, डोळे 


राशीचक्रातील तिसरी  रास मिथुन  (३): 
अधिपती(LORD ) :बुध 
तत्व:वायुतत्व 
शरीरातील भाग : हात , कान 


राशीचक्रातील  चौथी रास कर्क  (४): 
अधिपती(LORD ) :चंद्र 
तत्व:जल तत्व 
शरीरातील भाग : छाती 

राशीचक्रातील पाचवी रास सिंह  (५): 
अधिपती(LORD ) :रवि 
तत्व:अग्नीतत्व 
शरीरातील भाग :पाठ 

राशीचक्रातील सहावी  रास कन्या  (६): 
अधिपती(LORD ) :बुध 
तत्व:वायुतत्व 
शरीरातील भाग : ओटीपोट 


पुढील सहा राशींची माहिती पुढील भागात घेऊ .

Sunday 8 December 2013

पत्रिकेचा अभ्यास भाग-२

पत्रिकेचा अभ्यास करताना मला आवडणारी गोष्ट म्हणजे ज्योतिष हे एक तर्कशास्त्र आहे . त्यामध्ये १ अधिक १ बरोबर २ हे नेहीमीच असते असे नाही . वेगवेगळ्या बाजूने प्रत्येक प्रश्नचा विचार करायला लागतो . Horoscope is like a puzzle .
प्रत्येक पत्रिका समोर आल्यावर ती सोडवताना एक वेगळाच आनंद मिळतो . काही वेळा अंदाज चुकातातही पण चुका शोधायला पण मजा येते . one has to do 'logical analysis ' for every kundali .

मागच्या लेखात आपण पत्रिकेविषयी basic माहिती पहिली ्‌य लेखात अजून माहिती बघू .
 पत्रिकेमध्ये १२ स्थाने (houses )असतात . प्रत्येक स्थानावरून काही गोष्टी बघतात .त्या  खालील प्रमाणे ,

पत्रिकेत कोणते स्थान प्रथम ,द्वितीय वगेरे याची माहिती खालील पत्रिकेवरून मिळेल .






प्रथम स्थान :
ह्या स्थानावरून साधारणपणे शारीरिक ठेवण ( physical  chracteristics ),व्यक्तिमत्व  कळते.तसेच life span बघताना पण प्रथम  स्थान  तसेच प्रथमेश महत्वाचा असतो.
शरीरातील भाग : डोके , मेंदू,सर्वसाधारण प्रकृती  इ.

द्वितीय स्थान :
हे एक महत्वाचे धन स्थान(आर्थिक स्थिती ) आहे . तसेच कुटुंब स्थान आहे .
शरीरातील भाग : उजवा डोळा , घसा , वाणी, इ. 

तृतीय स्थान :
ह्या स्थानावरून साधारणपणे भावंडाचा विचार करतात . तसेच लहान प्रवास , हस्ताक्षर,कागद पत्रे  इ. 
शरीरातील भाग : कान , हात ,इ. 


चतुर्थ स्थान :
ह्या स्थानावरून साधारणपणे मातृसौख्याचा विचार  . तसेच घर , जमीन , वाहन इ. 
शरीरातील भाग : हृदय , छाती इ. 

पंचम स्थान :
ह्या स्थानावरून साधारणपणे संतती , कला , खेळ , उपासना ,काही investments इ. चा विचारा करतात .  तसेच हे प्रणय स्थान पण आहे . प्रेम विवाह असेल तर पंचम व सप्तम यात संबंध असतो . 
शरीरातील भाग : पोटावरचा भाग , स्मृती( memory ), पोटाच्या वरचा भाग , 

षष्ठ स्थान :
ह्या स्थानावरून साधारणपणे आपल्याला होणारे आजार तसेच मातुल घराणे ( मामा ,मावशी इ. ) , हाताखाली काम करणारी माणसे  इ. चा विचार करतात. 
हे पण एक धन स्थान आहे . 
शरीरातील भाग : पोटाखालचा भाग ( ओटीपोट) ,आतडी इ. 

सप्तम स्थान :
ह्या स्थानावरून साधारणपणे कायदेशीर जोडीदार ( पती / पत्नी ). व्यवसायातील  जोडीदार ह्याचा विचार होतो . 
शरीरातील भाग : कंबर, मूत्रपिंड , इ. 

अष्टम स्थान :
ह्या स्थानावरून साधारणपणे आयुर्मान , मृत्यू कसा होईल ह्याचा अंदाज , मानसिक त्रास, अचानक धनलाभ इ. चा विचार करतात 
शरीरातील भाग : reproductive oragans , blood इ. 

नवम स्थान :
ह्याला भाग्य स्थान म्हणतात . दूरचे प्रवास , अध्यात्मिक कल , नावलौकिक , उच्च शिक्षण, आधीच्या पिढ्या इ. चा विचार करतात . 
शरीरातील भाग : मंड्या 

दशम स्थान :
ह्या स्थानावरून साधारणपणे करियर,मानसन्मान,पितृ सौख्य (पारंपारिक ज्योतिषानुसार पितृ सौख्याचा विचार ह्या दशम स्थानावरून करतात .पण कृष्णमुर्ती पद्धती नुसार पित्यासंबंधी विचार नवम  स्थानावरून केला आहे )
शरीरातील भाग : गुढगे 

एकादश /लाभ स्थान :
ह्या स्थानावरून साधारणपणे मोठे भावंड ,सर्वप्रकारचे लाभ ,मित्र परिवार इ. गोष्टींचा विचार करतात . 
शरीरातील भाग :पोटऱ्या 

द्वादश/व्यय  स्थान :
ह्या स्थानावरून साधारणपणे नुकसान , परदेशगमन , hospitalization इ. विचार करतात . 
शरीरातील भाग : पावले ,डावा डोळा 

पुढच्या लेखात राशी व नक्षत्रांचा विचार करू .


Thursday 5 December 2013

पत्रिकेचा अभ्यास भाग -१

ब्लॉग वाचून बऱ्याच  जणांनी ब्लॉग आवडल्याबद्दल कळवले आहे।  परन्तु काही  लोकांचे म्हणणे आहे कि आम्हाला  ह्या विषयात interest आहे पण त्यातील काही माहिती नाही आणि  आमच्याकडे सध्या कोणते पुस्तक हि नाही . अशांसाठी विचार केला कि पत्रिके बद्दल थोडी basic माहिती देण्याचा प्रयत्न करावा .

 सर्वप्रथम पत्रिका म्हणजे काय हे पाहूयात .

पत्रिका म्हणजे आपल्या जन्माच्या वेळेस जी ग्रहस्थिती होती त्याचा अराखडा . 
पत्रिका तयार करण्यासाठी जन्म तारीख ,जन्मस्थळ ,जन्मवेळ ह्या माहितीची आवश्यकता असते . 

उदा . समजा एक मुल   ५ जुलै २०१३ ला भारतात मुंबई मध्ये सकाळी १० वाजता जन्मले ( हे एक काल्पनिक उदाहरण आहे).
 तर पत्रिका म्हणजे त्या तारखेला ,त्या वेळेस आणि त्या ठिकाणी असलेली ग्रहस्थिती . 

आता ह्या मुलाची पत्रिका बनवली ( आजकाल लोक software  मधूनच पत्रिका बनवतात . स्वत: पत्रिका तयार करायची झाल्यास पंचांगाच्या आधारे करता येते . पण त्यासाठी पत्रिका कशी तयार करायची ह्याचे ज्ञान आवश्यक आहे .) जेव्हा आपण पत्रिका तयार करतो तेव्हा ती अशी दिसते .






वर दिसते आहे ती लग्न कुंडली आहे।  ही basic पत्रिका आहे।
जिथे ५ नंबर दिसतो आहे ते प्रथम स्थान आहे।  त्याला पत्रिकेचे लग्न( हे लग्न म्हणजे विवाह/ marriage  नव्हे  )असे म्हणतात। लग्न म्हणजे त्यावेळेस पूर्व क्षितिजावर उदित  असलेली  रास . ( कोणत्या वेळेस कोणती लग्न रास आहे ह्याची माहिती पंचागात असते . कॉम्पुटर वर पत्रिका काढली तर पंचागाची गरज नाही )
 ५ नंबर म्हणजे सिंह रास प्रत्येक राशीला नंबर आहेत। जसे
१. मेष  २. वृषभ   ३. मिथुन   ४. कर्क   ५. सिंह   ६. कन्या   ७. तूळ  ८. वृश्चिक   ९. धनु  १०. मकर   ११. कुंभ   १२. मीन

 म्हणजे ह्या मुलाच्या जन्माच्या वेळेस  पूर्व क्षितिजवर सिंह रास  उदित होती . ह्या मुलाची पत्रिका सिंह लग्नाची आहे असे  म्हणतात म्हणजे ह्याची  लग्न रास सिंह आहे .
एकदा लग्न निश्चित झाले कि मग प्रथम स्थानापासून anticlockwise मोजत यायचे म्हणजे ६ नंबर दिसतो आहे ते द्वितीय स्थान , ७ नंबर तृतीय स्थान ह्याप्रमाणे जिथे ४ नंबर दिसतो आहे ते व्यय ( बारावे स्थान) .
आता प्रथम स्थानाचा अधिपती (LORD ) रवि आहे . प्रत्येक ग्रहाच्या मालकीच्या काही राशी आहेत . त्या त्या ग्रहाला त्या राशींचे अधिपती म्हणतात . जसे

१ म्हणजे मेष रास व ८ म्हणजे वृश्चिक रास ह्या दोन्होही राशी मंगळाच्या आहेत .
२म्हणजे वृषभ रास व  ७ म्हणजे तूळ  रास ह्या दोन्होही शुक्राच्या आहेत . 
३ म्हणजे मिथुन रास व  ६ म्हणजे कन्या  रास ह्या दोन्होही राशी बुधाच्या आहेत . 
४ म्हणजे कर्क रास हि चंद्राची रास आहे . 
५ म्हणजे सिंह रास हि रवीची रास आहे . 
९ म्हणजे धनु  रास व १२ म्हणजे मीन रास ह्या दोन्होही राशी गुरूच्या आहेत. 
१० म्हणजे मकर   रास व ११ म्हणजे कुंभ रास ह्या दोन्होही राशी शनीच्या  आहेत. 

चंद्ररास म्हणजे पत्रिकेत ज्या राशीत चंद्र असतो ती रास इथे वृषभ राशीत म्हणजे  २ नंबर मध्ये चंद्र दिसतो आहे म्हणजे ह्या मुलाची रास वृषभ आहे . 

आता  भावेश म्हणजे काय ? ते बघू . 
भावेश म्हणजे त्या भावाचा अधिपती . वरील उदाहरणात प्रथम स्थानात सिंह रास आहे.  ह्याचाच अर्थ प्रथमेश सिंह राशीचा स्वामी रवि आहे . प्रथम स्थानाच्या अधिपतीला लग्नेश असे पण म्हणतात . 
द्वितीय स्थानाचा अधिपती बुध आहे म्हणजे द्वितीयेश बुध आहे याच प्रमाणे बाराही भावांचे भावेश बघता येतील . 
माला वाटते आता  पत्रिकेची बेसिक माहिती झाली असेल . 
पुढच्या लेखांमध्ये अजून माहिती द्यायचा प्रयत्न करते . 

Tuesday 3 December 2013

ज्योतिष विषयी अभ्यास -भाग २


भविष्य पाहण्याच्या अनेक पद्धती आहेत . पण त्यापेकी कोणती एक 
पद्धत  परिपूर्ण अशी म्हणता येणार नाही .त्यामुळे जास्तीत जास्त अचूकतेकडे 
जाणारी कृष्णमुर्ती पद्धती हि भारतीय ज्योतिष शास्त्रातील अनेक पद्धतीपेकी 
अतिशय प्रभावी पद्धत आहे.
           चेन्नई चे प्रो. के. एस.कृष्णमुर्ती ह्यांनी बरेच वर्षे आपल्या अभ्यासातून आणि अनुभवातून हि पद्धत शोधून काढली . ह्यासाठी त्यांनी आपले पारंपारिक ज्योतिषशास्त्र व नाडी ग्रंथ ह्याचा अभ्यास केला. त्यांनी शोधून काढलेली भविष्य कथनाची हि पद्धत म्हणजेच "कृष्णमुर्ती पद्धती".
ह्या पद्धतीमध्ये नक्षत्राचा बराच अभ्यास केला आहे.कोणताही ग्रह हा त्याच्या दशेत , अंतर्दशेत तो ज्या स्थानी आहे त्या स्थाना संबंधी अधिकतने फळे न देता त्याचा नक्षत्रस्वामी ज्या स्थानात आहे 
त्या स्थानाची व त्याच्या ( नक्षत्रस्वामीच्या )राशी ज्या स्थानात आहेत त्या स्थानाची फळे अधिकतेने देतो. असा नवीन सिद्धांत कृष्णामुर्तीनी मांडला आहे. 
ह्या नवीन नियमाचा बऱ्याच वेळा अनुभव येतो .
           उदा .समजा तूळ लग्न आहे .दशमात कर्केचा गुरु आहे . कर्केत गुरु उच्चीचा मानतात . ह्याचा अर्थ गुरु महादशेत दशमस्थानासंबंधी अगदीउत्तम फळे मिळायला हवीत . परंतु कधी कधी चित्र अगदी उलटे असते म्हणजे  गुरु महादशेत करियर च्या दृष्टीने वाईटच गोष्टी होतात .त्याकरता गुरु कोणत्या नक्षत्रात आहे ते बघणे आवश्यक आहे.कर्क राशीत पुनर्वसू  ,पुष्य ,आश्लेषा  अशी तीन नक्षत्रे आहेत . त्यापेकी जर गुरु पुनर्वसु मध्ये असेल तर दशमस्थानाची उत्तम फळे मिळतील . तसेच गुरु तृतीय व षष्ट स्थानाचा अधिपती आहे. याचा  अर्थ ह्या महादशे नोकरी मिळेल व नोकरी निम्मित जवळच्या शहरात जावे लागेल।
            गुरु जर पुष्य नक्षत्रात असेल व शनि पंचमात/नवमात  असेल तर  नोकरी जाण्याची पाळी येइल. कारण शनि चतुर्थ आणि पंचमाचा अधिपती आहे.
पंचम आणि नवम हि दोन्ही स्थाने नोकरी च्या दृष्टीने वाईटच कारण पंचम हे
षष्टाचे  व्यय स्थान आहे तसेच दशमाचे अष्टम .
           तसेच जर तो आश्लेषा नक्षत्रात असेल व बुध पंचमात असेल तरी वाईट
फळे मिळतील कारण बुध नवमेश व व्ययेश आहे .त्यामुळे ह्या पद्धतीनुसार 
ग्रहांच्या नक्षत्रांना फार महत्व आहे . तसेच कृष्णमुर्ती पद्धती मध्ये प्रश्नकुंडली हा अतिशय उपयोगी प्रकार आहे .त्याबद्दल आधी लिहिलेले  आहेच . 
कृष्णमुर्ती पद्धती  च्या काही पुस्तकांची यादी खाली देत आहे . ज्या योगे नवीन अभ्यासकाना मदत होईल . 
कृष्णमूर्तिनी  स्वत: लिहिलेली सहा READERS आहेत .  ENGLISH मध्ये आहेत . 

1 . KP Reader I: Casting the Horoscope ------------ K S Krishnamurti
2 . KP Reader II: Fundamentals of Astrology------ K S Krishnamurti
3 . KP Reader III: Predictive Stellar Astrology-----K S Krishnamurti
4 . KP Reader IV: Marriage Married  life and Children------------------K.S Krishnamurti 

5 .KP Reader V: Transits Gocharapala Nirnayam -----K.S Krishnamurti 

6 .KP Reader VI Horary Astrology ------------- K S Krishnamurti 

मराठी मध्ये सुद्धा बर्याच लोकांनी ह्या पद्धती वरील बरीच पुस्तके लिहिली  आहेत . त्यापेकी काही खाली देत आहे. 

१.कृष्णमुर्ती ज्योतिष रहस्य -------------------------- सुरेश शहासने 
२. कृष्णमुर्ती ज्योतिष वेद ------------------ -----------सुरेश शहासने 
३. कृष्णमुर्ती सिद्धांत ------------------------ ----------ज्योतिन्द्र हसबे 
४. वेध नक्षत्रांचा ---------------------------------------ज्योतिन्द्र हसबे 
५. कृष्णमुर्ती प्रश्न सिद्धांत भाग १---------------------- ज्योतिन्द्र हसबे 
६.  कृष्णमुर्ती प्रश्न सिद्धांत भाग  २---------------------- ज्योतिन्द्र हसबे 
७. उपनक्षत्र स्वामींची किमया ---------------------------सुनिल  देव 
८. दशमस्थान ---------------------------------------------सुनिल  देव 
९. षष्ठ स्थान ------------------------------------- --------सुनिल  देव



















Sunday 1 December 2013

ज्योतिष विषयक अभ्यास -भाग १


ज्योतिषशास्त्राशी माझा पण खरे तर काही संबंध नव्हता . नक्की आठवत नाही.पण साधारण ३ वर्षांपूर्वी भारतात आले होते तेव्हा 'मी मराठी ' ह्या वाहिनीवर शरद उपाध्ये ह्यांचा ' भविष्यावर बोलू काही ' हा कार्यक्रम बघण्यात 
आला .तेव्हा  ज्योतिषशास्त्राबाबत कुतूहल निर्माण झाले .  तेव्हा भारतातून परत 
जाताना ह्या विषयावरची काही पुस्तके घेऊन गेले. जसे जसे वाचू लागले तसे तसे  
खूपच इंटरेस्टिंग वाटू लागले . 
आधी जी पुस्तके नेली होती ती वाचली मग अजून काही पुस्तके, internet मग जवळपास च्या लोकांच्या  पत्रिका बघणे जे वाचले आहे त्यातून मग त्याचा त्याचा analysis  करणे इ. सुरु झाले . 
ज्योतिष ह्या विषयावर बरीच पुस्तके आहेत . बऱ्याच भाषांमध्ये आहेत . 
अजून हि मी पण पुस्तके शोधतेच आहे . परंतु  माझ्या वाचनात जी मराठी पुस्तके आली त्यांची यादी खाली देत आहे . ज्या योगे नवीन शिकणाऱ्या लोंकाना फायदा होईल . 

ज्योतिषशास्त्राचा पारंपारिक पद्धतीने अभ्यास करायचा झाला तर व.दा भट यांची पुस्तके फार उपयुक्त आहेत.

१.कुंडली तंत्र आणि मंत्र भाग १

२.कुंडली तंत्र आणि मंत्र भाग २

३.व . दा भट यांचे फलीत- तंत्र( ले. कविता काळे )

४.असे ग्रह अशा राशी

५.पंचम स्थान

६.सप्तम स्थान

७.वृश्चिक लग्न

८.समग्र ग्रहयोग

तसेच म. दा भट ह्याचे नवमांश रहस्य . 

तसेच अगदीच पहिल्यापासून सुरुवात असेल तर शरद उपाध्ये ह्यांचे ' राशीचक्र' पण चांगले आहे.
कृष्णमुर्ती पद्धतीचा अभ्यास करण्यापूर्वी पारंपारिक ज्योतिषशास्त्राचा अभ्यास असणे मला वाटते आवश्यक आहे . 

हळूहळू 'पत्रिका दाखवणे/ बघणे म्हणजेअंधश्रद्धा 
किंवा मनाचा कमकुवत पणा ' असे नसून   
Astrology - A  guiding  tool  ' म्हणजेच मार्गदर्शक आहे असे वाटू
लागले .फक्त पत्रिकाच बघा असे माझे अजिबात म्हणणे नाही .प्रयत्न ,शिक्षण ,संस्कार हे तेवढेच किंबहुना त्याहून जास्त महत्वाचे आहेत परंतु कोणत्या दिशेने प्रयत्न करायचे हे ह्यातून ठरवता येते .त्यामुळे मार्गदर्शक म्हणून निश्चितच त्याचा फायदा होतो हाच विचार लोकांसमोर ठेवता येईल ह्या  हेतूने मग

anaghabhade.blogspot.in  माझा ब्लॉग निर्माण झाला .



Friday 29 November 2013

हरवलेला चष्मा भाग -२



हरवलेली वस्तू परत मिळेल का? हा प्रश्न बघताना  ,

जर लाभस्थानाचा उपनक्षत्र स्वामी मार्गी ग्रहाच्या नक्षत्रात असून जर हरवलेली वस्तू ज्या भावावरून बघतात त्या भावाचा कार्येश असेल व ती वस्तू ज्या भावावरून बघतात त्या भावाचा उपनक्षत्र स्वामी जर मार्गी ग्रहाच्या नक्षत्रात असून लाभ स्थानाचा कार्येश असेल  तर तर ती वस्तू परत मिळते .

उद. द्वितीय स्थानावरून हरवलेले पैसे ,दागिने इ. बघतात . समजा पैसे हरवले 
असतील तर द्वितीय भावाचा उपनक्षत्र स्वामी बघावा  तो मार्गी ग्रहाच्या नक्षत्रात असून लाभ स्थानाचा कार्येश असेल व लाभस्थानाचा उपनक्षत्र स्वामी मार्गी ग्रहाच्या  नक्षत्रात असून जर द्वितीय भावाचा कार्येश असेल तर पैसे नक्की मिळतील .

५७ नंबर च्या प्रश्नकुंडली नुसार  मिथुन लग्न गुरूच्या नक्षत्रात व शनिच्या उपनक्षत्रात आहे . 

आता चष्म्याचा विचार कोणत्या स्थानावरून करावा ? असा प्रश्न पडला . 
द्वितीय स्थानावरून डोळ्याचा विचार केला जातो म्हणून मग द्वितीय स्थानाचा उपनक्षत्र स्वामी पाहिला . तो बुध आहे . बुध स्वत: मार्गी आहे व केतूच्या नक्षत्रातआहे . राहू, केतू हे छायाग्रह नेहेमीच मार्गी धरतात . आता द्वितीयस्थानाचा  उपनक्षत्र स्वामी बुध लाभास्थानाचा कार्येश आहे का ते बघू . बुध केतुच्या नक्षत्रात आहे . 

कृष्णमुर्ती पद्धती मध्ये राहू,केतू हे ज्या राशीत असतात त्याच्या अधिपती प्रमाणे तसेच ज्या ग्रहांची त्यांच्यावर  दृष्टी आहे त्या प्रमाणे फळे देतात . तसेच ते 
ज्यांच्या नक्षत्रात आहेत त्याच्या स्वामी प्रमाणे फळे देतात . 

इथे केतू मेषेत आहे . मेषेचा स्वामी मंगळ  . लाभत मेष रास असल्याने मंगळ 
लाभस्थानाचा कार्येश आहे . म्हणजे बुध पण लाभाचा कार्येश  होणार . 
तसेच लाभाचा उप नक्षत्र स्वामी द्वितीय स्थानाचा कार्येश आहे का पहु. 
लाभाचा स्थानाचा उपनक्षत्र स्वामी  राहू आहे . राहू  राहुच्याच नक्षत्रात आहे . जेव्हा कोणताही ग्रह स्वत: च्याच नक्षत्रात असतो तेव्हा तो त्याच्या उपनक्षत्र स्वामीची फळे देतो . राहू शुक्राच्या उपनाक्षत्रात मणजे तो शुक्राची फळे देणार शुक्र चंद्राच्या नक्षत्रात त्यामुळे द्वितीयाचा कार्येश आहेच . 

त्यामुळे ह्या पत्रिकेत दोन्ही नियामाप्रमाणे 'चष्मा ' मिळणार हे नक्की . पण कधी ? 
त्यासाठी ruling planets  पहिले . त्याप्रमाणे सोमवारी चष्मा मिळायला हवा 
असे वाटले . तसेही सोमवारीच शाळेत चौकशी करणार होते . 
पत्रिकेत चंद्र नवम  स्थानी  हो ता . नवम स्थान म्हणजे प्रवासाचे स्थान . शाळेत 
जाणारा मुलगा school bus मधून शाळेत जाण्यासाठीच  प्रवास 
करणार . त्यामुळे चष्मा school bus मधेच असणार असे वाटले . 
सोमवारी सकाळी bus stop वर गेल्यावर   driver काकांना परत विचारले  कि पुन्हा एकदा बघाल का ? ते म्हटले "अहो आत्ताच सकाळी सगळी बस बघितलीच आहे . "

पण सारखे वाटत होते कि प्रश्नकुंडली प्रमाणे चष्मा  मिळेल  . मग ठरवले कि 
थोड्यावेळाने शाळेत जाऊनच  विचारावे . असा विचार करून सगळी कामे पटापट आवारात होते  तेवढ्यात driver काकांचा फोन आला कि चष्मा गाडीतच सापडला . ते म्हटले मी दोनदा आधी पहिले होते पण तेव्हा दिसला 
नाही आत्ता गाडी साफ करणाऱ्या मावशीना सीट  खाली सापडला . शाळेतून घरी येताना मुलगा चष्मा घेऊन घरी आला . 

चला , म्हणजे प्रश्नकुंडली बरोबर आली तर . School bus मधून चष्मा 
प्रवास करत होता तर . नवम स्थान(प्रवास) कसे active  होते बघा . 

प्रश्नकुंडली पहिली नसती तर कदाचित परत परत driver काकांना विचारले नसते आणि त्यांनीही एकदा बघून परत कदाचित लक्ष घातले नसते ते नाहीये म्हणतायत म्हणजे चष्मा हरवला असे समजून नवीन करायला टाकला असता . 

प्रश्नकुंडलीमुळे  चष्मा करण्याचे काम आणि पैसे दोन्हीही वाचले . 

Thursday 28 November 2013

हरवलेला चष्मा भाग -१

हरवलेला चष्मा ( प्रश्नकुंडली)

एके दिवशी शाळेतून घरी आल्यावर तासाभराने मुलाला त्याचा चष्मा सापडेना . मी म्हटले " अरे आणलास का  शाळेतून  , का शाळेत विसरलास ? " त्यावर तो अगदी confidently  'घरी आणला होता ' असे म्हणाला . मग काय सगळे घर शोधून झाले . तरी चष्मा काही मिळेना . शेवटी मला वाटले कि हा बहुतेक शाळेत विसरला आहे . पण तो म्हणता  होता कि अगदी शाळा संपेपर्यंत चष्मा खिशात होता हे त्याला आठवत होते . मग मात्र मला चष्मा बहुतेक school  bus  मध्ये राहिला असेल हि शंका आली . मी लगेच driver  काकांना फोन लावला . तेव्हा त्यांनी बस मध्ये शोधून सांगितले कि बस मध्ये चष्मा नाही . त्या दिवशी शुक्रवार होता . शनिवार व रविवार शाळेला सुट्टी असते म्हणजे आता सोमवारीच शाळेत जाऊन शोधावे लागणार . 
झाले , चष्मा सापडत नाही म्हटल्यावर आमचे चिरंजीव एकदम नाराज . त्याला मग एकदम माझ्या प्रश्नकुंडलीची आठवण झाली . आता त्याला आपली आई हरवलेल्या वस्तू ज्या प्रयत्न करून पण सापडत नाहीत त्याकरता प्रश्नकुंडली मांडते हे माहित झाले आहे . मग लगेच त्याने " माझा चष्मा मिळेल का ? " हा प्रश्न विचारला आणि ५७ नंबर दिला . 
एव्हाना सगळीकडे शोधून झाले होते . त्यामुळे मी पण प्रश्नकुंडली बघण्याचा विचार केला .

हरवलेली वस्तू परत मिळेल का? हा प्रश्न बघताना  ,
जर लाभस्थानाचा उपनक्षत्र स्वामी मार्गी ग्रहाच्या नक्षत्रात असून जर हरवलेली वस्तू ज्या भावावरून बघतात त्या भावाचा कार्येश असेल व ती वस्तू ज्या भावावरून बघतात त्या भावाचा उपनक्षत्र स्वामी जर लाभ स्थानाचा कार्येश असेल  तर तर ती वस्तू परत मिळते .
उदा . द्वितीय स्थानावरून हरवलेले पैसे ,दागिने इ. बघतात . समजा पैसे हरवले 
असतील तर द्वितीय भावाचा उपनक्षत्र स्वामी बघावा  . तो जर मार्गी ग्रहाच्या 
नक्षत्रात असून लाभ स्थानाचा कार्येश असेल व लाभस्थानाचा उपनक्षत्र स्वामी जर द्वितीय भावाचा कार्येश असेल तर पैसे नक्की मिळतील .

उर्वरित लेख  दुसऱ्या भागात . 

Wednesday 27 November 2013

पंचमस्थान भाग -२

 पंचमस्थान भाग -२( संतति  योग )

ह्या भागात आपण संतति  योगाचा  'कृष्णमुर्ती पद्धतीने 'विचार करू .
ह्या पद्धती मध्ये  संततीचा विचार पंचम स्थानाच्या उपनक्षत्र स्वामी वरून करतात .

सर्व प्रथम त्यासाठी पत्रिका कृष्णमुर्ती पद्धती प्रमाणे बनवणे आवश्यक आहे.

जन्मपत्रिके करता संतति संबधी  नियम असा आहे कि
'' पंचम स्थानाचा उपनक्षत्र स्वामी जर द्वितीय ( कुटुंब स्थान ) , पंचम स्थान ( संतति  स्थान ) किंवा लाभ स्थान (  सर्व प्रकारचे लाभ ) ह्यापेकी एकाचा जरी कार्येश असेल तर संतति योग असतो . '

प्रश्नकुंडली करता संतति संबधी  नियम असा आहे कि ,
'' पंचम स्थानाचा उपनक्षत्र स्वामी जर द्वितीय ( कुटुंब स्थान ) , पंचम स्थान ( संतति  स्थान ) किंवा लाभ स्थान (  सर्व प्रकारचे लाभ ) ह्यापेकी एकाचा जरी कार्येश असेल व तो उपनक्षत्र स्वामी जर मार्गी ग्रहाच्या नक्षत्रात असेल तर संतति योग असतो . ' 

आता संतति योग आहे ह्याची खात्री झाल्यावर मग कधी? 
त्यासाठी महादशा स्वामी बघावा . महादशा स्वामी जर २,५,११ ह्या पेकी भावांचा कार्येश असेल व चतुर्थ स्थानाचा बलवान कार्येश नसेल तर त्या महादशेत संततियोग असतो . महादशा स्वामी जर अनुकूल असेल तर मग अंतर्दशा स्वामी बघावा तो सुद्धा  जर २,५,११ह्या पेकी भावांचा कार्येश असेल व चतुर्थ स्थानाचा बलवान कार्येश नसेल तर ती अंतर्दशा निवडावी . तसेच विदशा पण त्याच नियमाने ठरवावी . अशा प्रकारे साधारण काळ काढता येतो . 

प्रश्नकुंडली मध्ये नियमाप्रमाणे जर योग असेल तर महदशा व अंतर्दशा ठरवताना . बाकी नियामाबरोबर अजून एक नियम म्हणजे वक्री ग्रहांच्या नक्षत्रात  असलेला महादशा स्वामी फळ देत नाही . तसेच महादशा/ अन्तर्दशा स्वामी मार्गी असून स्वत: वक्री असेल  तर तो मार्गी झाल्यानंतर फळ देतो . 

जो महादशा स्वामी  किंवा अंतर्दशा स्वामी २,५,११ बरोबर चतुर्थ स्थानाचा बलवान कार्येश असेल . त्या महादशेत/ अंतर्दशेत  बर्याच वेळा abortions होण्याची शक्यता असते . कारण चतुर्थ हे पंचामाला बारावे म्हणजे विरोध करणारे स्थान आहे . अशा वेळेस योग्य दशेची  वाट बघणेच योग्य. 

ज्या दाम्पत्यांना काही medical  प्रोब्लेम मुळे मुल होत नसते अशांनी पण योग्य
दशा बघून treatment  घेतल्यास जास्त चांगले .









Monday 25 November 2013

पंचम स्थान भाग -१ (संतति योग)

पंचम स्थान भाग -१ (संतति योग) :

पारंपारिक पद्धत :
पंचम स्थानावर मुख्यत्वे  संतति / उपासना /कला/ क्रीडा(खेळ) / investment इ . गोष्टी बघतात . त्यापेकी ह्या लेखात आपण फक्त संतति विषयाचाच  विचार करू .
संतति योग आहे का ? असेल तर केव्हा ? इ.  सर्व गोष्टींचा विचार ह्या स्थानावरून करतात .
संतति  संबंधी विचार करताना पंचम स्थान , पंचमेश ( पंचम स्थानाचा अधिपती ) तसेच संतति  चा कारक ग्रह म्हणून 'गुरु' तसेच पंचमावर व पंचमेशावर दृष्टी असणारे ग्रह ह्या सर्वांचा विचार करायला हवा .
पंचमात पापग्रह असणे ( पंचमातील शनि बर्याच वेळेस मुल होण्याच्या दृष्टीने विलंब लावतो )तसेच पंचमेश बिघडलेला असणे म्हणजे
पंचमेश शत्रू राशीत असणे , त्याचा कोणत्याही एक किंवा त्याहून अधिक ग्रहाशी कुयोग असणे  . पंचमेश अष्टमाच्या युतीत असणे ,पंचमेश वक्री असणे  इ.
गुरु हा संतति चा कारक ग्रह जर पत्रिकेत नीच राशीत पापग्रहाच्या कुयोगात असेल किंवा वक्री असेल तसेच गुरु पाप ग्रहाच्या युतीत असेल तर संतती सुखाच्या दृष्टीने चांगले नाही . गुरु- राहू युती सुद्धा संतति सुखाच्या दृष्टीने वाईटच असते .
तसेच पत्रिकेतील महादशेचा पण विचार करणे क्रमप्राप्त आहे . जर महादशा संतति होण्याच्या दृष्टीने supporting नसतील तर मग योग्य महादशा येई पर्यंत वाट बघणे आपल्या हातात असते .
हा विषय खूप मोठा आहे परंतु पंचम स्थानासाबंधी माहिती थोडक्यात देण्याचा हा प्रयास आहे .
माझ्या मते महादशांचा विचार कृष्णमुर्ती पद्धतीप्रमाणे चांगला करता येतो . तसेच कृष्णमुर्ती पद्धती मध्ये कशाप्रकारे संतति चा विचार केला जातो ते पुढील भागात
देण्याचा प्रयत्न करते .
हे सर्व वाचून , कोणतीही एक गोष्ट आपल्या पत्रिकेत आहे म्हणून संततीच्या दृष्टीने वाईट असा निष्कर्ष  काढू नये कारण कोणतेही अनुमान काढताना पत्रिकेचा सर्व बाजूने  निट  विचार करावा लागतो . 




इच्छित व्यक्तीशी विवाह होईल का?

इच्छित व्यक्तीशी विवाह होईल का?

बऱ्याच  वेळा लग्नाळू मुला मुलीना  हा प्रश्न पडतो . जर त्त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम असेल किंवा 'स्थळ ' बघण्याचा  कार्यक्रम झाल्यानंतर  एकमेकांची पसंती येई दरम्यानच्या काळात पण हाच प्रश्न असतो . असाच प्रश्न एका मुलीने काही दिवसांपूर्वी विचारला होता . तिने २-३ महिन्यापूर्वी एक मुलगा ( 'स्थळ' ) पहिला  होता . तिला तो पसंत होता व त्याच्याबरोबर लग्न व्हावे अशी तिची मनापासून इच्छा होती . परंतु त्या मुलाकडून मात्र होकार हि येत नव्हता व नकार पण . बरेच दिवस झाल्यावर आता ह्या मुलाचा विचार सोडून नवीन स्थळ बघावे असे घरातल्या लोकांचे म्हणणे होते . ह्या सगळ्या गोंधळामुळे तिने ' माझे त्या मुलाशी लग्न होईल का? '
हा प्रश्न विचारला . त्याकरता १८ नंबर कळवला . हा प्रश्न प्रश्नकुंडलीने चांगल्या प्रकारे सोडवता येतो . ज्या व्यक्तीचा हा प्रश्न आहे  त्या व्यक्तीला ' माझे इच्छित व्यक्तीशी ( ज्या कोणाशी त्या व्यक्तीस विवाह होणे अपेक्षित आहे . ती व्यक्ती ) विवाह होईल का ?'  हा प्रश्न मनात धरून १-२४९ ह्या मधील एक नंबर देण्यास सांगावे . त्या वेळेस जो नंबर डोळ्यासमोर येईल तो सांगण्यास सांगावे . lucky number  वगेरे देऊ नयेत .

ह्या प्रश्नासाठी नियम असा आहे कि ' सप्तमस्थानाचा उपनक्षत्र स्वामी  जर स्थिर राशीत असून २,७,११ चा कार्येश असेल तर इच्छित व्यक्तीशी विवाह होईल . ' तसेच तो उपनक्षत्र स्वामी वक्री किंवा वक्री ग्रहाच्या नक्षत्रात नसावा .

१८ नंबर प्रमाणे प्रश्नकुंडली तयार केली .



१८ नंबर हा मेष लग्न ,शुक्राच्या भरणी नक्षत्रात व केतूच्या सब मध्ये आहे .
ह्या कुंडली प्रमाणे सप्तमाचा उपनक्षत्र स्वामी केतू आहे . केतू छाया ग्रह
असल्याने नेहेमीच मार्गी धरतात . केतू शुक्राच्या नक्षत्रात व शुक्र पण मार्गी आहे .

केतू हा मेष राशीत आहे . त्यामुळे मंगळ कोणत्या राशीत आहे ते बघावे तर मंगळ पण सिंह ह्या स्थिर राशीत आहे .केतूचा नक्षत्रस्वामी शुक्र हा पण वृश्चिक  ह्या स्थिर राशीत आहे .
तसेच केतू शुक्राच्या नक्षत्रात असून शुक्र सप्तमात असल्याने व शुक्राची रास  द्वितीय आणि सप्तम भावारंभी असल्याने केतू २ व ७ ह्या स्थानाचा कार्येश आहेच .
तसेच ११ भावाचा उ . न . स्वामी केतू प्रथमाचा कार्येश आहेच . म्हणजे मुलीची इच्छापूर्ती पण होणार .

त्यामुळे त्या मुलीचे त्या मुलाशी नक्की लग्न होईल . असे सांगितले
त्याप्रमाणे काही दिवसांपूर्वीच ते लग्न ठरल्याचे कळले  व आता लग्नाची तयारी जोरात सुरु आहे .




Saturday 23 November 2013

सप्तमस्थान- भाग २(घटस्फोट)

सप्तमस्थान- भाग २(घटस्फोट)
घटस्फोटाचे योग बघताना मुख्यत्वे सप्तम स्थान , सप्तमेश तसेच विवाहाचा कारक ग्रह शुक्र तसेच येणाऱ्या महादशा या सर्वाचा विचार करावा लागतो .
बर्याच वेळा सप्तमात पापग्रह असणे , सप्तमेश वक्री असून त्याचे पापाग्रहाशी कुयोग असणे इ . कारणे असतात.
बर्याच पत्रिकामध्ये शुक्राचा हर्षल, शनि , मंगल ,नेपचून ह्या ग्रहाशी प्रतियोग , षडाष्टक किंवा केंद्रयोग असतो. तसेच काही वेळेस शुक्र राहू युती पण असते .
कृष्णमुर्ती पद्धती प्रमाणे घटस्फोट होण्यासाठी महादशा स्वामी बघावा लागतो. तो जर सहा किंवा बारा भावांचा बलवान कार्येश असून तृतीय भावाचा पण कार्येश असेल तर कायदेशीर विवाह विच्छेद म्हणजे ' घटस्फोट ' होतो . जर तृतीय स्थानाशी संबंध आला नाही तर मग बहुतेक वेळा वैवाहिक सौख्य मनासारखे न मिळणे , एकमेकांपासून लांब राहणे इ. गोष्टी होतात .
बऱ्याच वेळा विचार केल्यावर असे वाटते कि आधीच्या काळी पण असे ग्रहयोग लोंकाच्या पत्रिकेत असणार पण त्याकाळी घटस्फोटाचे प्रमाण खूप कमी होते. आत्ता ते खूप वाढले आहे. त्याची बरीच कारणे आहेत जसे कि आधीची पिढी सोशिक होती किंवा तेव्हाची स्त्री शिकलेली नव्हती त्यामुळे आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी नव्हती इ.
पण प्रश्न असा आहे कि आत्ता सुद्धा बरेच जण घटस्फोट घेऊन सुखी होतात का? आता ते कोणत्या कारणाने घटस्फोट घेत आहेत त्यावर अवलंबून आहे ( काही जनाच्या बाबतीत खरेच लग्न टिकवून ठेवणे हे त्रासदायक असते ) पण नुसते पटत नाही म्हणून घटस्फोट घेणे योग्य आहे का ? विशेषत: मुले असताना .
जास्तीत जास्त जोडीदाराला समजून घेऊन नाते टिकवण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवा .
अर्थात दोघांकडून हे महत्वाचे .

नोकरी / व्यवसाय (दशमस्थान)

नोकरी / व्यवसाय (दशमस्थान)
बऱ्याच वेळा विचारला जाणारा प्रश्न म्हणजे " मी नोकरी करणे चांगले कि व्यवसाय ?" .
ह्या प्रश्नाचे उत्तर माझ्यामते कृष्णमुर्ती पद्धतीने जास्त चांगले देता येते. त्याकरता जन्मकुंडली कृष्णमुर्ती पद्धतीने बनवलेली असली पाहिजे. पत्रिकेतील ग्रहाचा भाव पारंपारिक व कृष्णमुर्ती पद्धती मध्ये बदलू शकतात कारण कृष्णमुर्ती पद्धती मध्ये भावारंभ पद्धत वापरली आहे.
दशमस्थान हे कर्म स्थान आहे. त्यामुळे दशम भावाच्या उपनक्षत्र स्वामीवरून नोकरी करणार कि व्यवसाय ते ठरवता येते.
"दशमस्थानाचा उपनक्षत्र स्वामी जर कोणत्याही प्रकारे सप्तमाचा बलवान कार्येश असेल व चर राशीत असेल तर ती व्यक्ती व्यवसाय करेल . जर दशमस्थानाचा उपनक्षत्र स्वामी षष्ठ स्थानाचा कार्येश असेल तर ती व्यक्ती नोकरी करेल. "
षष्ठ स्थानावरून नोकरीचा विचार करतात व सप्तम हे customer ( गिऱ्हाईक) चा विचार होतो .
कधी कधी व्यक्ती आधी नोकरी करते मग व्यवसाय किंवा नोकरी करता करता एखादा जोडधंदा करते .अशावेळेस बरेच वेळा दशमभावाचा उपनक्षत्र स्वामी द्विस्वभाव राशीत असतो.
प्रथम भावावरून माणसाचा कल/ पिंड कळतो म्हणजे व्यवसाय करण्यास अनुकूल आहे का नोकरीकरता .
चतुर्थ स्थान पण बघावे . कृष्णमुर्ती पद्धती मध्ये शिक्षणाचा विचार चतुर्थ स्थानावरून केला आहे. साधारण पणे शिक्षण व (व्यवसाय /नोकरी )ह्याचा संबंध असतो .
काही वेळा आपण घेतलेल्या शिक्षणाचा नोकरी/व्यवसायाशी संबंध येत नाही. त्याकरता एकंदर पत्रिकेतील
ग्रहयोग , ग्रहाच्या राशी , नक्षत्र , येणाऱ्या महादशा ह्या सर्वांचा एकत्रित विचार करावा लागतो . हे सगळे बघून मग व्यवसाय कोणता असेल ह्याचा अंदाज येतो.
दशमाचा उपनक्षत्र स्वामी कोणता ग्रह आहे हे पण पाहावे.
उदा. बुध कम्युनिकेशन , लेखन , प्रकाशन, ज्योतिष,कॉम्पुटर , स्तेशनरी, वकिली, पोस्ट इ संबंधात नोकरी/ व्यवसाय दाखवतो .
दशमस्थानाचा उपनक्षत्र स्वामीचा संबंध कोणत्या भावाशी आहे. त्याचप्रमाणे दशमभाव कोणत्या राशी व नक्षत्रात आहे हे पण बघावे.
आता व्यवसाय म्हटले तरी इतके पर्याय असतात त्यामुळे नक्की काय हे बऱ्याच वेळा अवघड असते . पण त्या व्यक्तीची आवड , क्षमता , शिक्षण येणाऱ्या महादशा ह्या सर्वाचा विचार करून मग ठरवावे.
पत्रिकेच्या आर्थिक स्थिती वरून मग व्यवसाय यशस्वी होईल का? चांगल्या पगाराची नोकरी मिळेल का? ह्या बाबत अंदाज येतो .
दशमाचा उपनक्षत्र स्वामी जर २,६,७,१०,११ ह्या भावाचा बलवान कार्येश असेल तर व्यवसायात चांगले यश मिळते .
साधारणपणे जर ५,९,८ ह्या स्थानाच्या दशा असतील तर नोकरी/ व्यवसायात अडचणी येतात . बहुतेक वेळा जर दशा/ अंतर्दशा अष्टम स्थानाचे फळ दाखवत असेल तर मनस्ताप पण होतो. त्यामुळे ह्या काळात नोकरी बदलू नये . साधारणपणे २,३,६,१०,११ ह्या स्थानाच्या दशा असतील तर नोकरी/ व्यवसायात चांगली प्रगती होते .जो/जे ग्रह दशम स्थानाचे बलवान कार्येश असतात त्या ग्रहाच्या दशा/ अंतर्दशा नोकरीत प्रमोशन / व्यवसायात प्रगती दाखवतात.
माझ्यामते मी दशमस्थानाबाबत थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जाणकारांनी अजून आपली मते व अनुभव मांडावेत .
(संदर्भांकरता सुनील देव , सुरेश शहासने, ज्योतिन्द्र हसबे ह्याची पुस्तके वापरली आहेत . )